साथ

 प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर जामकर यांच्या निधनाची बातमी पेपर मध्ये झळकली आणि स्नेहाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले, आपण आयुष्यात घेतलेला निर्णय किती योग्य होता याची तिला आज प्रकर्षाने जाणीव झाली. तिचं असं स्तब्ध झालेलं बघताच तिचा नवरा सुधीर तिच्या जवळ आला आणि त्याने पेपर मधली बातमी पाहिली, तोही काही वेळ सुन्न झाला. स्नेहा आणि सुधीर ने पळून जाऊन लग्न केलं होतं. पळून जाताना परिस्थिती अशी होती की हाताशी ना नोकरी ना रहायला छत. पण ती गोष्ट त्या क्षणी फार क्षुल्लक वाटत होती. 

स्नेहा एका छोट्याशा चाळीत एका खोलीत आपल्या कुटुंबासोबत रहात होती. वडील सतत वैतागलेले, चिडलेले..त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे कुठलीही नोकरी त्यांना टिकत नसे, त्यात आईचं सतत दुखणं सुरु असायचं. स्नेहा लहानशी नोकरी करून घराला हातभार लावत असे, तिचा मोठा भाऊ वाईट मार्गी लागलेला त्यामुळे त्याच्याकडून काही अपेक्षा नव्हत्याच. त्यात स्नेहाच्या वडिलांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं, मिस्टर जामकर यांचं. मिस्टर जामकर स्नेहा पेक्षा दुप्पट वयाचे. लग्नाला आलेली त्यांची 2 मुलं. बायको काही वर्षांपूर्वीच देवाघरी गेलेली. त्यांना आता लग्न करायचं होतं, भरपूर पैसा असल्याने कोणालाही विकत घेता येईल अश्या स्वभावाचे ते व्यावसायिक. आणि म्हणूनच त्यांच्या गळाला लागले ते स्नेहाचे वडील. राहायला घर, गाडी आणि भरपूर पैसे देण्याच्या सौद्यावर त्यांनी स्नेहाला मागणी घातली. पण त्यांच्या अटी सुद्धा जाचक होत्या.

लग्नानंतर सगळी संपत्ती मुलांच्या नावे असेल, माझ्या बायकोने घराकडे आणि मुलांच्या संसाराकडे लक्ष द्यावं..आणि सगळ्यात जाचक म्हणजे मुलीला शरीरसंबंधाची आवड नको, या वयात ही अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाही असं जामकर यांनी स्पष्ट सांगितलं. स्नेहाच्या वडिलांना आयतं सगळं मिळणार म्हटल्यावर मुलीला त्यांनी अक्षरशः गृहीत धरलं..

“नाही नाही, आमच्या मुलीला असलं फालतू काही आवडत नाही, tv वर असले सिनेमे लागले तरी बघत नाही ती..तिला नाही आवड या सगळ्याची..”

स्नेहाला जेव्हा हे समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, आपल्या शारीरिक गरजा सुद्धा मारण्यात येतील, वर दुप्पट वयाचा माणूस, मानसिक गरज तर दूरच..त्या माणसाला बायकोच्या नावाने फक्त घर सांभाळायला विश्वासातलं माणूस हवं होतं आणि पैशाच्या जोरावर तो विकत घेऊ पाहत होता. स्नेहाला तिच्या वडिलांनी विचारण्याची तसदी घेतली नाहीच, उलट पटापट सगळं आटोपून घेणार असं तिला सांगितलं..परिस्थितीला आणि शारीरिक दुखण्याला कंटाळलेल्या तिच्या आईनेही स्नेहाची बाजू घेतली नाही, लग्न करून जबाबदारीतून मोकळं व्हायचं होतं फक्त तिलाही..

यातच स्नेहाची नोकरी सुटली, इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालेली. स्नेहा दिसायला सुंदर होती पण कुटुंब म्हणून तिला प्रेम असं मिळालंच नव्हतं. नोकरी वरून शेवटचं घरी येत असताना रस्त्याने काही टवाळ पोरं तिची छेड काढू लागले. स्नेहा अश्या परिस्थितीत होती की या मुलांना प्रतिकार करून काहीही साध्य होणार नव्हतं. तिच्या डोक्यात एकच ट्यूब पेटली, ती तडक त्या मुलांजवळ गेली आणि म्हणाली..

