वयाच्या 53व्या वर्षी तिला डिप्रेशनचा आजार जडला..
डॉक्टर, मानसोपचार तज्ञ…सगळं सुरू होतं..
2 दिवस बरं वाटायचं, पण नंतर पुन्हा ये रे मागल्या…
हार्मोसल बदलामुळे होतंय का? एखादे व्हिटॅमिन कमी आहे का? मेंदूवर काही ताण पडतोय का?
यासाठी सर्व तपासण्या झाल्या..
सगळं अगदी नॉर्मल…
म्हणजे आजार हिच्या मनातच होता..
कसलातरी सतत विचार करत असायची ती..
फारशी कुणाशी बोलत नसे,
मुलगा शिकायला बाहेरगावी होता,
त्याच्याशी मात्र आवर्जून बोले.. त्याच्याशी मन मोकळं करे…
तो बिचारा फोनवर सगळं ऐकून घेई, आई म्हणायची..
“मी शिकले असते तर आज परिस्थिती वेगळी असती…”
“मी लग्नानंतर धीट वागले असते तर कुणाची हिम्मत झाली नसती माझा छळ करायची..”
“शहरात आल्यावर मीही बाहेर पडले असते तर आज परिस्थिती वेगळी असती..”
“यांनी दिराला दटावून वाटा मागितला असता तर आज मोठी जागा घेतली असती..”
नको नको ते विचार आई करे आणि बिचाऱ्या ओम जवळ सांगे..
तो ऐकून घ्यायचा, आईला समजवायचा…पण आई ऐकेल तर शपथ…
नवरा सुद्धा तिला समजावून समजावून थकला..
घरात सर्व कामाला बायका, नवरा रिटायर झालेला..पण सतत काही ना काही कामात व्यस्त राही..
हिला कुठे बाहेर जायचं सांगितलं तर तोंड पाडून बसे..
एकच तुणतुनं…असं असतं तर, तसं असतं तर..
“अगं बाई आपली अर्धी लाकडं सरणावर गेली, आता कसले हिशोब करतेस?” नवरा वैतागायचा…
कुणी पाहुणे आले आणि त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली की हिची लगेच तुलना सुरू…
*****
भाग २