आपल्या मनोरुग्ण झालेल्या लेकीला भेटून देसाई जोडपं आणि शरयूचा भाऊ नुकतेच परतत होते.. लेकीची अशी अवस्था बघून दोघांनाही अश्रू अनावर होत नव्हते..भाऊ तर शून्यात नजर भिडवून बघत होता..शरयूची आई आवंढा गिळत बोलत होती..
“सोन्यासारखा संसार सुरू होता माझ्या शरूचा..कुणाची नजर लागली कुणास ठाऊक…कधी कुणाचं वाईट केलं नाही माझ्या लेकीने..तिच्यावर अशी वेळ का यावी बरं..”
“खरंच गं.. नाव काढायचे लोकं आपल्या लेकीचं.. लग्न करून गेली तशी एक तक्रार आली नाही तिची कधी..सुखाने नांदत होती सासरी, माहेरीही वर्षातून येई तेही दोनच दिवस..आजूबाजूच्या लोकांना विशेष वाटायचं..मी सांगायचो की लेक सासरीच शोभून दिसते आणि तिलाही तिचं सासरच प्रिय होतं..”
“पण मग असं का व्हावं? अचानक इतका आकांडतांडव तिने का केला असेल? डॉक्टर सांगत होते की तिच्या मेंदूवर प्रेशर आल्याने परिस्थिती बिघडलीये… पण तिला कसलं टेन्शन होतं? तसं असतं तर सांगितलं असतं तिने..पण एक शब्द काही बोलली नाही ती..”
मागे बसून भाऊ निमूटपणे सगळं ऐकत होता..शरयूचे वडील म्हणाले..
“पोरीने नाव काढलं पण..अजूनही लोकं म्हणतात, बघ ती शरयू कशी सासरी रुळली आहे छान..नाहीतर आजकालच्या पोरी, सासरी कमी आणि माहेरीच जास्त…आणि एक ना हजार तक्रारी आणतात सासरहून..सासू अशी, नवरा तसा, आपल्या लेकीने सगळं सांभाळून घेतलं. अभिमान वाटतो मला तिचा..”
हे ऐकताच भावाची सहनशक्ती सम्पली..
“कसला अभिमान वाटतो तुम्हाला? ती सासरी छळ सहन करत गेली आणि माहेरापर्यन्त काहीच येऊ दिलं नाही याचा? की तिच्या सहनशीलतेचा अंत होऊन ती मनोरुग्ण झाली पण सासरची पायरी सोडली नाही याचा?”
“मनोज काय बोलतोय तू??”
“खरं तेच बोलतोय, आई तुला आठवतं? ती बऱ्याचदा फोनवर रडायची, सांगायची की सासरी तिचा छळ होतोय, राब राब राबवून घेताय.. पण तू काय म्हणायचीस? ऐकून घे, उलट उत्तर देऊ नकोस, ते सांगतील ते ऐकत जा..कामं करावीच लागतील, पर्याय नाही..आणि वडिलांना सांगितलं तरी ते हेच सांगतील..तू जर बॅग भरून इथे आलीस तर लोकं नाना प्रश्न विचारतील.. आम्हाला घराबाहेर पडायला तोंड राहणार नाही वगैरे..तिच्या सुटकेचे मार्ग तिच्याच माणसांनी बंद केले.कशासाठी?? तुमचा समाजात मान टिकावा यासाठी? लोकांचा विचार करून तुम्ही पोटच्या मुलीला नरकात सोडून दिलंत..आणि आता का रडताय? ताई नेहमी मला फोन करायची, सांगायची…दादा मला इथे खूप त्रास देताय ही लोकं, आईने सांगितलं तसं मी त्यांचं सगळं ऐकते पण ह्या लोकांना नकोच आहे मी..त्यावेळी मी तिला भेटायला निघायचो तेव्हा पप्पा अडवायचे, मी येतो म्हणायचे..आणि वडिलांना पाहून ती काहीच बोलत नसायची..माणसाची एक सहनशक्ती असते, ती सम्पली की शरीरावर आणि मनावर असा काही आघात होतो की त्यावर आपलं नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसतं..”
शरयूचे आई वडील अपराधी नजरेने एकमेकांकडे पाहू लागले..मनोज जे बोलला ते सगळं खरं होतं..मुलगी सासरी नांदावी म्हणून त्यांनी तिला सगळं शिकवलं..पण आपल्यावर अन्याय होत असेल तर प्रतिकार करावा हेच शिकवलं नाही, उलट तो अन्याय नसतोच, ते सहन करायचं असतं तरच संसार टिकतो हेच शिकवलं..त्या लोकांना आपलं मानायचं, त्यांच्यासाठी जीवाचं रान करायचं, पण समोरच्याला त्याची जाणीवच नसेल तर कशासाठी?
काही वेळाने शरयूच्या नवऱ्याचा फोन आला,
“बिलाचा फोटो पाठवतो, तेवढं भरून द्या..”
डोक्यावर घेतलेल्या जावयाचे हे बोल ऐकून वडील संतापले,
“बिल भरायला आम्ही आठवतो, मग तुम्ही तिला नोकर म्हणून नेलं होतं का? लाज नाही वाटत असलं बोलायला? पैशाची कमी नाही, पण एव्हढीही जबाबदारी घेणं शक्य नाही तुम्हाला??”
“ओ मामा, नीट बोला..कुणाशी बोलताय तुम्ही..”
“नालायक माणसा आजवर तुझी तोलतोल करत बसलो तेच चुकलं..आता मी कायदेशीर कारवाई करणार तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर…तेव्हा दाखव ही गुर्मी..”
वडिलांना उशिरा शहाणपण सुचलं, पण वेळ निघून गेली होती..
***
(लग्न करून सासरी जाताना मुलीला सगळं शिकवलं जातं पण अन्यायाचा प्रतिकार करायला अजिबात कुणी सांगत नाही..उलट अन्याय झाला की शांत बसायचं म्हणजे संसार टिकतो हीच तिला मिळालेली शिदोरी..आपली मुलगी सासरी असावी, तिची काहीही तक्रार येऊ नये, सगळं सुरळीत सुरू असावं असं सुंदर चित्र आई वडिलांना नेहमी डोळ्यासमोर हवं असतं, पण या चित्राला धक्का लागू नये म्हणून कित्येक माता भगिनी छळ सहन करतात, आतल्या आत कुढतात, कोमेजून जातात…आपल्या चांगल्या साठी आपल्याला बोलणं, आपल्या भल्यासाठी कष्ट करायला लावणं वेगळं आणि केवळ द्वेषभावनेने छळ करणं, राबवून घेणं वेगळं..या दोन्हीतील फरक समजून घ्यायला मुलींना शिकवलं पाहिजे..आपल्यावर शाब्दिक हल्ला चढवताना त्यामागचा हेतू शुद्ध असेल तर तिथेच ऐकून घ्यायला हवं..त्याक्षणी उलट उत्तर देणं उद्धटपणाच…पण केवळ इर्षेपोटी, द्वेषभावनेपोटी कुणी असं करत असेल तर त्याक्षणी प्रतिकार केला पाहिजे हे मुलींना शिकवायला हवं…अन्यथा, शरयू सारखी वेळ येते…)
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.com/de-CH/register?ref=JHQQKNKN