भाग 1
सुरजच्या आई वडिलांनी बोलावलं म्हणून परेश घरी आला. हळूच सुरजच्या खोलीबाहेर उभं राहून सुरजचं स्वतःशीच चालू असलेलं बोलणं त्याने ऐकलं. परेशलाही काळजी वाटू लागली. आपला मित्र इतका हळवा याआधी कधीच झाला नव्हता. आता काहीही झालं तरी कोमल त्याच्या मनातून जाणार नव्हती.
परेश दार नॉक न करता आत येतो, सूरज दचकतो..बडबड करत असताना परेश आला म्हणून सुरजला स्वतःचीच लाज वाटू लागते, तो सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो..
“अरे ये…मी की नाही असेच वेडे चाळे करत असतो आरशासमोर..”
“सूरज.. मला समजलं आहे सगळं..”
“कसलं..कोमल चं? अरे सोड..काय धरून बसलाय ते..”
“मी धरून बसलोय? वेड्यासारखं कोण वागतय?”
सूरज इतका वेळ मनात दाबून बसलेलं दुःखं परेश समोर एकदम मोकळं करतो..एकदम रडायला लागतो..परेश त्याच्या या वागण्याने एकदम हादरून जातो..
“सूरज? अरे तू रडतोय? हा कुठला सूरज बघतोय मी?कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल च्या नाकी दम आणणारा..ज्याला जगाची फिकीर नाही असा एक हुशार मुलगा..आज हा कुठला सूरज बघतोय मी?”
परेशच्या या वाक्याने सूरजला जरा उभारी येते. तो डोळे पुसतो.. परेशला सांगू लागतो..
“आयुष्यात कितीतरी मुली आल्या, त्यांच्याशी बोलणं सोड पण त्यांच्याकडे बघूही वाटलं नाही. पण कोमल मात्र तशी वाटली नाही, तिची करारी नजर, तिच्या शब्दातली धार…असं वाटत होतं जणू माझ्या सावलीलाच मी बघतोय.. त्याक्षणी तिला माझं हृदय देऊन बसलो मी.खूप स्वप्न रंगवायला लागलो..पण आता ती माझी नसेल या विचारांनी मनात काहूर उठलंय..”
“कोण म्हणालं की ती तुझी नसेल म्हणून?”
परेशच्या या बोलण्यात सुरजला आशेचा किरण दिसू लागतो..
“म्हणजे?”
“म्हणजे.. आठवतय का…मिशन कॉम्प्युटर लॅब…”
दोघेही भूतकाळात हरवतात..
(फ्लॅशबॅक)
इंजिनिअरिंग च्या कॉम्प्युटर ब्रँच ची प्रॅक्टिकल exam होती. पेनड्राईव्ह मध्ये सर्व प्रोग्राम लोड करून घ्यायचे आणि प्रॅक्टिकल च्या वेळेस ते प्रोग्राम कॉपी करून घ्यायचे अशीच नेहमी exam असायची. पण यावेळी नवीन आलेले पुराणिक सर मात्र खूप हुशार होते, त्यांना हा प्रकार लक्षात आला. या batch च्या वेळी त्यांनी लॅब मधील सर्व CPU पेनड्राईव्ह युनिट बंद केले, पेन ड्राईव्ह लावला तरी डेटा दिसणार नव्हता. इंटरनेट सुद्धा बंद केलं गेलं. मुलं परीक्षेला बसली, नेहमीप्रमाणे गपचूप पेन ड्राईव्ह लावला गेला आणि मुलं घाबरली, एकाचाही पेनड्राईव्ह चालत नव्हता. तेवढ्यात सर म्हणाले,
“ज्याचा प्रोग्रॅम रन होणार नाही तो इंटर्नल मध्ये नापास..”
