कल्पनेतला मित्र

 ऋचाचं असं एकांतात जाऊन फोनवर बोलणं त्याच्या डोळ्यात खुपू लागलं होतं. एरवी सतत काहीना काही कामात व्यस्त असणारी ऋचा आता कामं अर्धवट टाकून गच्चीवर जाऊन कितीतरी वेळ गप्पा मारत असायची. मानव साठी हे काहीतरी विचित्रच होतं. सुरवातीला आईशी वगैरे बोलत असेल असं त्याला वाटायचं पण एकूण हावभाव बघून मामला काहीतरी वेगळाच आहे हे त्याला जाणवू लागलं.

मानवची बदली एका दूरच्या शहरात झालेली, कंपनीकडून एक आलिशान घर त्याला मिळालेलं. ऋचा खूप खुश होती, घराला सावरण्यात आणि सजवण्यात तिचा वेळ कसा जाई तिचं तिलाच समजेना. घर नीट बसवून झालं, आता मात्र ऋचा कंटाळू लागली. दिवसभर मोकळा वेळ, काय करावं सुचेना..मग काही छंद जोपासत होती, पण तरीही वेळ काही जाईना. लांबच्या शहरात कुणी ओळखीचंही नव्हतं, बोलायला, मन मोकळं करायला कुणीही नसायचं. मग अश्यावेळी कुठेतरी ओढ वाटणे नैसर्गिक आहे, मन मोकळं करायला, मनातलं बाहेर काढायला काहीतरी आधार ती शोधत होती.

मानव एक आत्मकेंद्री व्यक्ती होता, आपल्याला जे हवं तेच फक्त करायचं, दुसऱ्याचा विचार करण्याचा त्याचा स्वभावच नव्हता. अश्यातच त्याची नोकरीही 10-12 तास, घरी आला की tv, मग मोबाईल..मग आपल्या आवडीचं जेवण करायचं आणि बेडवर पडल्या पडल्या डोळे लावायचे असा त्याचा दिनक्रम. ऋचाने त्याचा हा स्वभाव आनंदाने स्वीकारला होता, पदरी पडले अन पवित्र झाले या विचाराने मानव जसा होता तसंच त्याच्यावर ती प्रेम करत असायची. तो घरी असे तेव्हा सारखं त्याच्या मागे पुढे, त्याला काय हवं नको ते बघे, त्याला वेळेवर नाश्ता जेवण देण्याची तिची धावपळ असे. मानवला या सगळ्याची सवय झालेली, इतकी की त्याने तिला गृहीतच धरलं होतं.. सवय होती पण किंमत मात्र नव्हती.

एरवी ऋचा काय करतेय हे विचारायची सवयही नसलेल्या मानवला आता मात्र ऋचाचं वागणं खटकू लागलं. जेवण, नाश्ता उशिरा होऊ लागला, घरातली कामं रेंगाळू लागली. ऋचा समोर असली तरी तिचं मन मात्र भलतीकडेच असायचं.

मानवचं लक्ष आता कामातून उडू लागलं, मनात भलतेच विचार येऊ लागले..ऑफिस मध्ये जेवायच्या वेळी मित्रांमध्ये गप्पा सुरु होत्या..त्यांच्या बॉस बद्दल ते बोलत होते..

“या बॉस ची बायको पहिली का ..टॉप मॉडेल आहे म्हणे ती..”

“काय एवढं कौतुक त्याचं..”

“असं कसं, अरे पेपरमध्ये कायम नाव येत असतं तिचं..फेमस आहे खूप..”

“काय उपयोग.. परवा एका परक्या माणसासोबत दिसली होती गार्डन मध्ये जाताना..”

ग्रुपमध्ये एकच हशा पिकतो…मानवचा घास मात्र घशातच अडकतो. त्याच्या मनात नको ते विचार येऊ लागतात, उद्या आपल्यालाही असं हसतील..आपली सगळी इभ्रत धुळीस मिळेल..त्याला घेरी येऊ लागते..हाफ डे ची परवानगी घेऊन तो तडक घरी येतो..

