साधूच्या त्या बोलण्यात खूप आत्मविश्वास होता. त्याला कसं समजलं असावं की सॉफ्टवेअर क्षेत्रात artificial intelligence आणि machine learning मध्ये माझा हातखंडा आहे ते? आणि भविष्याचं भाकित? आजवर चित्रपटात किंवा गोष्टीतच अश्या प्रकारचं वर्णन असायचं, मग वास्तवात हे होणं शक्य आहे का? का शक्य नाही? तू आजवर कित्येक प्रोजेक्ट यशस्वी बनवलेत, अमन मल्होत्रा तर तुला कोटीचं पॅकेज देऊन त्याच्या कंपनीत बोलावू बघतोय, मग तुला काय अशक्य आहे??
एवढा सगळा विचार मनात घोळत असताना साधू कधी नजरेआड झाला समजलंच नाही. साधू निघून गेला पण जाता जाता सारंगच्या मनात जगण्याची एक आशा पल्लवित करून गेला. त्याच्या फोनची रिंग वाजली, ईशानी चा फोन होता.. त्याने झटकन उचलला..
“मला जास्त काही बोलायचं नाहीये, हे बघ..मी तुझ्या वागण्याला कंटाळून डिओर्स चा निर्णय घेतेय हे तुला माहीतच आहे..लवकरात लवकर हे आटोपून मोकळं व्हायची ईच्छा आहे. तुला कधी वेळ मिळतोय सांग, काही लीगल प्रोसिजर्स पूर्ण करायच्या आहेत..”
एवढं बोलून ईशानी फोन ठेवते अन पुन्हा तो निराशेच्या गर्तेत जातो. 4 वर्षांपूर्वी ईशानी सोबत लग्न झालं, 2 वर्षाचा अविर अन ईशानी सोबत सारंगचा उत्तम असा संसार चाललेला. पण पुन्हा ईशानीच्या आयुष्यात इंद्रजित ची एन्ट्री होते अन पुढचं सगळं गणितच बदलतं. ईशानी पूर्णपणे इंद्रजीतच्या येण्याला डावलत असली तरी एकतर्फी प्रेमातून इंद्रजीतने असा काही डाव टाकलेला की इशानीला आपला संसार सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. ईशानीवर नसते आरोप करून सारंगने तिच्या आत्मसन्मानाला प्रचंड ईजा पोहोचवली होती. परिणामी ईशानीने संसार मोडण्याचा निर्णय घेतला होता. सारंगला याची जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेली होती. ईशानी इंद्रजित कडे जाण्यासाठी आपल्यापासून वेगळी होतेय या त्याच्या समजुतीला जेव्हा तडा गेला तेव्हा आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतलाय याची त्याला जाणीव झाली.
या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग..नवनिर्मितीचा ध्यास घ्यायचा..कित्येक लोकं आपल्या ध्येयासाठी संसार सोडून जातात , इथे संसार स्वतःहून त्याला सोडून गेला होता..आयुष्य असंच जगण्यापेक्षा काहीतरी करून मरावं हा विचार त्याच्या मनात घोळू लागला. काशीला भेट देणं, मंदिरात जाणं अन साधुशी भेट होणं यातून बरीच सकारात्मक ऊर्जा त्याच्याकडे प्रवाहित होत गेली अन तो आत्मघाताच्या विचारापासून लांब जात राहिला.
परतीचा रस्ता पकडण्यासाठी त्याने ट्रॅफिक कुठे कमी असेल हे बघण्यासाठी मॅप चालू केला. ट्रॅफिकचा अचूक अंदाज मॅपने दाखवला होता. मग इथे एखादी कॅब मिळेल का यासाठी त्याने app सुरू केले आणि काही क्षणात कॅब बुक झाली. App मध्ये सारंगला कुठे जायचे आहे याचे अचूक prediction दाखवले गेले होते. मग हळूच एका कोपऱ्याला एक ऍड दिसली, सारंगने आत्महत्येसाठी जो दोर शॉपिंग साईटवर बघितला होता तोच त्याला “recommendation” मध्ये दिसला अन त्याचं त्यालाच हसू आलं..
