गावी प्रभाच्या उनाडक्या सुरूच होत्या, इकडे घरी सासरेबुवा आणि केदार दोघेच. या दोघींशिवाय खरं तर त्यांना अजिबात करमत नव्हतं.
गेले कित्येक दिवस केदारशी वडिलांच्या मनसोक्त गप्पा झाल्या नव्हत्या. निदान आता तरी आपला मुलगा आपल्याशी बोलेल म्हणून ते वाट बघत होते. पण केदार मात्र भलत्याच विश्वात गुंग होता. कामाचा लोड असावा म्हणून कदाचित… वडिलांनीही जास्त अपेक्षा केली नाही.
घरातून बाहेर जाताना केदार किल्ली सोबत ठेवत असे, त्यामुळे वडील त्याची वाट न पाहता लवकर झोपून जात. आज मात्र त्यांना झोप लागत नव्हती, का कुणास ठाऊक पण जरा अस्वस्थ वाटत होतं..रात्रीचे 2 वाजले तरी त्यांना झोप येईना..अश्यातच दार उघडायचा आवाज आला.
केदार इतक्या उशिरा घरी येतो? मनाशीच ते म्हणाले..आल्या आल्या त्याला त्रास नको द्यायला, दमला असेल तो असा म्हणत वडील बेडवरच पडून राहिले..पण पावलांचा आवाज मात्र 2 माणसांचा वाटत होता, वडीलांना जरा शंका आली, ते बाहेर येऊन बघायच्या आत केदार ने खोलीत जाऊन दार लावून घेतलं होतं..वडील परत आपल्या खोलीकडे जायला निघताच त्यांना केदारच्या खोलीतून आवाज आला..
“अरे तुझ्या घरी समजेल ना..वडील आहेत की घरी..”
“त्यांना गाढ झोप लागते, समजतही नाही मी आलोय ते..तू काळजी करू नको..”
“हम्म…मला सांग आपण कधी लग्न करायचं? तू श्वेताला कधी घटस्फोट देणार आहेस??”
“देईल गं लवकरच…मी तिला इतका टाळतो पण तिच्याही लक्षात येत नाही की आपला नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय. दिवसभर घरात काहींना काही कामं करत असते..डोक्यात फरक आहे तिच्या, प्रेम, लग्न कशाशी खातात हे समजत नाही तिला..”
“मग ही गोष्ट लग्नाआधी नाही का लक्षात आली तुला?? तेव्हा मला लग्नाचं वचन दिलेलं आणि गायब झाला.”
“तेव्हा खरच मी घरच्यांचा आग्रहापुढे नामलो होतो..पण आता चूक सुधारेन…”
वडिलांच्या कानावर हे संवाद पडले अन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली..केदारला आपण कधी लग्नासाठी आग्रह केलेला? सगळं त्याच्या संमतीनेच झालेलं की..आणि आता हा श्वेता सारख्या गुणी मुलीला घटस्फोट द्यायचं म्हणतोय? काय चूक आहे तिची?? तिला अंदाजही नाही या सगळ्याचा…
वडिलांचा संताप अनावर होतो, ते बाहेरून जोरजोराने दार ठोठाऊ लागतात.
“केदार, दार उघड..”
आवाज ऐकताच केदार आणि मायरा घाबरतात..केदार मायराला पडद्या आड लपवून दार उघडतो..वडिलांच्या डोळ्यात संताप असतो, केदार कपाळावरचा घाम टिपतो, “बाबा…झोपला नाहीत??”
“नाही, तुमची अशी थेरं बघायला जागा राहिलो…कोण आहे ती बाई?? कुठे लपलीये??”
वडील घरभर नजर फिरवतात, पडद्याआड लपलेली मायरा त्यांना दिसते,
“बाहेर ये बाई…लपून फायदा नाही आता..”
मायरा बाहेर येते..
“केदार?? अरे लग्न झालंय तुझं,सोन्यासारखी बायको आहे तुला, अन तू असली थेरं चालवलीये??”
“हे बघा अंकल, आमचं एकमेकांवर प्रेम आहे..आम्हाला लग्न करायचं आहे..”
“अगं बाई या माणसाचं आधीच लग्न झालंय कळत कसं नाही तुला??”
“So?? लग्न झालं म्हणजे संपलं का सगळं?? केदारला नाही वाटत ती compatible, सो त्यालाही त्याची मर्जी सांभाळायचा अधिकार आहे..”
“लग्न म्हणजे खेळ वाटला काय?? आणि काय रे केदार, तुझी बायको 24 तास घरासाठी राबत असते, तुझी आई पाहिली अशी, पण घरासाठी वयाच्या मानाने इतकी मोठी जबाबदारी श्वेताने कोवळ्या वयात उचलली…तू तिला वेळ देत नाही म्हणून कधी साधी तक्रार केली नाही तिने, अन ती दिवसभर घरातली कामं करते म्हणून जीवावर आलं?? अरे अशी बायको लाखात एक असते…तुला कधी किंमत कळणार तिची..”
वडील मायराला हाकलून देतात, केदार वडिलांशी खूप भांडतो..
“बाबा माझ्या मैत्रिणीचा अपमान केलात तुम्ही..चांगलं नाही केलं..”
