सासूबाई दिशा ने सांगितल्याप्रमाणे वडाला फेऱ्या मारायला जातात…तिथल्या बायका गप्पा मारत असतात ते सासूबाईंना ऐकू जातं…कुणी सुनेबद्दल तक्रार करत असतं… कुणी मुलाबद्दल…कुणाला दुखणं सुरू होतं तर कुणाकडे पैशाची कमी…
सासूबाई विचार करतात…श्रद्धा आयुष्यात आली आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं…घरात पैसे आले, दुखणं दूर पळालं, माणसं स्वावलंबी बनले, घरात शांतता आणि सुख नांदू लागलं…हे सगळं श्रद्धा ने सांगितलेल्या उपायांमुळे… श्रद्धा या बायकांनाही मार्गदर्शन करेल की…त्या तडक त्या स्त्रियांकडे जातात…
“तुम्हाला एक सुचवू का?”
“काय?”
“मी अलका..इथे जवळच राहते…मलाही खूप अडचणी होत्या…पण माझ्या सुनेकडे एकावर एक जालीम उपाय आहेत…तुम्ही तिला भेटा…सर्वांच्या अडचणी दूर होतील…तिला दैवी शक्ती प्राप्त आहे….तिच्या हातून मोठमोठे चमत्कार झालेत..”
बायका विचार करतात…जाऊन पाहायला काय हरकत आहे…पडला तर पडला फरक…
“चला लगेच येतो…”
“चला…सुनबाई येईलच आता ऑफिस मधून…”
सासूबाई सर्वांना घरी घेऊन येतात…
श्रद्धा ऑफिस वरून घरी येते…पाहते तर काय, 10-15 बायकांना सासूबाईंनी चटईवर बसवून ठेवलेलं असतं… समोर एक खुर्ची असते…
श्रद्धा ला वाटतं हा काय प्रकार?
सर्व बायका श्रद्धा ला पाहून हात जोडतात…
श्रद्धाला सासूबाई अघोषित साध्वी डिक्लेयर करतात…आणि श्रद्धाचा सत्संग सुरू होतो..
श्रद्धा ला एकूण प्रकरण लक्षात येतं..
“चला..आयुष्य असही बोरिंग वाटत होतं…काहीतरी नवीन करू…आज कुछ तुफानी करते है…”
असं म्हणत श्रद्धा आपली बॅग खाली ठेवते…
“ओम भट फट छट ब्रम्बर्मम चतुर्माकिसरत भट स्वाहा…खाली बसा..माझी आजची परिक्रमा पूर्ण झाली…”
सर्व बायका खाली बसतात..सासूबाईही त्यांच्यासोबत खाली बसतात…
श्रद्धा सर्वांकडे एक नजर फिरवते…
एक बाई बोलायला सुरुवात करते..
“पोरी माझ्या आयुष्यात किनई..”
“थांबा…तुमच्या डोळ्यात पाहून मी ओळखलं सर्व…फार चिडचिड होतेय तुमची..मुलगा अन सून मान देत नाही…नवरा लक्ष देत नाही… राबून राबून तुम्हाला दुखणी लागलीत..”
“कसं सगळं बरोबर ओळखलंत?? खरंच तुमची सून अंतर्यामी आहे..”
“मग…मी म्हटलं होतं ना तुम्हाला?”
श्रद्धा मनाशीच खुश होते..
“मेलं हे वाक्य कुठल्याही पन्नाशीतल्या स्त्री ला बोला…सर्वांना लागू पडतं… काय नवीन त्यात…जाऊद्या आपल्याला काय…”
एकेक स्त्री आपली अडचण सांगू लागते..
“माझी सून नोकरी करते…पण म्हणून स्वतःला फार हुशार समजायला लागली…घरात कुणाकडेही लक्ष देत नाही..मग घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात..”
“कुठे नोकरी करते तुमची सून?”
“मार्केटिंग का काहीतरी आहे बाई..”
श्रद्धा ला लक्षात येतं. मार्केटिंग मधला माणूस खूप दमतो, खूप जिकिरीचं काम असतं ते..आणि ते करून घरच्यांची मनधरणी करणं सुनेला झेपत नसेल…आणि मग काम करण्याइतकं तिचं शरीर थकून जात असेल..”
“तुम्हाला एक उपाय करावा लागेल…र अक्षरापासून सुरवात असलेली एखादी गरीब स्त्री घरात आणावी लागेल..”
“मुलाचं दुसरं लग्न करू का?”
“ए भेंडी…” श्रद्धा चिडते…
“काय??”
“ए..एक भेंडी घेऊन दरवाजाला ओवळायची अन सुनेचं नाव घेत बाहेर फेकायची..” कंट्रोल श्रद्धा कंट्रोल…
श्रद्धा ने पटकन सारवासारव केली…च्यायला फार पटकन उपाय सुचतात हल्ली…काय तर म्हणे भेंडी ओवाळून टाकायची… हा हा…
“मग काय करू??”
“र नावापासून सुरवात झालेली एखादी बाई पहा..”
ती बाई विचारात पडते…. कसं करावं हे? किती अवघड आहे..
इतक्यात सासुबाई म्हणतात, अहो सोपं आहे..आमची रखमा…कामवाली…तिला ठेवा तुमच्याकडे… दोन्ही घरचं काम करेल…गरीब आहे, आणि तिला कामाची गरजही आहे…
श्रद्धा ला हेच हवं होतं…ती बाई हट्टी वाटत होती कामाच्या बाबतीत..मग घरात कामवाली आणली म्हणजे दोघींचा कामाचा ताण हलका होईल…आणि घरात शांतता नांदेल हे तिला माहीत होतं…
इतक्यात दुसरी स्त्री…
“माझी कंबर जाम दुखते… हा हात सुद्धा..आणि गुडघा तर…आई आई..”
चला श्रद्धा मय्या…आता डॉकटरकी दाखवू…
“घरी कोण कोण असतं?”
“2 सुना आहेत..”
2 सुना असल्यावर ही बाई घंटा शरीराला ताण देईल…आयतं बसून अन खाऊन किती फुगलीये…दुखणार नाही तर काय ..
“तुमच्या घरातल्या फरशीवर सूक्ष्म आत्मे आहेत…तेच तुम्हाला त्रास देताय…एक उपाय सांगते… एक झाडू घ्यायचा, आणि देवाचं नाव घेऊन घरातल्या प्रत्येक फरशीवर आडवा फिरवायचा…म्हणजेच झाडून टाकायचं त्यांना… दिवसातून 3 वेळेस…”
“अहो माझ्या सुना मारतात की झाडू..”
“त्यांना घाबरत नाही ते आत्मे.. त्यांना तुमच्यासारखी साक्षात लक्ष्मी चं रूप असलेली, दुर्गेचं तेज असलेली स्त्रीच पिटाळू शकते….”
जी बाई उठता बसताना आधार घेऊन उठायची तीच श्रद्धा चं हे ऐकून ताडकन उठून उभी राहिली…एकदम योद्धा बनल्याच्या जोशात….
“मी पिटाळेन त्यांना..”
असं करत करत श्रद्धा एकेकीच्या दुखण्यावर इलाज सांगते….सासूबाई आज गर्वाने ताठ झालेल्या असतात…
क्रमशः
कशी चाललीये कथा? एक कमेंट टाकून द्या बरं का…