सकू ला घेऊन दिशा घरी परत येत असते…वाटेत एका माणसाची गाडी बंद पडलेली तिला दिसते…ती जवळ जाऊन विचारणार इतक्यात गाडी सुरू होऊन निघून जाते..पण त्या माणसाची फाईल गाडीतून पडते..
दिशा त्यांना आवाज देते पण गाडी सुसाट असते…अखेर दिशा ती फाईल घरी आणते.
“माधव…अरे वाटेत असं असं झालं..ही फाईल…”
“कसली आहे?”
“पाहिली नाही…बघ की..त्यात नाव गाव असेल.”
“दिशा फाईल उघडून पाहते…त्यात नाव नसतं पण नोंदी असतात…शेतमालाच्या…”
“माधव अरे यात नोंदी आहेत..शेतमाल. बाजारभाव..”
“अच्छा.. आलं लक्षात…ही फाईल शर्मा ची आहे..पांढरी कार होती ना?”
“हो..”
“मग शर्माच होता तो…शेतमालाचा दलाल…”
“दलाल??”
“व्यापारी समज..आपल्या गावातील शेतकरी त्याचकडे माल देतात आणि पुढचं सगळं तो बघतो…”
दिशा च्या लक्षात येतं. इथे काहीतरी पाणी मुरतंय… दिशा ती फाईल आपल्या खोलीत नेते आणि त्यावर स्टडी करते…
“बाजारभाव.. कांदा प्रति क्विंटल 800 रुपये… सद्य भाव…गोडाऊन मधील चार शॉप…खरेदी किंमत 15 रुपये प्रति किलो…विक्री किंमत 40 रुपये प्रति किलो….”
त्या फाईल मध्ये या कच्च्या नोंदी असतात..पण त्यांचा अर्थ काही तिला लागेना…
तिला एवढं नक्की समजलेलं की हा शर्मा दलाल आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा घेतोय…
तिने माधव ला विचारलं…
“माधव…आपण आपला शेतमाल डायरेक्ट बाजारात का नाही विकत?”
“मला माहित होतं तू हे विचारणार…कारण प्रत्येकजण शेतकऱ्याला हेच सांगत असतो…पण विचार कर, इतका सगळा माल बाजारात जाऊन त्याची वाटणी करणं…आपल्यासारखे अजून बरेच लोकं माल घेऊन आलेले…इतका सगळा माल एकटा शेतकरी कसा आणि कुठे विकणार? आणि सगळाच माल विकला जाईल याची काय शाश्वती?? व्यापारी सगळा माल विकत घेऊन मोकळा होतो आणि आम्हीही मोकळे…बाजारात जाऊन विक्री करण्यात जेवढा वेळ जाईल ना तेवढ्यात एक पीक निघून जाईल शेतात..”
माधव साठी व्यापाराला माल देणं सोयीचं होतं.. पण दिशा ला ते काही पटलं नाही..तिच्या जमिनीतील पीक ती कुठल्याच व्यापाराला देणार नाही असं ती ठरवते…
दिशा ला तिच्या एका मोठ्या मावसबहिणीचा फोन येतो, ती मोठ्या शहरात असते…बऱ्याच गप्पा होतात…मग दिशा हळूच विचारते…
“काय मग…पाळणा कधी हलणार??”
“अगं ट्रीटमेंट चालुये…”
“म्हणजे?? तू??”
“अगं नाही नाही… चान्स घ्यायच्या आधी तपासणी करतेय…इकडे फार सजग असतात बाळाच्या बाबतीत… आधी माझं शरीर गर्भधारणेसाठी सुदृढ आहे की नाही ते तपासतील..काही कमी जास्त असेल तर औषधं देतील..”
“अरेवा..हे नवीनच कळलं मला…”
“हो ना गं… तुला अक्षरा चं काय झालं माहितीये ना? गावात तिची प्रसूती झाली, तिच्यात रक्त कमी होतं हे अगदी डिलिव्हरी च्या वेळी कळलं…खेडेगावच ते…तिथे कसली तपासणी….फार अडचणी आलेल्या तिला..”.
इतक्यात माधव दिशा ला आवाज देतो…दिशा फोन ठेवते..
“दिशा…मी मार्केट मध्ये जातोय…चालतेस का सोबत.”
दिशा तयार होते अन माधव सोबत जाते…
मार्केट मध्ये अनेक शेतकरी आलेले असतात…दिशा आजूबाजूला बघते…तिथे एक मोठा माणूस तिला दिसतो..शेतकऱ्यांना पैसे देत असतो अन शेतकरी खूप खुश दिसतात…तो माणूस निघून गेल्यावर ती त्या शेतकऱ्याकडे जाते अन विचारते….
“हे काय चाललंय??”
“अहो ताई भला माणूस आहे बघा..मी कांदा पिकवणार यावर्षी, या माणसाने तो सगळा कांदा विकत घेण्याचं वचन दिलं आणि 25% रक्कमही दिली…आता टेन्शन नाही बघा…”
दिशा विचारात पडते… असं कोण आणि कशाला करेल? इतक्यात तो माणूस माधवशीही बोलतो…दिशा लांब उभी असते…
जाताना दिशा माधव ला त्या माणसाबद्दल विचारते तेव्हा तो सांगतो की हाच तो “शर्मा..”
दिशा ला आता हळूहळू गोष्टी समजायला लागतात..
घरी गेल्यावर माधव म्हणतो,
“दिशा एक ग्लास पाणी देतेस गं..”
“अहो घरात पाणीच नाही…”
“असं कसं?”
“आज पाणीच आलं नाही..”
“थांब मी मोट चालू करतो..”
“बंद पडलीये..”
“अरे देवा.. आता पाणी कुठून आणायचं??”
“पलीकडच्या दुकानात पाण्याची बाटली मिळते, आणू??”
“हो आण…”
“द्या शंभर रुपये…”
“शंभर??”
“हो…पाण्याचा तुटवडा आहे आज…मग दुकानदाराने भाव वाढवले पाण्याचे..”
“असं नाही करू शकत तो…थांब मी बेत बघतो त्याचा..”
“थांबा….तुमच्या लक्षात येतंय का? की तुमच्यासोबत हेच होतंय…. तो शर्मा तुमच्याकडून माल विकत घेऊन साठेबाजी करतोय…कमी किमतीत विकत घेऊन मालाला भाव आला की मग बाहेर काढतोय…अन तुम्हाला वाटतं की तो भला माणूस आहे..”
माधव विचारात पडतो..
“हे घ्या पाणी…आणि विचार करा..”
एवढं सांगून दिशा तिला दिलेल्या जमिनीकडे जाते…
विचार करते, मातीला आई का म्हणत असतील? कारण तिच्या गर्भात भविष्याचं बीज असतं…तिच्या गर्भात ती जीव फुलवते, त्याला वाढवते….मग ती आई स्वतः सुदृढ नको? अक्षरा चे शब्द तिला आठवतात….चान्स घेण्याआधी तपासणी केली जाते….मग या मातीलाही गर्भरपणासाठी तयार करायचंय, तिची तपासणी नको?
दिशा माती परीक्षण करण्याचं ठरवते…
क्रमशः