ती सहा पत्र

त्या सहा पत्रांनी तिचा संसार पूर्ण विस्कळीत केला होता. देव जाणे कोणी कुठून ती पत्रं पाठवली होती, घराच्या लेटरबॉक्स मधून ती पत्र नवऱ्याच्या हाती लागली अन सुरू झाला संशयाचा खेळ.

माधुरी एका साधारण गावातील मुलगी, नाकापुढे चालणारी, सुंदर, बऱ्यापैकी शिकलेली. गावात सर्वात भारी स्थळ कुणाला मिळालं असेल तर ते माधुरीला. शहरातून आलेलं स्थळ, त्यात मुलाला सरकारी नोकरी, चाळीस हजार पगार. मुलाची बदली या शहरातून त्या शहरात, आई वडील गावाला.. त्यामुळे फारशी कामं नाही. धुमधडाक्यात लग्न होऊन माधुरी हेमंत सोबत संसार थाटायला शहरात आली. हेमंतने आधीच एक छानसं घर बघून ठेवलं होतं. खाली 2 आणि वर 2 अश्या चार खोल्यांचा छोटासा बंगलाच होता तो, घरमालक परदेशी असल्याने सर्व खोल्या भाड्याने तो द्यायचा, हेमंतचीही पुन्हा बदलीची शक्यता असल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर घर घेतलं अन दोघेही नव्या घरात रवाना झाले. माधुरीने इतकं सुंदर आणि मोठं घर माधुरीने पहिल्यांदाच बघितलं होतं, अचानक असा राजयोग प्राप्त झाल्याने ती हुरळून गेली होती. शहरातील राहणीमान तिने लवकर अंगिकारलं, कुठल्याही कारणाने नवऱ्याची मान आपल्यामुळे खाली जाऊ नये याची ती काळजी घेई. नवऱ्यालाही तिचं असं काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागणं आवडत होतं. 

घराच्या बाहेर एक लेटरबॉक्स होतं, हेमंतने आपला नवीन पत्ता नोंद केला अन त्याच्या कामाची सर्व कागदपत्रे त्याला घरी येत, त्याचं कामच असं होतं की आठवड्यातून दोनदा ते लेटरबॉक्स चेक करावं लागे. 

असंच एकदा ते चेक करत असताना एक सुवासिक आणि डिजाईन मधल्या एन्व्हलप मध्ये एक लेटर मिळालं, ते वाचून हेमंतचा तिळपापड झाला, ओरडतच तो आत गेला..

“माधुरी… बाहेर ये लवकर..”

हेमंतचा असा आवाज ऐकून माधुरी घाबरूनच बाहेर आली..

“काय झालं?”

“हे काय आहे?”

“काय?”

“वाच..”

“प्रिय माधुरी, गेले कित्येक दिवस आपली भेट झाली नाही, तू दूर गेलीस की माझा जीव नुसता कासावीस होतो, जन्मभर एकमेकांची साथ निभावण्याची वचनं दिली होती आपण एकमेकांना, आता हा दुरावा नाही सहन होत, लवकर ये भेटायला..तुझाच, सुधीर..”

हे वाचून माधुरीला धक्का बसतो, शाळा कॉलेजात मुलांशी कधी बोलली नाही, परक्या पुरुषाकडे मान वर करून पाहिलं नाही आणि हे अचानक..कोण हा सुधीर? त्याला माझा पत्ता कसा मिळाला? या नावाचा आणि तिचा दूरवर संबंध नव्हता. तिने सर्व प्रकारे हेमंतला समजवायचा प्रयत्न केला, गयावया केल्या पण हेमंतने तिच्याशी अबोला धरला. जवळपास सहा दिवस ही पत्र येत गेली आणि आता मात्र हेमंतचा धीर सुटला, त्याने धक्के मारत तिला बाहेर काढलं, खरं खोटं करण्याची तसदीही त्याने घेतली नाही, तिने खूप गयावया केल्या..त्याने ऐकलं नाही, शेवटी तिने सांगितलं.

“मी निर्दोष आहे, पवित्र आहे…याच पवित्र्यतेची शपथ घेऊन सांगते, उद्या तूच मला न्यायला येशील पण मी तुझ्या सावलीलाही भीक घालणार नाही..”

हेमंतला तिला परत आणायचं नव्हतंच, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक मुलगी घरी आली.

“कोण आपण? काय पाहिजे?”

“नमस्कार, तुमच्या आधी मी या घरात भाड्याने राहायचे, माझ्या याच पत्त्यावर सर्व पत्र आली असणार..तीच घ्यायला आलीय..”

हेमंतला शंका आली..

“काय नाव आपलं?”

“माधुरी..”

“माधुरी शिंदे? बायकोचं नाव आणि आडनाव माझ्यासारखं? योगायोग असावा पण इतका?? आणि हा सुधीर को ??”

माधुरी लाजून म्हणाली..

“सुधीर म्हणजे माझा होणारा नवरा..”

हेमंतने आत जाऊन ती सहा पत्र आणून तिच्या तोंडावर मारली आणि खाडकन दार लावून घेतलं. आपण हे काय करून बसलो? काहीही करून माधुरीची माफी मागून तिला परत आणायला हवं..पण त्याला तिचे शब्द आठवले..

“परत आलात तर तुमच्या सावलीलाही भीक घालणार नाही..”

गैरसमजाची कीड लागली की ती नाती पोखरत जाते, आणि जेव्हा सत्य समोर येतं तोवर वेळ निघून गेलेली असते. 

1 thought on “ती सहा पत्र”

Leave a Comment