तुम्ही ‘घरीच’ असता का?

 

“रोहन बाळा प्लिज मला अनुराधा मावशीकडे सोडून दे, वाटल्यास तू घरी येऊन जा, मी येईन तिथून पायी”

“काय आहे इतकं अर्जंट?”

“अरे हळदी कुंकवाला बोलावलं आहे तिने, मागे ती येऊन गेलेली आपल्याकडे, मग मलाही जायलाच हवं ना”

सुट्टीच्या दिवशी रोहन हॉल मध्ये मस्तपैकी मोबाईलवर विडिओ बघत असतांनाच आईने असं काम सांगितलं म्हटल्यावर त्याचा खरं तर जीवावर आलेलं..

“नको येऊस जाऊदे, जाते मी पायी… इथून 3 किलोमीटर तर आहे घर. जास्तीत जास्त काय, पाय दुखतील.. चक्कर येईल..आणि..”

“आई..आई येतो मी..” रोहन हात जोडून म्हणाला. प्रत्येक आईला असं इमोशनल ब्लॅकमेल कसंकाय जमतं कोण जाणे. 

“पण मी गाडीत बसून राहीन हा, बाहेर येणार नाही. तू तुझं उरकून ये बाहेर”

“बरं..” 

एकेमकांच्या अटी मान्य करणं यातच दोघांचं भलं होतं. असो.

रोहन कार घेऊन घराजवळ गेला. रस्त्यावर काम चालू असल्याने त्याची कार त्याने जरा दूर लावली. 

“आई जाऊन ये..आणि लवकर ये हा, मी इथेच थांबतो”

“हो हो, आलेच”

आई निघून गेली, रोहन मोबाईल काढून परत टाईमपास करू लागला. मध्ये आई बायकांसोबत गप्पा मारत होती. सर्वजणी स्मार्ट, हुशार कॅटेगरी मधल्या. हळदीकुंकू झाला, अनुराधाने सर्वांना नाश्ता दिला आणि ते झाल्यावर सर्वजणी गप्पा मारायला बसल्या. त्यांच्या आपापसात गप्पा सुरु झाल्या. बोलता बोलता विषय निघाला, कोण किती कमावतं याचा..

“यावेळी इशाच्या साड्यांचा चांगलाच खप झालाय, यावेळी दारात नवी स्कुटर येणार वाटतं नक्की”

“काहितरीच काय गं.. माझं सोड, ह्या साक्षीला विचार, कोरोंना मुळे पेशंट ची रांग होती तिच्याकडे..त्या काळात भरपूर सेवा केली म्हणा तिने पेशंट्स ची, पण तेवढे छापलेही असतील ना..काय..”

सर्वजणी एकमेकींना चिडवत, चेष्टा करत बोलत होत्या.थोडक्यात प्रत्येकजण काही ना काही काम करतच होतं. आई बिचारी बाजूला बसून त्यांच्या विनोदाला दाद देत होती. एकीचं लक्ष मात्र आईकडे गेलं..तिने विचारलं,

“तुम्ही काय करता?”

आई अचानक प्रश्नाने गडबडली,

“मी..मी घरीच असते..”

सर्वत्र शांतता..एक आगाऊ बाई म्हणाली,

“म्हणजे तुम्ही पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहात?”

आई काहीही बोलली नाही..

“तुम्ही काहीतरी करायला हवं, आजकाल बाईने कमावलं नाही तर नवरा किंमत सुद्धा देत नाही…आणि किती दिवस असं नवऱ्याकडे मागत फिरायचं?”

बहुतांश स्त्रिया आपल्या घर संसारात लक्ष घालत असल्याने स्वतः काहितरी करायचा विचार सोडून देतात, त्यातलीच एक ही आई..पण अश्यांकडे तुच्छ दृष्टीने बघणारा समाजही निर्माण झालाय, जो विचारत असतो,

“तुम्ही घरीच असता का? तुम्ही काहीच करत नाही का?”