गेल्या गेल्या बघतो तर काय, ऋचा फोनवरच बोलत होती. त्याने तिचं बोलणं गपचूप ऐकण्याचा प्रयत्न केला..

“अरे म्हणजे तुला माहितीये का..मला ना अशी चित्र काढायला फार आवडतात, पण आता ना काही सुचतच नाही बघ…काय माहीत असं का होतय.. तुला माहितीये, मी आईकडे असताना रोज एक नवीन चित्र काढायचे..आणि मला ना रोज नवीन रेसिपी बनवायलाही फार आवडायचं..आता असं झालंय ना की तेच तेच करून कंटाळले मी…तू भेट ना मला कधी..असही आमचे हे नसतानाच भेटता येईल आपल्याला…ते असताना पूर्ण वेळ त्यांच्या मागेच जातो..”

मानव तावातावाने येऊन फोन हिसकावून घेतो, ऋचाच्या चेहऱ्यावर काहीही भाव नसतात..तो फोन कानाला लावतो..काहीही आवाज ऐकू येत नसतो..तो स्क्रीन बघतो तर कुठलाही फोन नव्हता..तो गोंधळून जातो..कॉल लॉग चेक करतो..पण शेवटचा फोन हा त्यालाच होता..तोही चार तासापूर्वी… मग हा काय प्रकार आहे??

“ऋचा?? कुणाशी बोलत होतीस??”

“एक मित्र आहे माझा…त्याच्याशी..”

“कोण? नाव काय त्याचं??”

“त्याला नाव नाही…”

“नाव नाही?? राहतो कुठे?? कसा ओळखतो तुला??”

“कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही..”

“का?”

“कारण तो अस्तित्वातच नाही..”

“मग बोलतेस कुणाशी??”

“कल्पनेतल्या मित्राशी..इथे बोलायला कुणीही नाही हो मला…कुणालातरी मनातलं सांगावं, कुणाशी तरी मन मोकळं करावं असं खूप वाटतं.. एकटेपणा खायला उठतो…तुम्हाला वेळ नसतो माझ्यासाठी… मग याच्याशी बोलते मी..तो बोलत काहीच नाही, फक्त ऐकतो…सगळं म्हणजे सगळं ऐकतो…अगदी केव्हाही कधीही फोन केला ना तरी वैतागत नाही..माझ्यासाठी खूप वेळ असतो त्याला…आणि एकदा का त्याच्याशी बोलून झालं ना, की इतकं मोकळं वाटतं म्हणून सांगू..”

मानव मटकन खाली बसतो, त्याच्या आत्मकेंद्री स्वभावामुळे त्याच्या बायकोचं तो किती नुकसान करतोय हे त्याच्या लक्षात आलं..ऋचाला मनातलं बाहेर काढण्यासाठी कल्पनेच्या विश्वात शिरायची गरज का पडावी? आपण दिवसभरात 20 लोकांना भेटतो, सतत बोलणं होत असतं, मनातलं बाहेर निघत असतं.. अगदी लाईट गेली तरी शेजारच्या को वर्कर सोबत बसून सोबतीने वैताग बाहेर काढतो…ऑफिस मधल्या शिपायालाही मला काय हवं नको ते सांगतो…मग ऋचाने कुणाला सांगावं?? मनातलं मळभ, मनात साठलेलं, खुपलेलं, दुखलेलं..वाट कशी देणार त्याला???
डोळ्याच्या कडा चोरून पुसत तो ऋचाला म्हणाला..

“ऋचा..आज बाहेर जाऊ आपण..मी सुट्टी घेतली आहे…आणि हो, तुझा तो कल्पनेतला मित्र बाहेर आलाय बरं का…तुझ्यासमोर उभा आहे तो आता..जिता जागता..”

4 thoughts on “कल्पनेतला मित्र”

Leave a Comment