खेळ मांडला (भाग 25 अंतिम)

#खेळ_मांडला (भाग 25 अंतिम)

आरोही आणि नकुलच्या सहजीवनाची नवीन सुरवात झाली होती. चाळीशी ओलांडल्यानंतर आरोहीला नकुलच्या चांगुलपणावर प्रेम जडलं होतं. दुसरा कुणी असता तर अश्या अवस्थेत सोडून गेला असता..ज्याची बायको लग्नाअगोदर गरोदर होती, जिला आता मूल होऊ शकत नाही अश्या स्त्रीला त्याने पदरात घेतलं आणि तिला जपलं. आरोही मात्र स्वतःच्याच चौकटीत जगत होती. नकुलच्या छत्राखाली तिला खूप सुरक्षित वाटत होतं. एखाद्याच्या आयुष्यात देवदूत धावून यावा तसा नकुल आरोहीच्या आयुष्यात आला होता. आरोहीची स्मृती परत आल्यानंतर तिने मौन बाळगलं होतं, तिला अनामिक भीती होती नकुलने तिला दूर सारण्याची, पण नकुल मात्र सगळं जाणून होता आणि तरीही त्याने आरोहीला कधीही एकटं सोडलं नव्हतं.

तिकडे मानवची बायको पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. खरं तर मानवने तिला आरोहिबद्दल सर्वकाही सांगितलं होतं पण गोष्ट इतकी पुढे गेली असेल हे तिला माहीत नव्हतं. मानव आर्वी आणि शुभमला त्यांच्या एका नातेवाईकाकडे काही दिवस पाठवून देतो. या सगळ्या घटनेनंतर दोघांवर वाईट परिणाम नको हेच मानवला वाटत होतं. मानवची बायको घरात अबोला धरते, एका जागेवर बसून शून्यात नजर टाकून असते. मानव तिची समजूत घालायला जातो..

“मला माहितीये या क्षणी तुला काय वाटत असेल..तुला खरं सांगतो, मलाही कल्पना नव्हती की आरोही गरोदर… ते सगळं प्रकरण झालं आणि मला काहीही खबर लागली नाही..आणि आज हे सगळं मला समजलं..मला माफ कर..”

“माझा राग तुमच्यावर नाहीये मानव, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडावं?”

“दैवाने असा खेळ मांडून ठेवलाय की त्याला अंत नाही..”

सरिता मावशी तिच्यासाठी ज्यूस घेऊन येते..

“ताई हे घ्या, तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लं नाही, हे घ्या बरं वाटेल..”

मानवची बायको सरिताकडे बघून तिला म्हणते,

“तुम्हाला तर सगळं माहीत होतं ना? मग आम्हाला सांगायची गरज वाटली नाही?”

सरिता मामीची स्थितीही काही वेगळी नव्हती, या सर्व प्रकरणाने त्याही घाबरल्या होत्या. काहीही न बोलता त्या निघून गेल्या.

“मानव..यांचं मला काहीएक कळत नाहीये.. त्यांनी आपल्याच घरात आसरा मागितला..त्यांना माहीत होतं आरोही आणि तुझ्याबद्दल.. आरोहिकडे न जाता त्या तुझ्याकडेच ला आल्या?”

“सगळी गुंतागुंत आहे नात्यांची…बरं ते जाऊदे, आर्वी आणि शुभमला बोलावून घेतो मी..या सगळ्यात तेही डिस्टर्ब झालेत..”

“हो बोलावून घ्या..आणि हो..ऐका ना..”

“तुमचा भूतकाळ काहीही असो, मी तुमच्यावर कालही तितकंच प्रेम केलं आणि यापुढेही करत राहीन..”

मानवच्या डोळ्यात पाणी येतं.

“मी आरोहीच्या आठवणीत गर्क असायचो पण तू मात्र मला, माझ्या कुटुंबाला तोलून धरलं…आज मी जो आहे तो फक्त तुझ्यामुळे…”

______

सरिता मामीला आता हे सगळं असह्य होतं. त्यांना वाटायला लागतं की आरोहीला आर्वी बद्दल सांगायला हवं होतं, आई अन मुलीची ताटातूट करायला नको होती. हे सगळं असह्य होऊन त्या तडक आरोहीचं घर गाठतात.

