दुसऱ्या दिवशी प्रभा सकाळी तयार होऊन पिंट्याची वाट बघत बसते, श्वेताची आई त्यांच्याजवळ येऊन बसते..
“विहिनबाई.. आल्यापासून बघतेय मी, तुम्ही दुसरीकडेच हरवलेल्या दिसताय, आणि श्वेतासोबत तिच्या माहेरीही आल्या आहात..खरं सांगा, आमचं काय चुकलं? श्वेता कडून काही चुकलं का? संकोच बाळगू नका..”
“छे हो…तुम्हाला माहीत नाही मी इथे कशासाठी आलीये ते..”
“कशासाठी??”
“ती बोरं..”
“अगं आईंना खूप बोर व्हायचं घरी, कंटाळून गेलेल्या अगदी, म्हणून म्हटलं तुम्हीही चला…हो ना आई??”
“हो हो…बरोबर..”
“बरं झालं बाई, मनावरचं मोठं ओझं कमी झालं…”
श्वेताची आई निघून जाते,
“आई अहो काय हे, तुम्हाला घरूनच ताकीद दिली होती ना मी? अजिबात आगाऊपणा करायचा नाही, दुसऱ्यांच्या खोड्या काढायच्या नाही..आता तर पिंट्या आला तुमच्या सोबतीला…अहो तो किती लहान आहे, आणि तुम्ही..”
सासुबाईंचं बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं, त्यांचं लक्ष ते बाहेर जनावरांना पाणी पाजण्याच्या हाळाभोवती तोल धरून चालणाऱ्या मुलांकडे होतं..
आपल्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष नाही हे बघत श्वेता बाहेर बघते अन तिला धडकी भरते..ती त्या मुलांकडे बघत म्हणते..
“आई, अजिबात डोक्यात आणू नका..त्यात जर पडलात ना तर हसू होईल तुमचं..”
श्वेता प्रभाकडे बघते तर प्रभा गायब..आता पुढे जे काही होईल ते बघण्याचे त्राण श्वेतात उरत नाही..ती देवावर सगळं सोपवून आत निघून जाते..
प्रभा त्या मुलांशी ओळख करून घेते, त्यांच्यासोबत दुसऱ्याच क्षणाला तोल धरत हाळा भोवती चालू लागते..तिकडे पिंट्या आणि त्याची गॅंग एका मिशन साठी निघालेलें असतात. प्रभा त्यांना बघते अन आवाज देते.
“पिंट्या..कुठे निघालास??”
“मिशन पेरू..”
“मी येऊ का.”
पिंट्या आणि त्याची गॅंग प्रभाजवळ येते आणि सांगते..
“आमच्या गॅंग चं मेम्बर व्हायचं असेल तर एक परीक्षा पास व्हावी लागते..”
“बापरे… कुठली परीक्षा आहे? आत्ता पास करते बघ..”
“इतकं सोपं नाही ते…त्याला हिम्मतवान माणूस लागतो..”
“माझ्या हिमतीला चॅलेंज?? आता सांगच तू..”
“बरं ऐक… शेजारच्या मळ्यात एक खाष्ट म्हातारी राहते..तिला घाबरवून यायचं..”
“एवढंच ना..”
“ती म्हातारी साधीसुधी नाही..तिला घाबरवणं सोपं नाही..काठी घेऊनच फिरते ही म्हातारी..”
“बरं… चला मी एकदा प्रयत्न करून बघते..”
प्रभा म्हातारीच्या झोपडी जवळ जाते..म्हातारी दारातूनच वसकन ओरडते…
“काय पाहिजे??”
“पाणी मिळेल का एक ग्लास??”
“तिकडे विहीर आहे, पाणी काढ आणि पी…नाहीतर मार डुबकी..”
