सूनबाईचा मित्र (भाग 1)
“या अरुंधतीने ना चांगली कानफटात मारायला हवी त्या अनिरुद्ध च्या…इतके उपद्व्याप करूनही वर तोंड करून बोलतो, काही लाजच नाही या माणसाला..”
“पुढच्या वेळेस मी गेलो की सांगेन हो तिला..”
“त्या गुरुनाथ सारखी धिंड काढायला हवी याची, राधिका सारखी का नाही वागत ही??”
“अगं हिला मसाले बनवता येत नसतील..”
“हो पण गाणं तर म्हणता येतं ना…त्या शकिरा सारखं कॉन्सर्ट करायला काय हरकत आहे हिला.??”
“अगं कुठल्या कुठे चाललीयेस तू..कुठे अरुंधती अन कुठे शकिरा..”
“हेच, हेच चुकतं… तुम्हाला वाटतं आई कुठे काय करू शकते..पण आई सगळं काही करू शकते..”
“बरं बाई, पुढच्या खेपेला मी गेलो की विचारेन त्या अरुंधतीला…की, बाई गं, तू शॉर्ट घालून कॉन्सर्ट करशील का??”
काही वेळ बरीच शांतता..प्रभा सिरीयल मध्ये पुन्हा गुंतून गेली..मग रणबीर आणि दीपिकाची एक ऍड लागली…ब्रेक मध्ये बडबड करणारी प्रभा आज मन लावून ऍड बघतेय हे बघताच प्रतापला घाम फुटला…तो हळूच चोरट्या पावलाने तिथून पळ काढायला निघणार तोच आवाज..
“अहो..”
प्रभाच्या या “अहो..” ची प्रताप ला प्रचंड धडकी भरायची..कपाळावर घाम जमायचा, छातीत धडधड वाढू लागायची, डोकं सुन्न होऊन जायचं अन हात थरथरु लागायचे…
“का…य ग…गं…”
“हे पाहिलंत का??”
“हे बघ, मी त्या रणबीर सारखे कपडे घालून अजिबात फोटो काढणार नाही…तुझा हट्टीपणा बस झाला आता.. “
“तुम्ही एकटे नाही, मीही दीपिका सारखा ड्रेस घालणार..आपण फोटो काढुया…”
प्रतापला ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता..
प्रभा…आत्यंतिक हट्टी, लहरी आणि बालिश बाई…ती कधी काय करेन सांगता येत नसे..तिच्या डोक्यात कधी काय खूळ घुसेल याचा नेम नाही, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय प्रतापची सुटका नसायची..एकदा तर प्रतापच्या मित्रांच्या पार्टीत ही अचानक घुसली..आणि “एकटे एकटे पार्टी करता काय” म्हणत त्यांच्यात बसून चार पेग लावले हिने…काय तर म्हणे, तल्लफ आलेली दारूची…तल्लफ यायला हिने दारू कधी प्यायली तरी होती का?? प्रताप हतबल होता, कारण नवसाची बायको होती ती…होय, नवसाची… दूरच्या जंगली भागातल्या शहरात कामाला म्हणून कुणी मुलगी देत नव्हतं, पण प्रभाने वाघाची शिकार करायला मिळेल या हेतूने माझ्याशी लग्न केलं…तरी बरं 2 दिवसात माझी बदली मध्यवर्ती शहरात झाली म्हणून, नाहीतर वाघांना हिने पाळीव प्राणी म्हणून दाराशी बांधले असते…असो..
“बरं… घातले मी तसे कपडे…त्याच्यासारखाच खाली तुझा परकर घातलाय, खुश?? आता चल जाऊदे मला..”
“असं कसं, किती गोड दिसताय हो.. फोटो काढायचा आहे की अजून..”
“फोटो?? नको गं माझे आय..”
“थांबा हो जरा..”
“अगं इथे कुणीही नाही, कोण आपला फोटो काढेल??”
“थांबा…सुनबाई ssss…ओ सुनबाई..sss..”
आणि हो, सांगायचं राहिलंच… प्रभा ही 49 वर्षाची एक प्रौढ स्त्री होती…
सुनबाई आत येताच तिने सगळा गोंधळ पाहिला..
“सासूबाई काय हे..आणि भांडू नका आता, मी नेहमी नेहमी तुमचं भांडण सोडवायला येणार नाही..आता पटकन कपडे बदला, जेवण करा आणि भागवत परायणाला बसा….चला आता पटापट खाली या, जेवायला वाढतेय..”