आता मात्र मुलांची धांदल उडाली, आजवर एकही प्रॅक्टिकल असं केलं नव्हतं. आता करणार काय? पहिले 30 रोल नंबर आत होते आणि बाकीचे बाहेर. एकाने हळूच मोबाईल काढून ग्रुप वर टाकलं की पेनड्राईव्ह वर्क होत नाहीये. सर्वजण सूरजजवळ जातात.लॅब मधील असिस्टंट प्रोफेसर त्याच्या ओळखीचे असतात. त्यांना फूस लावून सूरज सर्व्हर admin ला लॉगिन करून इंटर्नल सर्व्हर वर सर्व प्रोग्राम अपलोड करतो. सूरज ग्रुप वर त्याची लिंक देतो. ज्या मुलाने मोबाईल लॅब मध्ये नेलेला असतो तो ती लिंक URL मध्ये टाइप करतो आणि सर्व प्रोग्राम दिसू लागतात. हळूहळू सर्वांना ती लिंक कुजबुजत सांगितली जाते आणि सर्वांना कोड मिळतो. पुराणिक सर एकदम चक्रावतात. हे कसं झालं? पण सुरज ने ते शक्य केलं होतं..
“आठवलं का सूरज? अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी लोकं तुला साकडं घालायची.. आणि इतक्या साध्या गोष्टीला तू हातपाय गाळून बसला..”
“मग काय करायचं मी आता? तूच सांग..”
“एल्गार..”
“कसला..”
“कोमलला जिंकण्याचा..”
“अरे तिने नकार कळवलाय..”
“तोच नकार होकारात बदलायचा..”
“कसा?”
“तिने नकार का दिला याचं कारण आधी शोधायचं..”
सूरज आणि परेश मध्ये बराच काळ चर्चा होते. परेश आल्यामुळे सूरजची मनस्थिती चांगली होते. दोघेही गाडी काढून निघतात. सर्वात आधी ज्यांनी स्थळ सुचवलं होतं त्या भाऊसाहेबांना भेटले.
“सॉरी काका तुम्हाला त्रास देतोय, पण आम्हाला समजेल का की सुरजला नकार का आलाय ते?”
भाऊसाहेब गोंधळात सापडतात. यांना कसं सांगणार की त्याच दिवशी दुसरा अमेरिकेतला एक मुलगा बघायला आला आणि तो जास्त श्रीमंत होता म्हणून तुम्हाला नकार दिला असं? भाऊसाहेबांना हे सांगणं ठीक वाटलं नाही. त्यांनी दुसरं कारण सांगितलं..
“नकार द्यायचं कारण की..पत्रिका जुळत नव्हती..”
“धत तेरे की..एवढंच ना.. आत्ता जुळून जाईल बघा..अहो पत्रिकेवर कोण विश्वास ठेवतं आजकाल? आमच्याकडे एक ब्राह्मण आहेत ते जुळवून देतात पत्रिका…त्यांनाच आणतो बघा..”
“अहो नाही नाही…म्हणजे..मुलाचा रंग उजळ हवा होता अजून..म्हणून..”
“इतका गोरा तर आहे..अजून किती गोरा पाहिजे? थांब, मी माझ्या एका स्किन स्पेशालिस्ट मित्राला फोन करतो, त्याच्याकडे फेयरनेस ट्रीटमेंट आहे…”
“अहो नाही नाही..कारण वेगळंच आहे..”
“काय??”
भाऊसाहेब खूप विचारात पडतात.. शेवटी एक भन्नाट कारण त्यांना सुचतं.. ते एका दमात बोलून टाकतात..
“मुलाला बहीण नाही म्हणून..”
_____
सूरज आणि परेश मान खाली घालून सुरजच्या आई वडिलांसमोर उभे..
“अरे लाजा कश्या वाटत नाहीत तुम्हाला आई बापाकडे असलं काही मागताना..तुमची पोरं खेळवायची सोडून आता आम्ही पोरं जन्माला घालू?”
“बाबा आम्ही थांबू की तोवर..”
“गप्प बसा…कुठून हे खुळ उचलून आणलंय देव जाणे..”
“काका मी काय म्हणतो..तुम्हाला शक्य नसेल तर एक दत्तक मुलगी घेऊन टाका की..”
“अरे काय लावलंय तुम्ही? आणि …आणि शक्य नसेल म्हणजे??? मी म्हातारा झालो काय…” बाबा पेटून उठतात..
“मग बाबा द्या की मला एक बहीण.”