मामीला दारात आलेलं पाहून नकुल आणि आरोहीला धक्का बसतो. नकुल मामीला आत बोलावतो. सरिता मामीचे अश्रू थांबत नसतात..आरोही धीर करून तिला म्हणते..

“मामी, तु तुझ्या मृत्यूचं चित्र उभं करून अलिप्त राहिलीस, काय कारण होतं तुझं तुलाच ठाऊक. पण जाऊदे आता झालं गेलं विसरून जा…”

“नुसतं तेवढंच असतं तर कधीच विसरले असते गं मी…पण अर्धी गोष्ट अजून बाकीच आहे..”

नकुल आणि आरोहीची धडधड वाढू लागते..आता काय ऐकायचं बाकी आहे अजून?

“आरोही…बाळा…तुझं बाळ..”

 

“माझं बाळ? काय त्याचं?”

 

“ते अनाथाश्रमात आजाराने गेलं नाही…खोटं आहे ते..”

आरोही आणि नकुल ताडकन उठून बसतात, दोघांना प्रचंड धक्का बसलेला असतो. आरोही मामीचे दोन्ही खांदे हलवत पोटतिडकीने विचारते..

“काय? मग…कुठे आहे ते?”

“त्या दिवशी प्रमिलाने त्या बाळाला अनाथाश्रमात सोडलं..मीही पाठोपाठ गेले, तिथेच काम करू लागले. एक दिवस मानव आणि त्याची बायको तिथे आले आणि बाळाला दत्तक घेऊन गेले..मीही त्यांच्याकडे आसरा मागितला..मला बाळ हवं होतं..”

“म्हणजे…म्हणजे आर्वी..”

“हो…आर्वी तुझीच मुलगी…तुझी स्मृती गेली होती गं.. त्यामुळे प्रमिलाने बाळाला त्याच्या बापाकडे पोचवण्याची बरोबर व्यवस्था केली..”

“म्हणजे खुशी माझ्याशी खोटं बोलली…तिला माहीत होतं सगळं..”

सर्वजण मानवचं घर गाठतात..आरोही आर्वी आर्वी हाक देऊ लागते..मानव आणि त्याच्या बायकोला कळेना हे काय चाललंय…..

“आरोही अगं का ओरडतेय?”

“मानव..मानव…अरे आर्वी…आर्वी आपली मुलगी..”

“काय? कसं शक्य आहे? तिला मी दत्तक घेतलं होतं..”

“हो…तू तिला त्याच आश्रमातून दत्तक घेतलं होतं जिथे प्रमिलाने तिला सोडलं..तिच्यासाठी सरिता मामी पाठोपाठ गेली अन इकडेही आली..”

मानव आणि आरोही एकमेकांकडे बघून फक्त अश्रू ढाळत बसतात..नियतीच्या विचित्र खेळापुढे दोघेही हतबल होऊन बघत रहातात.

तोवर आर्वी आणि शुभम घरी आलेले असतात आणि दारातूनच आर्वी हे सगळं ऐकते..

“आपण दत्तक घेतले गेलो आहोत, आपल्याच वडिलांकडे? आणि माझी आई आरोही आंटी?” हे सगळं तिला समजून घेण्याचा पलीकडे होतं. ती सगळं ऐकून खोलीत जाऊन दार लावून घेते..

“आरोही बाळा दार उघड..”

“मला काहीवेळ एकटं सोडा..आणि काळजी करू नका, मी काही जीवाचं बरेवाईट करणार नाहीये..”

सर्वजण माघारी फिरतात..आता पुढे काय? आर्वी मानव आणि आरोहीची मुलगी म्हणून दोघे एकत्र येणार? सरिता मामी धीर करून म्हणते…

“मानव आणि आरोही, या टप्प्यावर तुम्ही मुलीसाठी एकत्र या…नकुल आणि बाईसाहेब…जोडीदार सोडा तुम्ही..”

“मामी काहीही काय बोलताय? नकुलने अर्धं आयुष्य मला सोबत केलीये…माझ्या कठीण काळात त्याने मला सावरलं आहे…आणि आज त्याला सोडून मी मानवकडे जाऊ? शक्य नाही..”

नकुल हळूच डोळ्यांच्या कडा पुसतो..