“रात्री अपरात्री लग्न झालेल्या माणसासोबत ही बाई घरात येते, तिची काय आरती ओवळायला हवी???”
“बाबा मी श्वेतासोबत नाही राहू शकत…”
“तुला श्वेता नको असेल तर आम्हीही मिळणार नाही..चालता हो माझ्या घरातुन..”
केदार आधीच चिडलेला असतो, मध्यरात्री बॅग भरून तो घर सोडतो…इकडे वडिलांची तब्येत अजून बिघडते…कसेबसे स्वतःला सावरत ते दुसऱ्या दिवशी प्रभाला फोन करतात..
“हॅलो प्रभा…”
“काय ओ, थांबा ना जरा, आंब्याच्या झाडावर चढलीये.. थांबा फोटो पाठवते..”
“ते सगळं सोड, आधी तू ताबडतोब इथे निघून ये..आणि श्वेताला आणू नकोस काही दिवस तरी..”
“का हो काय झालं??”
“आल्यावर सगळं सांगतो..”
काहीतरी गंभीर आहे हे लक्षात येताच प्रभा परत जाण्याचा निर्णय घेते..
“आई काय झालं असं अचानक? बाबा बरे आहेत ना? मीही येते तुमच्या सोबत..”
“अगं नाही, बाबांना फार एकटं वाटतय, केदारही बाहेर असतो दिवसभर, म्हणून..तू माहेरी आलीये, माहेरपण अनुभव थोडं..निवांत ये..”
प्रभा सर्वांना निरोप देते..घरी पोचताच नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रभाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते.. अखेर प्रभाला ज्याची भीती होती तेच झालं..सासऱ्यांनी घडलेलं सर्व सांगितलं, आणि प्रभाला ऐकून जबरदस्त धक्का बसला..दोघेही मोठ्या चिंतेने ग्रासले..
“मी काय म्हणते, केदारला एकदा बोलावून घेऊ, त्याला समजावू..”
“काय समजावणार त्याला..घर सोडलं त्याने..”
“मी त्याला फोन करून बोलवून घेते..”
बरेच आढेवेढे घेत अखेर केदार घरी येतो..
“केदार..तुझे बाबा काय सांगताय हे?? कोण ती मुलगी?? आणि तू असं करूच कसं शकतो??”
“आई, माझं त्या मुलीवर प्रेम होतं. पण तिच्याकडून मला काहीही उत्तर आलं नाही म्हणून मी तुम्ही सांगितलेल्या मुलीशी लग्न केलं.खूप दिवसांनी तिचा फोन आला, आणि तिने प्रेमाची कबुली दिली…तिला माझं लग्न झालं हे माहीतही नव्हतं..”
“पण जेव्हा समजलं तेव्हाही तिने प्रेम प्रकरण सुरू ठेवलं? अरे दुसऱ्याच्या संसारात असं नाक खुपसू नये हेही माहीत नव्हतं तिला??”
“आई जे झालं ते झालं..माझं मायरा वर प्रेम आहे आणि मी लग्न करणार आहे..”
“आणि श्वेताचं काय? काय चूक तिची? कुठे कमी पडली ती??”
“हो पण तिच्या सुखासाठी मी आयुष्यभर असं मनाला मारून राहायचं का??”
“मला हेच समजत नाही, श्वेता सारख्या मुलीवर कुणालाही प्रेम होईल, तुला कसं काही वाटलं नाही तिच्याबरोबर??”
“नाही वाटत तर नाही वाटत, असंही लग्नाला काय अर्थ आहे या..आम्ही कधी एकत्र आलोच नाही..”
थोडंसं संकोचत केदार म्हणाला..हे ऐकून प्रभा तर एकदम किंचाळली..
“काय?? म्हणजे वर्षभरात पत्नीचं सुख तिला दिलं नाहीस? आणि तिने एका शब्दानेही सांगितलं नाही..अरे मुलगी आहे की त्यागाची देवी…”
“तिला काही फरक पडला नाही, तुम्हाला का पडतोय??”
“लाज वाटते का असं बोलायला? समोरचा गप आहे म्हणून वाटेल तसं वागायचं?? तू निघून जा इथून…पुन्हा तोंड दाखवू नकोस..”
केदार निघून जातो, प्रभा आणि बाबांना श्वेतासाठी खूप रडू येतं.. बाबा म्हणतात,
“काय आणि कसं सांगायचं गं आपल्या लेकीला?? कसं सहन करेल ती? कुठे जाईल??”
प्रभा डोळे पुसते..तिच्या अंगात एकदम ऊर्जा संचारते..
“श्वेताला तिचा हक्क मिळेल. तिला तिच्या हक्काचा माणूस मिळेल…प्रेम मिळेल, सगळं मिळेल..कन्यादान मी करेन..”
“काय बोलतेय हे??”
“हो…मी परत जातेय, श्वेताकडे…”
क्रमशः
छान वळणावर आली आहे कथा .
आपल्या सुनेच्या बाबतीत अश्या प्रकारे निर्णय घेण्याची वेळ येऊ नये… पण जर आलीच तर खंबीरपणे साथ देयला प्रभा आणि बाबांसारखे सासू सासरे हवेत.
pudhcha part lavkar taka. khup chaan valan dile ahe kathela.