“माझ्याशी लग्न करेन कुणी?”

ती गंभीरपणे म्हणत होती पण त्या मुलांना धक्काच बसला..काहींना वाटलं ही आपली टर उडवतेय, काहीजण तिला वेडसर म्हणू लागले.पण तिला आता या संकटातून बाहेर पडायला कुणाचा तरी हात हवा होता, मग तो कुणी का असेना..फक्त आपल्या वयाचा आणि आपल्या किमान गरजा पूर्ण करू शकणारा..

तिने असं विचारलं तशी बाकीची मुलं बाजूला झाली..सुधीर एक होता तो पुढे आला..

“मी कसा वाटतोय?”

सुधीरला वाटलं ही थट्टा करतेय मग आपणही करुया..

“चालेल मला..प्लिज माझ्याशी लग्न कर, खूप मोठ्या दुविधेत आहे मी, मला इथून दूर घेऊन चल फक्त..तुझ्या पाया पडते मी..”

इतका वेळ थट्टेच्या मूड मध्ये असलेल्या सुधीरला तिच्या डोळ्यातलं दुःखं दिसून आलं, त्याचे हावभाव बदलले आणि तो गंभीर झाला..सुंदर मुलगी आणि त्यात दुःखातून बाहेर पडण्यासाठी माझी साथ मागतेय म्हंटल्यावर सुधीरने हात पुढे केला..त्याच्या मित्रांनी त्याला वेड्यात काढलं पण सुधीरने निर्णय घेतला होता..

सुधीर एका वडापाव दुकानात कामाला होता, दिवसाला शंभर रुपये मिळायचे तेवढे, आई वडील नव्हते, भाऊ होता तोही त्याच्या कुटुंबासोबत बाहेरगावी.. त्यामुळे सुधीरने लग्न केलं काय किंवा नाही केलं काय त्याला कुणीही विचारणार नव्हतं..

स्नेहा आणि सुधीर ने पळ काढला..दूर गावी जाऊन लग्न केलं..कसेबसे दिवस काढत पैशांची जमवाजमव केली.. एकवेळ खायलाही नसे घरात..पण सुधीरने मोक्याच्या वेळी दिलेली साथ आणि आपल्यासारख्या बेभरवशाच्या मुलासोबत संसार करण्याची तयारी दाखवल्याने दोघेही एकमेकांच्या उपकारात होतेच आणि सोबतच सहवासाने त्यांच्यात प्रेमही फुलू लागलेलं. कोटींच्या महालातल्या सुखापेक्षा पत्र्याच्या घरातलं समाधान खूप जास्त होतं..

दोघांनीही कष्ट घेतले, स्नेहाने सुधीरला छोटंसं हॉटेल सुरू करायला लावलं आणि तीही एका छोट्याश्या दुकानात काम करू लागली. सुधीरला हॉटेलचा अनुभव होताच, त्याने अल्पावधीतच हॉटेल मोठं केलं..महिन्याला 40-50 हजार जमू लागले. स्नेहाने नोकरी सोडून हॉटेल मध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तिच्या लक्ष घालण्याने हॉटेल अजूनच चालायला लागलं. पत्र्यापासून सुरू झालेलं हॉटेल आज दोन मजली इमारतीत बदललं..

पेपर मध्ये ही बातमी वाचून सुधीर स्नेहाला म्हणाला..

“त्या दिवशी तू माझा हात मागितला नसतास तर आज एखाद्या टपरी वर खितपत पडलो असतो..”

स्नेहा म्हणाली..

“आणि तू त्या दिवशी पुढे आला नसतास तर अवघ्या चार वर्षात विधवा झाले असते मी..माझ्या वाट्याला येणाऱ्या दुःखाने होरपळून गेले असते मी..”

सुधीरने वेळीच माणुसकी दाखवली होती आणि स्नेहाने सुधीर सारख्या वाल्याचा वाल्मिकी केला होता..दोघांची ती भेट, ती परिस्थिती आणि एकत्र येणं… सगळं विधिलिखित असेल ना? जोड्या स्वर्गात जुळल्या जातात हेच खरं…

4 thoughts on “साथ”

Leave a Comment