आज कळतेय स्वातंत्र्याची किंमत…

 संपूर्ण जगाला आज कुणाची कणव येत असेल तर ती अफगाणिस्तान मधील स्त्रियांची. तालिबान ने अफगाणिस्तानवर ताबा घेतला आणि सगळं गणितच बदललं. मीडिया मध्ये एकेक बातमी ऐकायला येते, तालिबान ने स्त्रियांवर लादलेले विचित्र नियम ऐकून चीड येतेय. बुरख्याशिवाय बाहेर पडायचं नाही, जातानाही एखादा पुरुष सोबत हवा, स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी, नोकरीवर बंदी, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्णपणे पुरुषांचं वर्चस्व..!!! ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो.

आज खरंच गर्व वाटतो भारतात असल्याचा..!!! जिथे रात्री अपरात्री जर चोर आले तेवढीच काय ती भीती..!!! आपलं राहतं घर, आपली माणसं, आपला शून्यातून उभं केलेला संसार, आपली जमीन यावर तिसरा कुणी येऊन हल्ला करेल असं मनाच्या सातव्या पडद्यातही येत नाही. कोणते कपडे घालावे हे मुली स्वतः ठरवतात..शिक्षण कुठलं घ्यावं, नोकरी कुठे करावी हे सगळं त्या स्वतः ठरवतात..इतकंच नाही तर उद्योग व्यवसायातही आगेकूच करतात. कुणाच्या बापाची हिम्मत नाही भारतीय स्त्री ला बोलायची की “तू हे सगळं सोडून घरात बस” म्हणून..

कुणाचे हे आशिर्वाद? कुणाची ही पुण्याई? कित्येक वर्षे स्वातंत्र्य अनुभवत आलेल्या आम्हाला स्वातंत्र्याची किंमत खरंच कळत नव्हती, पण आज अफगाणिस्तानच्या स्त्रियांच्या स्थितीवरून खरंच आज त्याची किंमत जाणवतेय..

धन्य ती सावित्री माऊली, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, धन्य ते संविधान आणि धन्य तो प्रत्येक व्यक्ती ज्याने भारतासाठी, हिंदुत्वासाठी, माणुसकी साठी जीवन बहाल केले..वेळप्रसंगी रक्तही सांडले, मृत्यूला हसत हसत सामोरे गेले..तुम्ही होतात म्हणून आज मोकळा श्वास घेऊ शकतोय…आज खरोखर तुम्हाला वंदन.. 🙏🙏🙏

2 thoughts on “आज कळतेय स्वातंत्र्याची किंमत…”

Leave a Comment