सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 6

 

श्रद्धा च्या सासूबाईंच्या आई त्या 23 वर्षाच्या असतानाच देवाघरी गेलेल्या…सासूबाई तेव्हा खूप लहान होत्या. श्रद्धा ने ती माहिती काढली आणि दळवी सरांना सांगितलं..

“हे बघा…आईंना सांगा की तुम्हाला देवाने स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की मी तुमची आई आहे…म्हणजे श्रद्धा सासूबाईंच्या आई आहेत असं सांगा…”

दळवी सरांकडे काही ऑप्शनच नव्हता…त्यांनी ताईला सांगितलं आणि सासूबाई आता श्रद्धा मध्ये आई बघू लागलेल्या…

श्रद्धा काम करताना किंवा सासऱ्यांना आणि केतन ला आयतं जेवण देताना दिसली की सासूबाईंना वाटे माझ्या आईला किती राबवताय…मग त्या चिडायच्या…त्यामुळे झालं काय की केतन आणि सासरेबुवांना स्वतःचं काम स्वतः करावं लागे.. तेच तर हवं होतं श्रद्धा ला…

रविवारचा दिवस…श्रद्धा उशिरा उठली…सासूबाई कामं आवरत होत्या…श्रद्धा जरा ओशाळली..इतक्यात श्रद्धा ची आई तिला भेटायला आली.. आई हॉल मधेच होती..दार वाजवताना आईच्या कानावर पडलं…

“आई तुम्ही राहुद्या…मी करेन सर्व..”

“नाही गं आई…”

“आई??”

“म्हणजे…नको गं पोरी…तू कशाला उठलीस इतक्या लवकर? जा झोप बघू अजून, उठलीस की आवाज दे, मी चहा आणते…”

“बरं…”

श्रद्धा खोलीत निघून जाते…पालथी झोपून चादर पुन्हा अंगावर ओढते अन आळस देत डोळे मिटते…

श्रद्धा च्या आईला समजतं.. दरवाजा उघडा असल्याने ती सरळ श्रद्धा च्या बेड मध्ये जाऊन श्रद्धा च्या पाठीवर एक धपाटा मारते…

“श्रद्धे. अगं जरा तरी लाज बाळग…एक तर उशिरा उठलीस…सासू काम करतेय तिकडे अन तू इथे लोळत पडलीस…लोकं काय म्हणतील? हेच संस्कार दिले का आम्ही तुला..”

“खबरदार माझ्या सुनेला एक शब्द जरी बोलल्या तर….”

श्रद्धा ची आई दचकते…घाबरून मागे होते..

“अहो पण…”

“श्रद्धा ला जराही त्रास झालेला मला सहन होणार नाही…तुम्हाला माहीत नाही ती कोण आहे..”

“कोण आहे??”

दादा ने दुसऱ्या कुणाला सांगायला मनाई केलेली म्हणून सासूबाई गप बसल्या…

“ठीक आहे… आमचा ताप आता तुम्ही सांभाळा.. येते मी..”
सासूबाईंशी भांडून आई निघून जाते..
श्रद्धा ला हसू आवरत नाही…

“च्यायला आई कोण अन सासू कोण समजतच नाहीये…जाऊद्या…आपल्याला काय..”

असं म्हणत श्रद्धा चादर ओढत परत झोपी जाते…सासूबाई प्रेमाने तिच्याकडे बघतात. .

सुनबाईचा swag एकदम बेकार चालू होता…ती बस म्हटली की सगळे बसायचे…उठ म्हटली की उठायचे..आणि आपल्या तथाकथित आईची आज्ञा केतन आणि नवऱ्याला पाळताना पाहून सासूबाई जाम खुश होत…

अशातच सासूबाई आजारी पडल्या… डॉक्टरांनी चालण्याचा व्यायाम सांगितला…पण सासूबाई कसलं ऐकताय… मग श्रद्धा ने त्यांना सांगितलं…

“आई तुमच्यावर करणी केलीय कुणीतरी… त्यामुळे तुम्ही आजारी पडल्या..”

“मलाही अगदी तसंच वाटतंय बघ…पण उपाय काय?”

“एकच उपाय…पलीकडच्या मंदिरातील वडाला 51 फेऱ्या मारायच्या..”

“इतक्या??”

“हो मग..करणी फारच मोठी आहे…आणि इतकंच नाही, त्याने घरात धनधान्य वृद्धी होते”

“जाईन जाईन…तुलाच गं माझी काळजी ..उगीच नाही करत कुणी इतकी काळजी…फार जुना संबंध आहे आपला…”

“होना? मग निघा लगेच..”

सासूबाई चप्पल घालून लगेच फेऱ्या मारायला निघतात…

दुसऱ्या दिवशी श्रद्धा ऑफिस मधून येत असताना रस्त्यावर एक माणूस रडताना दिसतो…

“का रे बाबा काय झालं?”

“ताई मी एक साधा शेतकरी…कुणीतरी मला इतक्या लांबून चार पोती गहू घेऊन बोलावलं..आणि आवडला नाही म्हणून परत पाठवतोय. .ताई असा गहू कुठेच मिळणार नाही, सेंद्रिय खताचा आहे…”

श्रद्धा गहू तपासून पाहते… गहू खरंच चांगला असतो..

“भाऊ… काळजी करू नका…हा माल माझ्या घरी पाठवा..हे घ्या पैसे..”

शेतकरी आनंदित होतो… आणि तिच्या मागोमाग जाऊन पोती ठेऊन येतो…

सासूबाई फेरीला गेलेल्या असतात…केतन नुकताच आलेला असतो..खिधातुन पैसे काढून तो देव्हाऱ्यात ठेवत असतो…

“हे काय??”

“घरखर्चाला पगारातून काही रक्कम घरी देतो मी..अशी..”

श्रद्धा ला वाटतं आपणही यात काही रक्कम ठेवावी ..तीही तिच्याकडचे काही पैसे काढते आणि केतन ने ठेवलेल्या नोटांवर ठेवते…

श्रद्धा दमलेली असते, आपल्या खोलीत जाऊन पडते…

सासूबाई येतात अन पाहतात, दारात धान्याच्या राशी पडलेल्या…
आत येऊन बघतात…नवऱ्याला आणि केतन ला धान्याबद्दल विचारतात….

“आम्ही नाही आणलेलं…”

“देवाची कृपा… आईचा आशीर्वाद..”

सासुबाई देवाला नमस्कार करायला जातात…केतन ने ठेवलेला पगार मोजतात..

“केतन…पगार वाढला का रे?”

“नाही..”

“मग घरी जास्त दिलेस का यावेळी पैसे?”

“नेहमी देतो तेवढेच ठेवलेत की..”

सासूबाई आनंदाने उड्या मारायला लागतात..

“फेऱ्या मारायला काय सुरवात केली… धान्य आणि धन दोन्ही बरसले….श्रद्धा बरोबर म्हणालेली, की फेऱ्या मारल्या म्हणजे धनधान्य वृद्धी होते ते..”

श्रद्धा वरची सासूबाईंची श्रद्धा अजून वाढली…

Leave a Comment