हे ‘तुझं’ घर आहे….

जयंत चे शाळेतले एक शिक्षक अचानक घरी आले होते, त्यांनी जयंत च्या घराजवळच एक फ्लॅट घेतला होता, जसं त्यांना कळलं की जयंत इथेच कुठेतरी राहतो, ते पाहून त्यांनी पत्ता विचारत त्याचं घर गाठलं.

त्यांना पाहून जयंत ला काय करू अन काय नको असं झालं..

“अगं मेघना, पोहे बनव छान.. नुसते पोहे नको, स्वयंपाक पण कर…गुरुजी आज तुम्ही जेऊनच जायचं बरं का..”

“अरे हो हो…इथेच राहतो मी…येणं जाणं चालूच राहील आता..”

इतक्यात मेघना बाहेर येते..

“ही मेघना, माझी बायको…”

“नमस्कार… माहेर कुठलं मुली तुझं?”

“कोकणातलं..”

“कोकणात कुठे?”

“बानेगाव…”

“काय सांगतेस…अगं माझी पोस्टिंग काही काळ तिथेच होती… काय गाव आहे तुला सांगतो… काय माणसं तिथली…असं वाटायचं इथून हलूच नये..”

आपल्या माहेर बद्दल बोलत असलेल्या गुरुजींना ऐकून मेघना एकदम फुलली…आपल्या माहेरचे गोडवे भरभरून गायला लागली..

“तुम्हाला सांगते गुरुजी, आमच्या बागेतील फणस एकदा एका विदेशी माणसाने चाखून पाहिले होते… ती चव चाखून अगदी वेडाच झालेला तो…आणि आमचं घर म्हणजे…”

आता जयंत च्या कमी आणि मेघना व गुरुजींच्या गप्पाच रंगत आल्या होत्या…

पाहुणचार वैगेरे झाल्यावर गुरुजी निरोप घेतात, ते गेल्यावर जयंत चा चेहरा जरा उतरलेला दिसतो..

“काय हो? गुरुजी भेटले इतक्या वर्षांनी, मग तुम्ही उदास का दिसताय?”

“त्यांचं जाऊदे, पण तू काय म्हणालीस?”

“काय?”

“तुझ्या माहेरच्या घराला सतत ‘आमचं’ घर म्हणत होतीस..”

“हो..मग?”

“आता हे तुझं घर आहे..त्या घराला माहेरचं घर म्हणायचं..”

“पण तेही माझंच घर आहे ना?”

“परत तेच…हे घर तुझं आहे आता…ते नाही…संधी मिळाली अन झाली सुरू आपल्या माहेरचं कौतुक करायला….जरा इकडचं कौतुकही करत जा कधीतरी.”

“काय डोक्यात घालून बसलात हे? विषय निघाला म्हणून बोलले…नाहीतर कशाला स्वतःहून बोलले असते…आणि इकडचं ही कौतुक करते बरं का मी…आता तेव्हा तुम्ही समोर नसतात त्याला मी काय करू..”

“मला नाही वाटत..”

“बरं ते जाऊद्या…मी काय म्हणते, आपण ना पुढे मस्त एक चोपाळा बसवू..”

“कशाला? तुझ्या माहेरी आहे का?”

“तिकडे नाहीये म्हणूनच सांगतेय..आणि आपल्या घरात ना थोडासा बदल करू..”

“म्हणजे?”

“म्हणजे बघा, रंगकाम करू..पिस्ता कलर मला फार आवडतो, तो देऊ….आणि हो ती मधली भिंत पाडून ती खोली मोठी करू..”

“वेडी आहेस का…असलं काहीही करायचं नाही आपण..”

“आता काही उपयोग नाही…मी कारागिरांना कधीच ऍडव्हान्स देऊन बसलेय…”

“मूर्ख आहेस का तू??? हे ‘माझं’ घर आहे…इथे ‘मला’ जे वाटेल तेच होईल…तू कोण आलीस ‘माझ्या’ घराला बदलायला ??”

जयंत संतापाने लालबुंद होतो…मेघना शांतपणे हसते..

“तुम्हीच उत्तर दिलंत की आता..”

“कसलं उत्तर?”

“जेव्हा या घरासाठी काही करायची वेळ येते, कुटुंबासाठी कष्ट करायची वेळ येते, त्याग करायची वेळ येते, सहन करायची वेळ येते तेव्हा “हे आता तुझं घर…” आणि याच घरासाठी काही निर्णय घेण्याचा हक्क मी दाखवते तेव्हा “हे माझं घर?”….काय हा न्याय…

जयंत ला आपली चूक समजते…

“घाबरु नका…कुणालाही ऍडव्हान्स दिलेला नाही मी…कारण तुमच्या वागण्याने आजवर मी या घराला ‘माझं’ समजू शकले नाही…”

6 thoughts on “हे ‘तुझं’ घर आहे….”

  1. बरोबर, संमजसपणे समजेल असेच जशास तसे उत्तर दिले लेकीने।।

    Reply

Leave a Comment