हिरवा संघर्ष (भाग 2)

 

सुलेखा ला पाहायला पाहुणे आले होते..आणि मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून माधव होता, ज्याच्याशी सुलेखा ने डोकं लावलं होतं तोच….सुलेखा चं मन सैरभैर होत होतं… काय करावं सुचत नव्हतं…चुपचाप एका ठिकाणी उभी राहून ती सर्व बघत होती. माधव ची नजर तिच्याकडे जाई, आणि त्याला हसू फुटे.

सुलेखा चं लक्ष दिशा कडे गेलं…

“बघ ना…” असा मूक त्रासिक भाव आणून दिशा कडे ती बघत होती…दिशालाही हसू आवरलं नाही…

सुलेखा च्या बाबांनी विचारलं…

“खरं तर घाईघाईत बळवंत नानांनी निरोप आणला..त्यामुळे घाईतच सर्व झालं….चुकभुल झाल्यास माफी असावी..”

“अहो काहीही काय… खूप छान पाहुणचार केलात तुम्ही…”

“माधव बेता…कसा चाललाय उद्योगधंदा?”


माधव ने वडिलांकडे पाहिलं…वडील प्रश्नार्थक चेहऱ्याने सुलेखा च्या बाबांकडे पाहू लागले.

मग दिशा चे वडील म्हणाले…

“बळवंत नानांनी सांगितलं होतं की मुलगा व्यावसायिक आहे…”

एकीकडे दिशा ची आई प्रत्येकाच्या हातात पोहे देत होती..

माधव म्हणाला..

“व्यावसायिक म्हटलं तर हो पण आणि नाही पण..”

“म्हणजे??”

“बळवंत नानांनी सांगितलं नाही का तुम्हाला?? आम्ही शेती करतो…. मोठी जमीन आहे…चांगलं पीक येतं..”

“काय??”


सुलेखा आणि दिशा चे बाबा जवळजवळ ओरडतात… त्यांचं मन सैरभैर होतं… शेतकरी मुलगा?? बळवंत नानांनी तर अशी काही कल्पना दिली नव्हती… आमची मुलगी एका शेतकऱ्याच्या घरी?? शक्य नाही….

शेतकरी हा शब्द ऐकूनच घरात सर्वांचे चेहरे बदलले…आणि त्यांचं हे अवसान माधव आणि त्याच्या घरच्यांना लगेच समजलं…

माधव आणि कुटुंबासाठी हे काही नवीन नव्हतं, शेतकरी असल्याने मुलींकडून कायम नकार येत असायचा..माधव चा फोटो पाहून मुलगी तर बेभान होई पण तो शेतकरी आहे समजताच तिचा विचार बदले…

माधवच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं…

“नमस्कार, येतो आम्ही…”

कुठलाही वाद न घालता माधव आईला घेऊन निघाला..मागोमाग त्याचे वडील आणि काही नातेवाईक निघाले…

सुलेखा आणि कुटुंबाने त्यांना अडवलं नाही..एक शब्दही न बोलता नकार जाहीर झालेला…

दिशा हे सगळं पाहत होती…

“काय झालं??? पाहुणे का चाललेत?? माधव…थांब…”

दिशा आवेशात बाहेर आली…माधव मागे वळला…

“मॅडम…मी शेतकरी…मला कदाचित लग्नाचाही अधिकार नाही…”


“असं कसं?? तुम्ही माणसं नाहीत??”

“माणसं नाही..जगाचे पोशिंदे आहोत…पण जगाला पोसत असताना एका साधारण मुलीला पोसणं काय अवघड आहे आम्हाला?? पण…मानसिकता…जाऊद्या मॅडम…येतो आम्ही…मुलीचं भलं होवो…”

“थांबा…बाबा?? काका?? काहीतरी बोला तुम्ही…”

“दिशा…मध्ये पडू नकोस…शेतकरी कुटुंबात आम्ही मुलगी देणार नाही…”

“पण का?? काय कमी आहे त्यांच्याकडे?”

“कमी नाही, सगळं जास्तच आहे…शेतात मोठा बंगला आहे, गाडी आहे, ट्रॅक्टर आहे…शेतीत चांगलं उत्पन्न येतं… घरातल्या स्त्री ला शेतात काम करायची गरज नाही..सालदार आहेत, घरात नोकर चाकर आहेत…”

माधव सांगत होता…

“सुलेखा…अगं इतकं सुख तुला दुसरीकडे मिळेल??”

“दिशा…तू शहरात राहिलीये… तुला इथलं वातावरण कळणार नाही…”

“शहर काय अन गाव काय…माणसंच असतात ना??”

“मॅडम जाऊद्या…आयुष्यभर असाच राहीन मी…माझ्या आईच्या डोळ्यात दरवेळी पाणी आलेलं मला आता असह्य होतं… चल आई..”

“थांब माधव…मी करेन तुझ्याशी लग्न…”

माधव थबकतो, आईच्या हातातल्या पोह्यांचा ट्रे खाली पडतो, सुलेखा डोळे वटारते वडील सरसर पूढे येतात…आणि दिशा चा हात धरून तिला मागे ओढतात..


“तुला कळतंय का तू काय बोलतेय??”

“होय…पुढचा मागचा सगळा विचार करून बोलतेय…”

क्रमशः

Leave a Comment