निशिता आज घराबाहेर पडली ते पोलिसात तक्रार करण्यासाठीच. घरात सासूचा रोज रोजचा त्रास आता सहन करण्यापलीकडे होता. एरवी दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणून भरपूर दुर्लक्ष केलं, पण जित्याची खोड मेल्यावाचून काही जात नाही असं म्हणत ती आज सोक्षमोक्ष करायलाच निघाली. घरगुती हिंसाचारामध्ये मानसिक हिंसाचारही येतो आणि त्याला शिक्षेचीही तरतूद आहे, ही शिक्षा झाल्याशिवाय सासू ताळ्यावर येणार नाही हेच निशिताने आज ठरवलं. नवऱ्याला काही सांगितलं तर तो फक्त हसायचा, काहीही करायचा नाही .
पोलीस स्टेशनला जाताच एका लेडी कॉन्स्टेबलने तिला एका ठिकाणी बोट दाखवून तक्रार करायला सांगितली.
“हं मॅडम बोला, काय तक्रार आहे तुमची?”
“माझ्या सासुविरुद्ध तक्रार करायची आहे..”
“काय केलं त्यांनी?”
“सतत मानसिक त्रास देताय..”
कुटुंबातील आणि त्यातल्या त्यात सासूची तक्रार ऐकल्यावर काही महिला कॉन्स्टेबल कुतूहलाने पुढे येऊन ऐकू लागल्या.
“नक्की काय आणि कसा त्रास देताय सविस्तर सांगा..”
“मी अंघोळीला गेले तर दरवाजाबाहेर उभं राहून सतत पाळत ठेवतात, मिनिटा मिनिटाने आवाज देतात…झालं का? किती वेळ अंघोळ? इतका वेळ कशाला बसते?”
“अश्याच असता या सासवा..” एक महिला कॉन्स्टेबल पुटपुटली..अधिकाऱ्याने वर मान करून पाहिलं तेव्हा ती जरा ओशाळली.
“मला माहेरी मनसोक्त अंघोळ करायची सवय, इथे पाच मिनिटात उरकावी लागते..तेही कशीबशी..”
“बरं.. अजून?”
“एके दिवशी माझ्या हातून भांड्याचा साबण मोरीत वाहून गेला..फिल्टर नसल्याने तो काढता येणार नव्हता..मग मी भांडी तशीच ठेऊन बाहेर गेले. आईचं घर जवळच असल्याने तिला भेटून आले, तिथून निघताना आईला म्हटलं की जाता जाता भांड्याचा साबण घ्यायचा आहे, आई म्हणाली आता कुठे थांबत बसतेस, माझ्याकडे आहे नवीन डझनभर, घेऊन जा एखादा..”
“बरं मग?”
“मी आईकडून साबण आणला आणि भांडी घासू लागले. मी भांडी तशीच सोडून गेले म्हणून सासूला राग आला. त्यांनी माझ्या हातातला साबण हिसकवला आणि माझ्या घरी जाऊन माझ्या आईकडे रागारागाने दिला”
“काय विचित्र बाई आहे, ही काय पद्धत आहे वागण्याची?”
महिला कॉन्स्टेबल पुन्हा बोलली.
“त्यांच्या याच वागण्याचा मला भयंकर त्रास होतोय, मानसिक आजार लागून जाईल मला..डिप्रेशन मध्ये जाईल मी..”
“हे बघा मॅडम, घरगुती वाद हे आम्ही समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करतो, जर त्याने फरक पडला नाही तर आम्ही योग्य ती ऍक्शन घेऊ..”
निशिता तक्रार करून बाहेर पडली. रागाच्या भरात आपण जरा अतिच केलं नाही ना असं तिला वाटू लागलं. ती घरी गेली, सासूबाई कुणाशीतरी फोनवर बोलत होत्या. नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी चुगली करत असणार म्हणून तिने हळूच फोन रेकॉर्डिंग ला लावून तिथे ठेवला.
थोड्या वेळाने तिने फोन घेतला आणि रेकॉर्डिंग हेडफोन लावून ऐकू लागली..
“खूप काळजी वाटते सर्वांची, सिर सलामत तो पगडी पचास म्हणतात ते खोटं नाही. आजकाल इतकं काही काही ऐकू येतं ना की माणसाचं कधी काय होईल सांगता येत नाही. आता मागेच बघा ना, आमच्या बिल्डिंग मध्ये एक बाई गॅस गिझर मुळे बाथरुम मधेच बेशुद्ध झाली. वेळीच समजलं म्हणून, नाहीतर काही खरं नव्हतं तिचं. म्हणूनच माझी सुनबाई अंघोळीला बसली की मी बाहेरच थांबते. काय? सूनबाईवर खूप जीव आहे असं म्हणता? हो मग, असणारच ना, एकुलती एक सून आहे माझी..मुलगीच म्हण…आता आधीसारखं नाही राहिलं सासू सुनेचं नातं.. माझ्या सासूने नाही का, माझ्याकडून भांड्याच्या साबण एकदा पाण्यात राहून विरघळून गेलेला तर माझ्या सासूने मला माहेरी पाठवून नवीन साबण आणायला लावलेला. असा राग आला होता माझ्या सासूचा मला, काय सांगू… माझ्याशी भांडून 2 साबण आणायला लावले तिने..पण आजकाल असं कुणी वागायला गेलं की माझा स्वतःवर ताबा राहत नाही. माझी सून शिकलेली आहे तरी सगळं ऐकते..नाहीतर आजकालच्या सुना, सासू जरा काही बोलली की लगेच तक्रार करतात म्हणे..”
निशिता एकदम गडबडून गेली, तिला सुचेना काय करावं. सासूबाईंच्या वागण्यामागे त्यांचं प्रेमच होतं, पण आपण चुकीचा अर्थ घेतला..आणि पोलिसात तक्रारही देऊन आलो..नाही नाही, हे काय केलं मी..मीच नालायक, मीच मूर्ख..ते काही नाही, मला आत्ताच्या आत्ता जाऊन तक्रार मागे घ्यावी लागेल. ती तशीच उठली आणि बाहेर जायला निघाली..
“सुनबाई कुठे निघालीस?”
“तक्रार मागे घ्यायला??”
“काय?????”
निशिता जीभ चावते..
“मागे घ्यायला…मागे..मागे…मागच्या गल्लीत परकर आलेत विकायला, ते घ्यायला जातेय..”
निशिता तक्रार मागे घेते अन तिचा जीव भांड्यात पडतो. सुनबाईने इतका वेळ लावूनही एकही परकर विकत घेतला का नाही हा विचार अजूनही सासुबाई करत आहेत..
खूप छान