“तू कधी मरणार? जणू याचीच आठवण या जाहिराती करून देत होत्या..”
कॅब आली, सारंग आत बसला. मानसिक स्थिती ठीक नसल्याने स्वतःची कार न आणता तो कॅब ने काशीला आला होता. त्याच्या या वागण्याचं त्यालाही विशेष वाटलं, कारला अपघात होऊ नये, आपल्याला थकवा येऊ नये, टेन्शन मुळे डोक्यावर ताण येऊन काही विपरित होऊ नये म्हणून कार आणली नाही, पण प्रत्यक्षात तर मला हेच हवंय ना? अपघात असो वा अटॅक, निमित्त कुठलही असतं तरी अंतिम फळ हे मरणच होतं. मग मरणही सोयीस्कर व्हावं म्हणून हा आटापिटा असेल का??
मानवी स्वभावही कमाल आहे. लांबवर जायची ईच्छा असते पण प्रवास नको असतो, पंचपक्वान्नन हवे असतात पण मधला साजशृंगार नको असतो, मरण हवं असतं पण निमित्त नको असतं..
काशीला गेला ते एक अर्थी बरंच झालं, सारंग आत्मघाताच्या निर्णयापासून परावृत्त झाला होता. प्रवासात तो पुढे काय करायचं याचाच विचार करत होता. त्याला मोबाईलवर पुन्हा एक जाहिरात दिसली. त्याला तश्याच एका दोरीचा, फक्त रंग वेगळा असलेल्याचा फोटो दिसला. “Things you might be interested in..” म्हणून तो फोटो होता. जणू तो सांगत होता। “त्या दोरीने फास नको असेल तर ही घे, हा रंग चांगला आहे, मरताना डोळ्यांना बरं वाटेल हा रंग बघून..”
सारंग स्वतःशीच हसू लागला. त्याचं ते हसणं बघून ड्रायव्हर ला राहवलं नाही, केशव नाव त्याचं. त्याच्या गप्पा मारण्याच्या स्वभावामुळे कंपनी कडून त्याला बऱ्याचदा ताकीद मिळालेली. तेव्हापासून केशव ग्राहकाचा अलगद स्वभाव ओळखत असे आणि मग बोलत असे, नाहीतर एखादा माथेफिरू ग्राहक तात्काळ कंपनीला तक्रार करे.
“साहेब..का हसताय एवढं…”
ड्राईव्हरने असं मोकळेपणाने विचारल्यामुळे सारंगला जरा बरं वाटलं. कित्येक दिवसापासून सारंग कुणाकडे मनमोकळेपणाने बोलला नव्हता. केशव आणि सारंगला अनुकूल अशी सोबत मिळाली होती.
“काही नाही रे,असंच.. काय नाव तुझं??”
“मी केशव..मी स्पष्ट सांगतो.. मला गप्पा मारायला फार आवडतात, एव्हढा मोठा प्रवास, त्यात तोंड बंद ठेवायला किती कंटाळा येतो साहेब म्हणून सांगू.. त्यात एखादा चिडखोर प्रवासी भेटला म्हणजे माझे हालच..तुम्ही कंपनी कडे तक्रार नाही करणार ना??”
“कसली तक्रार?”
“ड्रायव्हर रिकामी बडबड करतो म्हणून??”
“नाही रे..कशाला उगाच तक्रार करू..उलट चांगलंच आहे की..प्रवास कंटाळवाणा होणार नाही..”
“साहेब.. मला एक सवय आहे..प्रवाशाला रस्त्यात भूक लागली, तहान लागली तर मी आणून देत नाही, स्वतः उतरून घेऊन यायचं..तुम्हाला राग आला तरी चालेल..मी फक्त मार्ग दाखवतो, बाकी हालचाल तुम्हालाच करावी लागेल…”
“ठीक आहे रे..त्यात काय एवढं.. माझं मीच जाऊन आणीन..नाव काय म्हणालास तुझं??”
“केशव..”
क्रमशः
(कथा फॉलो करायची असल्यास व लिंकवर न जाता सलग पूर्ण भाग वाचायचे असल्यास नक्की लाईक करा माझ्या फेसबुक पेजला)
1 thought on “भाकित (भाग 2) ©संजना इंगळे”