मग अश्यावेळी त्या बाईला स्वतःचाच राग येतो, का आपण घरीच असतो? आपण काहीही करत नाही म्हणजे बिनकामाचे आहोत का? 

एव्हाना आई गप्पांची केंद्रस्थान ठरली होती. एक बाई तर हळूच म्हणाली, 

“बायका अश्या घरात बसून राहतात आणि झोपा काढतात”

आईचा मोबाईल गाडीत राहिल्याने रोहनला आईला बोलवायला शेवटी त्या घरी यावं लागलं, त्याने नेमकं हे सगळं पाहिलं, ऐकलं आणि त्याच्या डोक्यात एकच तिडीक गेली. तो म्हणाला

“कसं आहे ना, स्त्रिया बाहेर पडतात, चार पैसे कमावतात..छानच,  त्यांची चॉईस. पण काही महिलांची घर ही सुद्धा चॉईस असू शकते. घरातली चार माणसं सोयीने जगत असतात कारण त्यांच्या वेळा सांभाळणारी घरातली बाई धावपळ करत असते. एक बाई घरी असायचा निर्णय घेते..कारण तिला मुलांना जग फिरवण्यासाठी सक्षम करायचं असतं..एखादी बाई घरी असण्याचा निर्णय घेऊ शकते, कारण तिच्या भरवशावर नवऱ्याला बाहेरच्या जगात बिनधास्तपणे पाठवायचं असतं.. जगात प्रत्येकजण यशस्वी व्यक्तीला डोक्यावर धरतो, पण त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला विचारा…मेहनत घेत असताना, तुमचं जीवन सुखकर बनवण्यात कुणाचा हात होता? तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही उपाशीपोटी अभ्यास करणार नाही याची खबरदारी कोण घेत होतं? नोकरीत बढती मिळणाऱ्याला विचारा..तुम्ही वेळेत ऑफिसमध्ये जाऊन निरोगी शरीराने काम करावं यासाठी कोण काळजी घेत होतं? ती एक बाईच असते..जिच्यामुळे इतरांची आयुष्य सुखकर होतात. भलेही ती कमावणारी असो वा नसो. बाहेर न पडता घराकडे लक्ष देण्याचा निर्णय घेत घरीच असणाऱ्या बायकांचा त्यागही मोठाच असतो..जसं नोकरी करून घर सांभाळणाऱ्या स्त्रियांची तारेवरची कसरत असते तशीच आपल्या स्वप्नांना बाजूला सारून घरातल्या इतर व्यक्तींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी घरातच असणाऱ्या स्त्रियांचा त्याग डावलून कसा चालेल? होय, माझी आई घरीच असते..तो सर्वस्वी तिचा निर्णय होता आणि तिच्या या त्यागाची आम्हाला नक्कीच जाणीव आहे..”

रोहन हे सांगत असतानाच प्रत्येकीला ‘घरीच असणाऱ्यांची’ आठवण आली. कुणाला सून नोकरी करते म्हणून घर आणि आपलं मूल सांभाळणारी सासू दिसू लागली..लग्नानंतर आपलं शिक्षण पूर्ण करतांना जाता जाता आपल्याला डबा घेऊन जा सांगणारी आई दिसू लागली..प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणी ‘घरीच’ होतं ज्याच्यामुळे जगणं सुसह्य होत होतं…

कार्यक्रम सम्पल्यावर सर्वजण घरी जाऊ लागले. त्या बायकांच्या घोळक्यातून एकजण दूरवर बघून ओरडली..

“व्वा…ती बघा, सिल्वर कलरची चकचकीत कार…खूप महाग आहे बरं, फार कमी लोकांकडे असते..”

क्षणार्धात रोहन आणि आई त्या कार मध्ये जाऊन बसतात आणि घोळक्यातील बायका बघतच राहतात..

‘घरीच’ असणाऱ्या बाईच्या त्यागाची चमक त्या चकचकीत कार मधून अधोरेखित होत होती. 

समाप्त

Leave a Comment