प्रभा म्हातारीला चांगलीच घाबरली, पोरांनी सांगितलं तशीच होती म्हातारी..एकदम खाष्ट…
पण चॅलेंजही घेतलं होतं, प्रभा मागच्या दारी गेली, तिथे छपरावर जाण्यासाठी एक शिडी होती, प्रभा सरसर वर चढली आणि वर धुरांड्याची चिमणी होती तिथून तिने खाली पाहिलं..म्हातारी चूल पेटवत होती..प्रभा तिथून ओरडली,
“म्हातारे, तुला घ्यायला आलोय..चल..”
म्हातारी कावरीबावरी झाली, हा आवाज कुठून येतोय?? चिमणीच्या त्या होलातून आवाज घुमत होता, अन म्हातारीला समजेना आवाज कुठून येतोय..
म्हातारी घाबरली अन सैरावैरा तिथून पळत सुटली, पिंट्या अन त्याची गॅंग लांबून बघत होती..त्यांनी टाळ्या वाजवल्या..
“आजपासून तू आमच्या टीम मध्ये सामील..”
प्रभा मंदिरात दिवसभर पारायण करायला जातेय असं श्वेताच्या घरी सांगत दिवसभर पिंट्या गॅंग सोबत उनाडक्या करायला जाते..शेवटी सर्वजण एका मोठया शेडखाली जमतात, त्या शेडखाली एक अनोखी प्रयोगशाळा होती, माती परीक्षण, जल परीक्षण तसंच कॉम्प्युटर, wi fi सारखी आधुनिक उपकरण तिथे होती, प्रभा हे सगळं बघतच राहिली..तोच मागून एक भलंमोठं झाड चालत आलं अन सर्वजण दचकले…
पिंट्याला समजलं, तो म्हणाला..
“श्रीधर दादा…ओळखलं मी तुला..”
श्रीधरने चेहऱ्यासमोरचं झाड बाजूला केलं आणि त्याच्या निर्मळ, शुभ्र कांतीचं दर्शन प्रभाला झालं..प्रभा त्याच्याकडे बघतच राहिली..एखाद्या शहरातला मोहक व्यक्तिमत्वाचा राजबिंडा तरुण तो होता..
“प्रभा…हा बघ श्रीधर..”
“ए…एवढ्या मोठ्या काकूंना नावाने हाक मारतोस??”
“मीच सांगितलंय त्याला…आणि हे सगळं काय आहे??”
“मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे…पण शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा गावातल्या लोकांसाठीच काहीतरी करावं म्हणून इथे शेतकीचं प्रशिक्षण घेऊन काम करतोय…शेतकऱ्यांना मार्केट उपलब्ध करून देणं, योग्य पीक लागवडीला सांगणं हे काम मी करतो..”
प्रभाला खूप कौतुक वाटलं, पिंट्या म्हणाला..
“दादा, ही श्वेता ताईची सासू…कालच आलेत..चल ना तुपण ताईला भेटायला..”
हे कळताच श्रीधर च्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, “नको, मी नंतर भेटेन..”
“असं काय रे दादा, आधी तू अन ताई मिळून किती धमाल करायचे… अन आता का असं करतोय..”
श्रीधर पिंट्या कडे डोळे वटारतो…
“तसं नाही काही, हा पिंट्यापण ना..”
“अरे मी कुठे काय म्हणतेय…चल भेट की तिला एकदा..”
पिंट्याचे हावभाव प्रभाच्या चेहऱ्यातून निसटत नाही… श्रीधर यायला तयार होतो, सर्वजण घरी जातात..
श्रीधर चे डोळे श्वेताला बघायला आतुर असतात, श्वेता बाहेर येते…श्रीधर अगदी मनभरून तिला बघतो, ती अगदी तशीच असते…मोरपंखी साडीतलं तिचं सुंदर रूप, तिचे काळेभोर रेशमी केस, नाजूक हात..गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जाताच तो भानावर येतो..
श्वेता त्याला पाहून एकदम खुश होते..
“आता आलास होय…किती वाट पाहिली मी…”
“खरं तर उशीरच झाला मला..”
त्याच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता…
क्रमशः