“आरोहीला मी वाढवलं आहे…मी आई आहे तिची, माझ्यापासून तिला मी दूर जाऊ देणार नाही..” मानवची बायको संतापाने म्हणते.

आता आर्वीचा हक्क कुणाकडे हा मोठा प्रश्न उदभवतो. नकुल आर्वी साठी याचना करू लागतो..

“हे बघा, इतके दिवस आर्वीला तुम्ही सांभाळलं… आता मला पितृसुख आणि आरोहीला तिच्या हक्काचं मातृसुख मिळू द्या..”

ज्या बाळासाठी नकुलने इतका शोध घेतला होता ते मूल आज डोळ्यासमोर होतं.

आता सर्व निर्णय आर्वीच्या हातात असतो. काहीवेळाने आर्वी बाहेर येते..ती काय म्हणते याकडे सर्वजण लक्ष देऊ लागतात.

“मी खूप विचार केला…मी दत्तक म्हणून माझ्याच रक्ताच्या वडिलांकडे आली. माझी खरी आई स्मृती नसल्याने माझ्यापासून दूर राहिली…खरं पाहिलं तर या सर्वात कुणाचीही चूक नाहीये..जे झालं ते नशिबाने पदरात टाकलं..आता मी आज एक महत्वाची घोषणा करणार आहे..”

आरोहीला वाटतं की आर्वी आपल्याकडे परत येईल, नकुलला आनंद होतो.. मानव आणि त्याची बायको विचार करतात की इतके दिवस आपण हिचे आई वडील बनून राहिलो, असं क्षणात ती दुसरीकडे जाणार नाही…सर्वजण कानात प्राण आणून ऐकतात..

“इथे जे झालं ते झालं…कुणाचाही दोष नाही यात. मी कुणालाही दोषी मानत नाही..माझ्या खाजगी आयुष्याबद्दल मी एक निर्णय घेतला आहे आणि इथल्या सर्वांना तो मला सांगू वाटतो…मी अनिकेत सोबत लग्न करायचं ठरवलं आहे.. त्याच्या आई वडिलांना मी पसंत आहे. आता तुम्हालाही अनिकेत आवडला तर पुढच्या महिन्यात लग्न करून अमेरिकेत जायचा विचार आहे आमचा..”

हे सांगितलं आणि आर्वीने पहिली आणि शेवटची मिठी आरोहीला मारली. काही क्षणाचं हे सुख आरोहीला पूर्ण मातृत्वाचा आनंद देऊन गेलं..आर्वीला समजलं असलं की आरोही आपली आई आहे तरी आपल्याला खऱ्या अर्थाने मोठं केलेल्या आईला तिने झिडकारलं नाही..तिलाही आर्वीने मिठी मारली…

सर्वजण आर्वीकडे केवळ बघत बसतात. ज्या बाळासाठी द्वंद्व सुरू असतं त्याच्या पंखात आज बळ आलंय, त्याला त्याचं आकाश मिळालंय हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. मधल्या काळात सर्वजण आई बापासाठी आसुसले असले तरी त्याच काळात ते मूल मोठंही होतंय याचं भानच कुणाला राहिलं नव्हतं. आर्वी ना आरोहीची झाली ना मानवला तिची आयुष्यभर साथ पुरली..पिल्लांना बळ आलं की ती घरट्याकडे वळून बघत नाहीत..क्षितिजापलीकडचं आकाश त्यांना खुणावत असतं. ती उडून जातात, पण घरट्यात माघारी राहिलेल्या पक्ष्यांना घरटं तोलून धरणं भाग असतं, याच आशेवर की कधीतरी आपलं पिल्लू थकून भागून घरी येईल तेव्हा घर शाबूत असावं..

 

तीच घरटी शाबूत ठेवण्यासाठी नकुल आणि आरोही माघारी फिरली..आपलं घरटं तोलून धरायला..

 

समाप्त

 

(अनेक भावभावनांचं द्वंद्व असलेली ही कथा आपल्याला आवडली असेलच..कसा होता पूर्ण कथामालिकेचा प्रवास? कमेंट्स मध्ये नक्की कळवा)

 

17 thoughts on “खेळ मांडला (भाग 25 अंतिम)”

Leave a Comment