व्हर्जिन

 “आर यु अ व्हर्जिन?”

बघायला आलेल्या बहुतांश मुलांनी तिला हा प्रश्न विचारला होता, मिताली तशी दिसायला अन बोलायला बोल्ड, तिचं मोकळेपणाने वागणं, मैत्रिणींपेक्षा मित्र जास्त असणं आणि रोखठोक बोलणं यामुळे मुलं मुद्दामहून तिला हा प्रश्न विचारत आणि तिचं उत्तर ठरलेलं असायचं..

“नाही…”

या एका उत्तरामुळे तिला नकार तर पचवावाच लागे पण इकडे आई वडिलांना समजेना की नेमक्या कोणत्या कारणामुळे मुलं हिला नकार देताय.मिताली अगदी टॉम बॉय, मुलांना जी कामं जमायची नाही ती हिला सराईतपणे यायची. गाडी दुरुस्त करणं, इलेक्ट्रिक दुरुस्त्या करणं, आर्थिक व्यवहारांची माहिती असणं. मिताली चं लग्न जमत नव्हतं, आई वडिलांनी तिला तिच्या ओळखीत कुणी मुलगा आहे का, तिच्या मित्रांमधील एखादा आवडतो का असं विचारायला सुरवात केली, शेवटी मुलगा कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी चालेल या निर्णयापर्यंत आई वडील पोहोचले होते, पण तिचं उत्तर “मला कुणीही आवडत नाही, तुम्ही जो मुलगा बघाल त्याच्याशी मी लग्न करेन” हेच ती सांगत असायची. हा तिचा आज्ञाधारकपणा आई वडिलांना आता बोचू लागलेला. त्यांना असं वाटे की एकदाचं हिने एखाद्या मुलाशी सूत जुळवावं आणि लग्न करून मोकळं व्हावं.

अश्यातच तिच्या वडिलांचे मित्र आणि त्यांचा मुलगा अक्षय, दमण वरून खास एका कामानिमित्त साताऱ्याला आलेले. साताऱ्याला आले म्हणजे ते मितालीच्या घरी येणारच, यावेळी त्यांचा मुलगाही सोबत होता. 

दोघेही घरी आले तेव्हा मिताली त्यांच्या चारचाकीखाली अर्धवट अंग बाहेर ठेऊन आत काहीतरी दुरुस्त करत होती, 

“ए मुला, दळवी इथेच राहतात ना??”

“हो इथेच राहतात..”

मिताली बाहेर आली तसं दोघेजण तिच्याकडे बघतच राहिले, अक्षयला तिचं खास कौतुक वाटलं, दोघांची नजरानजर झाली, पहिल्याच भेटीत दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झालं. अक्षयच्या वडिलांनी हे हेरलं अन दोघांचं सुत जुळलं तर? असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला..

मितालीच्या वडिलांनी मित्राचा खास पाहुणचार केला, मग मित्राने संकोचत विषय काढला..

“हे बघ अनिल, म्हणजे बघ तुला पटत असेल तर..तुझी मुलगी माझ्या घरात आली तर आपल्या मैत्रीचं नात्यात रूपांतर होईल..दोघेही तरुण आहेत, एकमेकांना शोभतील असे आहेत..”

“अरे असं झालं तर आनंदच आहे आम्हाला..”

मितालीची आई खुश होते,

“आत्ताच कार्यक्रम करून टाकू बघण्याचा..”

आई मितालीला तयार करून आणते, मितालीला अक्षय आवडलेला असतोच पण जेव्हा दोघांना एकत्र बोलायला बाहेर जावं लागणार तेव्हा हमखास अक्षय हे विचारणार आणि लग्न फिस्कटणार हेही ती जाणून होती.

दोघांनाही बोलायला बाहेत पाठवलं गेलं. अक्षयच्या बोलक्या आणि विनोदी स्वभावाने मितालीला भुरळ घातली, गप्पा झाल्यावर अक्षय म्हणाला,

“जाऊया आता??”

“का? तुला अजून काही प्रश्न नाहीत?”

“झालेत माझे प्रश्न विचारून..”

“सॉरी पण बघायला येणारा प्रत्येक मुलगा मला एक प्रश्न हमखास विचारतो, आर यु अ व्हर्जिन म्हणून..”

“अच्छा…चल मीही विचारतो.. तू मनाने व्हर्जिन आहेस??”

“मनाने व्हर्जिन?? म्हणजे??”

“म्हणजे जर तुझं मन कोरं करकरीत असेल, ज्यात माझ्यासाठी एक जागा असेल, मला स्वीकारण्याचा आनंद असेल, सोबत आयुष्य जगण्याची इच्छा असेल, एकमेकांबद्दल विश्वास असेल, मला नवरा म्हणून स्वीकारायची राजीखुशी असेल तर…माझ्यासाठी तू मनाने व्हर्जिन आहेस..”

“आणि शरीराने??”

“त्याने मला फरक नाही पडत, कुणाच्या आयुष्यात या आधी काही झालं असेल, जाणूनबुजून झालं असेल किंवा अत्याचाराने झालं असेल.. त्याला आपण नियंत्रित करू शकत नाही, माणसाला मी त्याच्या वर्तमानात बघतो.. भूतकाळात नाही..”

मितालीला समजलं, असाच जोडीदार हवा होता आपल्याला…

“खूप मुलं बघितली मी आजवर, पण तुझ्यासारखा समजूतदार मुलगा मी बघितला नव्हता..जो जो मला हा प्रश्न विचारायचा त्याची नियत मला समजून जायची अन मी त्याला “नाही” असं उत्तर द्यायची, नकार ठरलेला असायचा …मी व्हर्जिन नाही, होय..कारण लहानपणी बाबांची सायकल चालवत असताना माझा अपघात झालेला..नाजूक जागेवर मार लागून जखम झालेली..रक्तस्राव झालेला..पण हे कारण समजावून सांगण्याची समोरच्याची कुणाचीच लायकी नसायची…असो, मला तू पसंत आहे हे आताच सांगून टाकते तुला..”

अक्षय हसला..दोघेही बाहेर जाताच अक्षय वडिलांना सांगतो..

“बाबा, मला मिताली पसंत आहे..आता लग्नाची तारीख पक्की करून मगच जाऊ..”

4 thoughts on “व्हर्जिन”

Leave a Comment