बाबा आता जोडा काढून सुरजच्या मागे धावायला लागतात. आई वैतागून आत निघून जाते. परेश डोक्याला हात लावून बसतो. तोच दारात समिधा येते. समिधा सुरजची चुलत बहीण..त्याच्याहून चार वर्षांनी लहान. घराण्यात तेवढी एकच मुलगी त्यामुळे अत्यंत लाडाची. काका काकूंचीही ती अगदी जीव की प्राण. तिचं सतत काका काकूंकडे येणं जाणं असायचं.. तिला दारात उभी बघताच परेश एकटक तिच्याकडे बघत राहतो. सूरजला समिधा दिसताच तो एका जागी उभं राहून बघतो आणि अचानक ओरडतो…
“मिळाली…बहीण मिळाली…”
परेश आणि बाबा त्याच्याकडे बघतात.
“समिधा..आजपासून तुझे आई वडील चेंज…तू इथेच राहायचं..निदान माझं लग्न होईपर्यंत तरी..”
“काय बोलतोय दादा तू?”
“परेश…बहीण मिळाली…दे टाळी… परेश..परेश??”
“हं??” समिधा वरून नजर हटत नसलेला परेश भानावर येतो..
________
दुसऱ्या दिवशी तिघेही ट्रिपल सीट बसून कोमलच्या घरी रवाना होतात.
“दादा मला कळेल का कुठे जातोय आपण?”
“तू फक्त एवढं सांग की तू माझी बहिण आहे..”
“सांग म्हणजे? आहेच की तुझी बहीण..”
“अगं सख्खी बहीण…”
“अरे पण काय चाललंय हे सगळं?”
“समजेल, तू सांगितलं तेवढं कर फक्त..”
“बरं..”
सर्वजण कोमलच्या घरासमोर जाऊन गाडी लावतात. तिघेही उतरतात, सूरज कपडे आणि केस व्यवस्थित करतो. कोमलचे बाबा चक्रावतात, सूरज अचानक असा घरी? गाडीचा आवाज ऐकून कोमलही बाहेर येते..
“नमस्कार काका, मला ओळखलं? आणि ही माझी बहिण..समिधा. बायोडेटावर हिचं नाव टाकायचं राहिलं होतं”
कोमलच्या बाबांना काहीएक कळत नव्हतं.कोमल बाहेर आली,
“सूरज…काय आहे हे सगळं?”
“बहीण…माझी सख्खी बहीण आहे ना ही..”
“मग?”
“मग? अरे मग काय.. तुम्हाला हेच हवं होतं ना?”
प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे कोमलच्या लक्षात आलं. तिने सुरजला बाजूला बोलावलं आणि विचारलं..
“सूरज काय प्रकार आहे हा सगळा?”
“तुम्ही मला यासाठी नकार दिला ना की मला बहीण नाही म्हणून? ही काय, माझी बहिण..”
“सूरज एक मिनिट…हे कुणी सांगितलं तुला?”
“ते…भाऊसाहेब… म्हणाले..”
“सूरज तसं काहीही नाहीये, खरं काय आहे ते मी तुला सांगते… तुम्ही मला पाहून गेले त्याच दिवशी संध्याकाळी मला एक मुलगा बघायला आला. अमेरिकेत असतो, चांगला पगार आहे त्याला..”
“या कारणासाठी मला नकार दिला?”
“तुला मी अशी मुलगी वाटली का रे? की पैशासाठी आवडता मुलगा सोडेल?..आय मिन…आई वडिलांचा…आवडता..”
“एक मिनिट… परत बोल…”
“सांगितलं ना, आई वडिलांना तू आवडलेला..पण.. त्याची अट आहे की लग्नानंतर लगेच तो अमेरिकेला जाणार, मला इथेच राहावं लागेल.पाच वर्षांनी मला घेऊन जाईल..”
“काय? ही काय फालतुगिरी? लग्न म्हणजे हे असं असतं काय, लग्न होतं त्याक्षणी मुलगा मुलगी एकरूप होतात, बायकोची जबाबदारी ही मुलाची बनते, तिचं सुख दुःखं तो निस्तरतो..एकमेकांची सावली बनून जगावं लागतं. ते सोडून अमेरीकेत पाच वर्षे राहणं महत्वाचं वाटतं त्याला?”
कोमल त्याच्या या बोलण्यानें काहीवेळ हुरळून जाते..पण लगेच भानावर येते अन त्याला सांगते…
“त्याचं तिकडे तो काहीही करो..पण ही पाच वर्षे माझ्यासाठी महत्वाची आहेत. मला इथेच राहून आई वडिलांचं कर्ज आणि बहिणींची जबाबदारी पूर्ण करता येईल..”
क्रमशः
खूप छान