धाकली सून

 घरातली थोरली सून, तिच्या आई वडिलांची एकुलती एक म्हणून दोन्हीकडे लाडाची. सासरी लाडकी यासाठी कारण तिने येताना घरात सर्व सुखसोयी आणल्या होत्या, माहेराहून दरमहा पैसेही मिळायचे आणि सोबतच माहेरच्या संपत्तीचा वारस म्हणून तीच. त्यामुळे लालची सासरच्या मंडळींनी तिला अगदी फुलासारखं जपलेलं. ती येताच घराचं रूप पालटून गेलेलं, पैसा हातात खेळू लागला, नवऱ्याने आणि सासूने स्वाभिमान बाजूला ठेऊन केवळ स्वार्थ पाहिला होता. शर्मिलाला माहेरच्या जीवावर इतका पैसा मिळाला असला तरी घरचे मात्र तिला “लक्ष्मी” म्हणत. कारण तिनेच या घरात हिरव्या नोटांची चळत भरली होती.

सासऱ्यांना मात्र हे आवडत नसे, मुलांनी त्यांच्या जीवावर कमवावं, सूनबाईने स्वाभिमानाने माहेरचे पैसे नाकारावे आणि स्वतःच्या जीवावर कमवून दाखवावं असं त्यांना वाटे. पण राणी सारख्या राहणाऱ्या शर्मिलाला कष्टाशी ओळखच नव्हती. अतीलाडाने बिघडलेली अन अभ्यासाशी दोन हात लांब राहून फक्त मजा उपभोगणाऱ्या शर्मिलाला केतन पसंत होता. केतनने बायकोची संपत्ती बघून तिच्या इतर दुर्गुणांकडे दुर्लक्ष तर केलंच, आणि तिच्या आई वडिलांनीही मुलीच्या सुखाखातर सर्व गोष्टी तिला पुरवल्या.

घरात धाकटी सून आली, हिला मात्र सासरेबुवांनी पसंत केलेलं. तिचे गुण बघून. पाठीवर 2 बहिणी असलेली ही गिरीजा. काटकसर करणारी, गरिबीत दिवस काढून, कष्टाने अभ्यास करून आणि नोकरी मिळवून कमावणारी ही गिरीजा. पैशाची तिला किंमत होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने साधेपणाने लग्न झालं.

लग्न तर झालं पण थोरल्या सुनेने आणि सासूबाईंनी तिला बोल लावायला सुरवात केली..

“आमच्या थोरल्या सुनेने लक्ष्मीगत घरात दहा वस्तू आणल्या.. आई वडिलांनी काहीही कसूर ठेवली नव्हती हो..”

“माझे आई बाबा देतात मला महिना 20 हजार खर्चाला. मला नाही बाई गरज पडत नोकरी करून मरमर करण्याची..”

थोडक्यात गिरीजाने माहेराहून काहीही आणलं नाही म्हणून तिचा दुस्वास केला जात होता. सासरेबुवांनी कानउघाडणी केली असली तरी त्यांच्या अनुपस्थितीत या दोघी बरोबर तिला कात्रीत पकडत.

गिरीजा हुषार होती, शांत होती. हा पैसा फार काळ टिकणार नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती शांतपणे आपापलं काम करत असे. मोठी सून आणि सासूबाई दिवसभर tv बघत आणि गिरीजा घरातलं सगळं आवरून नोकरीलाही जाई. माहेरी हेच सगळं करत असल्याची सवय तिला होतीच.

एके दिवशी समजलं, की शर्मिलाच्या माहेरी फार मोठा प्रॉब्लेम झालाय, बँकेची लोकं येऊन गेले. व्यवसायासाठी काढलेलं कर्ज थकलं होतं आणि व्यवसाय अचानक कमी झाल्याने ते फेडणं अशक्य होत होतं.

शर्मिलाला मिळणारे पैसे बंद झाले तशी ती बैचेन झाली. तिची चिडचिड होऊ लागली. दिवाळी तोंडावर आली, दर दिवाळीला दोन्ही सासू सुना 30 हजार ची खरेदी करत, यावेळी मात्र त्यांना गप बसावं लागणार होतं. सासूबाईंचंही वागणं आता बदललं, शर्मिलाचे दुर्गुण त्यांना आता कुठे दिसू लागले. शर्मिला ऐकून घेणाऱ्यातली नव्हती, तीही उत्तरं द्यायची..परिणामी सासू सुनात वाद होऊ लागला आणि घरातलं वातावरण तापू लागलं.

दिवाळीला चार दिवस बाकी असताना गिरीजा दोघींकडे गेली..

“दरवेळी तुम्ही दिवाळी अगदी जोरात साजरी करतात असं ऐकलं,  करायलाच हवी. हा सणच आनंदाचा आहे”

दोघी एकमेकीकडे पाहू लागल्या, पैशा अभावी यावेळी तुटक तुटकच खरेदी करावी लागणार होती. 

“हे घ्या, तीस हजार रुपये..दरवेळी जशी खरेदी करतात तशी करून या..”

“अगं पण..”

“माझ्या कमाईचे पैसे आहेत, माझ्या माणसांसाठी नाही तर कुणासाठी? आणि मला साधेपणाने दिवाळी करायची सवय आहे, त्यामुळे तुम्ही दोघी जा आणि मनसोक्त खरेदी करा..”

एवढं सांगून गिरीजा निघून गेली. सासूच्या डोळ्यात पाणी आलं आणि थोरल्या सुनेच्या डोळ्यात झणझणीत अंजन गेलं. सासरेबुवा म्हणाले..

“दुसऱ्याचं धन आपल्या दारात आणून टाकते ती लक्ष्मी नसते, स्वतःच्या कष्टाने पै पै जमा करून आपल्या लोकांचा जी विचार करते ती खरी लक्ष्मी..”

3 thoughts on “धाकली सून”

Leave a Comment