“काय ओ सुनबाई, अगदी अरसिक आहात तुम्ही, म्हटलं स्वैपाकाला बाई लावू, तर तुलाच करायचं आहे सगळं…”
“अहो विवाहित स्त्री ने स्वतःच्या हाताने घराला भोजन द्यावं, त्यात गोडवा असतो, प्रेम असतं… चला बरं आता, मला जेवण करून कीर्तनाला जायचं आहे…पटापट आवरावं लागेल..”
सर्वजण जेवण करतात, सुनबाई देवघरात भागवत पुस्तिका आणून ठेवते, सासूबाई आणि सासऱ्यांना बसायला अंथरून टाकते…
“आई येते मी, तुम्ही पारायण करा तोवर मी येते जरा भजनाला जाऊन..”
“Ok सुनबाई…done…” हाताचा ठेंगा दाखवत सासूबाई तिला जायला सांगतात..
सुनबाई गेली बघताच सासूबाई हसतच आत येतात,
“ओ प्रभाबाई, चला जरा देवधर्माचं वाचन करूया..सुनबाई सांगून गेलीये..”
“ती म्हातारी झालीये…आता मी मिर्झापुर बघणार. दुसरा सिझन आलाय हो, फार कधीची वाट पाहत होते मी..”
असं म्हणत सासूबाई रिमोट घेऊन tv समोर बसतात.
काही वेळाने सुनबाई घरी येते, आल्यावर तिला घरात वेगळाच आवाज येत असतो…ती दार लावून पटकन आत येते, देवघरात बघते, सासूबाईं आणि सासरे भागवतात गढून गेलेले असतात…सुनबाईला कौतुक वाटतं, ती आत जाऊन आवरते अन झोपून घेते…तिचे मिस्टर रात्री उशिरा घरी येत, त्यामुळे ती जास्त जागत नसे, सकाळी लवकर उठावं लागायचं, सगळं आवरून सासूबाईंना हातात चहाही द्यावा लागायचा ना, सकाळी 11 ला…
“सुनबाई, माझी पाठ फार दुखतेय गं..”
“अरे देवा, थांबा तेल लावून देते..”
“अगं ते एक मसाज मशीन मिळतं ते घेऊ म्हटलं..”
“मी यांना सांगते लगेच..”
“त्याला कुठे गं वेळ..”
“मग मी जाते..”
“नको, तू गेलीस अन मी घरात पडले तर??”
“अरे देवा, नको नको…मी…थांबा ऑनलाइन ऑर्डर करते..”
“म्हणजे 5 दिवस लागणार यायला..”
“हो..”
“अगं आई गं… लवकर नाही का येऊ शकणार का गं??”
“हा ते काहीतरी प्राईम वगैरे असलं की लवकर येतं म्हणे..”
“घे की मग..”
“बरं…मी प्राईम मेम्बर्शीप घेते अन लगेच ऑर्डर करते..”
सुनबाई असं म्हणतात सासूबाई खुश होतात…अन चपळाईने आपल्या खोलीत जाऊन tv लावतात..
“अहो सासूबाई हळू, पाठ दुखतेय ना??”
खोलीत सासरे-
“बघा…आता मनसोक्त मिर्झापुर दुसरा सिझन बघा..काल मेम्बरशिप संपली म्हणून भागवताला बसल्या मॅडम.. आता आज बघा मनसोक्त..”
“अहो मला काय घेता येत नाही का मेम्बर्शीप, पण वयोमानाने आयडी पासवर्ड कुठे लक्षात राहतो..”
“होका…वयोमानाने वाढ तर काही झालेली दिसत नाहीये…”
“तुम्ही गप बसा, पाहुद्या मला..”
(ही कथा आहे एका भन्नाट सासूची, जिच्या एकेक अवखळपणाला आवरता आवरता सर्वांच्या नाकी नऊ येतात, मग हळूच एन्ट्री होते ती सूनबाईच्या बालमित्राची, हा बालमित्र म्हणजे प्रभा चं दुसरं रूपच.. दोघांची कशी भेट होते, त्यांची कशी गट्टी जमते, बघा पुढील भागात)
धमाल आहे.गंमतदार उपदव्यापांची वाट पहातोय.प्रतापला पूर्ण सहानुभूती 😀
Khup Chan