रेवती घरी आली,
घरात मोठ्या जाउबाई होत्या,
दबलेल्या, शांत…
त्यांचं बघून ती एकेक गोष्ट शिकत होती,
श्रीमंत घर, पण कामाला माणसं नव्हती,
कारण राजकारणी म्हटलं की हेर, गुप्तहेर..
घरातल्या गोष्टी आणि योजना बाहेर जायला नकोत म्हणून आधीच काळजी घेतलेली,
सगळं काम सासुबाई आणि जाउबाई करत,
आता त्यात रेवतीची भर पडली,
रेवतीला वाटे, राजकारण करायचं म्हणजे सासरेबुवा आणि नवऱ्याने मला त्यांच्यासोबत घेतलं पाहिजे, चार ओळखी करून दिल्या पाहिजे..
पण तिला घरकाम करायला आणलेलं फक्त..
एकदा रेवती आणि जाउबाई किचनमध्ये काम करत होत्या,
धुतलेल्या भांड्यांमधून एक कप कडेला असल्याने आपोआप खाली पडला आणि फुटला,
जाउबाई आणि रेवती दोघींनी पाहिलं,
रेवती जवळच उभी होती,
सासुबाई आल्या आणि रेवतीला नको ते बोलू लागल्या,
“मिळतं म्हणून उतमात करायची का? डोकं ठिकाणावर ठेऊन कामं करत जा..”
रेवती म्हणाली,
“अहो आई मी नाही फोडला कप..भांड्यातून पडला, हवं तर ताईंना विचारा..”
सासूबाईंनी जाउबाईंकडे पाहिलं, त्या गप होत्या, सगळं माहीत असून काही बोलल्या नाही,
“बघितलं? ती काही बोलत नाहीये, तूच खोटं बोलतेस”
रेवतीला जाउबाईंचा प्रचंड राग आला, खरं माहीत असूनही मला खोटं ठरवलं…रेवतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले,
“ताई का असं केलंत? माझी बाजू का नाही घेतली?”
जाउबाई जवळ आल्या,
गंभीर मुद्रा करत म्हणाल्या,
“राजकारणात जायचं आहे ना तुला? मग हा पहिला धडा..आपली चूक नसतांना कुणी आपल्यावर आरोप करत असेल तर आपल्या जवळची लोकं आपल्या बाजूने उभी राहतील या भ्रमात राहायचं नाही…राजकारणात ज्याच्या हातात सत्ता त्याच्या बाजूने माणसं बोलतात”
रेवती बघतच राहिली,
****
भाग 3 अंतिम
1 thought on “उपकार-2”