सांत्वन की खच्चीकरण?

 किशनची वाईट बातमी कळताच पूर्ण गाव जमा झाल होतं.  किशनचं असं अकाली मरण सर्वांनाच एक धक्का होता, जवळची माणसं धाय मोकलून रडत होती, काहीजण अजूनही विश्वास ठेवत नव्हते. अंत्यविधी झाला अन बायकांचा घोळका एका खोलीत बसून राहिला, तो दिवस आत्यंतिक शोकात बुडालेला असल्याने कुणाच्या घशाखाली अन्नही उतरलं नाही. रात्री कशीबशी सर्वांनी झोप काढली. 

दुसऱ्या दिवसापासून ओळखीतली मंडळी भेटायला आली, गावाकडे एक पद्धत असते, वृद्ध महिला गाणं गात रडतात, गाण्यात त्या व्यक्तीचे गुणगान गात असतात. शोक करणाऱ्या स्त्रिया एका खोलीत बसून असतात अन भेटायला येणारे त्यांच्याजवळ बसतात. तिसऱ्या दिवसापासून जवळच्या लोकांनी सत्य स्वीकारलेलं असतं आणि सोबतच मागच्या 2 दिवसात झालेली शारीरिक अन मानसिक हेळसांड त्यांना आता त्रास देत असते. दिवसभर बसून राहिल्याने अंग भरून आलेलं असतं. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला सर्व कहाणी सांगावी लागते. ती गेली अन जरा आडवं झालं की लागलीच दुसरी माणसं भेटायला येतात. किमान 10 दिवस हे सर्व सुरू असतं. जवळची माणसं जरा रुळावर आलेली असतात, भूतकाळ विसरून आता भविष्याचा विचार ती करायला लागतात. गेलेल्या माणसाची आठवण परेशान करतच असते पण स्वतःचं मन ते घट्ट करायचा प्रयत्न करतात .

असंच भेटायला आलेल्या काही स्त्रियांचे संवाद कानी पडले..

“अजून अर्धं आयुष्य काढायचं आहे..कसं होईल बाई तुझं..”

“नवऱ्याशिवाय कसलं आलंय जीवन..काय उपयोग जगून तरी..”

“काहीच वय नव्हतं हो माणसाचं..आता पुढचं सगळंच अवघड झालं बाई..”

त्यांचं बोलणं ऐकून प्रचंड संताप येत होता, या स्त्रिया नक्की कशासाठी येत होत्या? दुःखात बुडालेल्या माणसाला धीर द्यायला की त्यांच्या दुःखात भर घालायला? गेलेल्या व्यक्तीचे आप्त स्वतःला सावरू बघतात, सत्य स्वीकारून पूढे जायचा प्रयत्न करतात, पण दुःखात सहभागी म्हणून भेटायला येणारी माणसं खरोखर किती सहभागी होतात? हीच माणसं अधिक मानसिक क्लेश देतात अन सावरू पाहणाऱ्या व्यक्तीला पुन्हा दुःखाच्या खाईत लोटतात. 

बाहेर बसून आम्ही अश्या स्त्रियांची बोलणी ऐकत होतो. भेटायला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत हे असंच बोलत असणार, त्यांचं खच्चीकरण करत असणार याची आम्हाला खात्री झाली. 

अश्या काही बायका समजूत घालून जायला निघाल्या, आम्ही अश्या एकेका बाईला बाहेर प्रत्यक्ष भेटून दटावायचा प्रयत्न केला..

“आत तुम्ही जे बोललात ते सांत्वन नव्हतं, त्याला मानसिक खच्चीकरण म्हणतात. धीर देता येत नसेल तर किमान मौन बाळगा, पण हे असं तुझं आता काही खरं नाही अर्थाचं वक्तव्य आता बंद करा..”

अश्यांना याच पद्धतीने मुरड घालणं आम्हाला महत्वाचं वाटलं, कारण उद्या असंच दुसऱ्या कुणाचं खच्चीकरण करणारं वक्तव्य करताना ती बाई दहा वेळा विचार करेल. 

4 thoughts on “सांत्वन की खच्चीकरण?”

Leave a Comment