सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3

 

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 3

ऑफिस मध्ये गेल्यावर केतन आणि श्रद्धा भेटतात..

“केतन, सॉरी मी आज जरा आगाऊ वागले…पण आपल्याला लग्न करायचं असेल तर दुसरा पर्याय नव्हता..”

“मला नाही वाटत आपलं लग्न होईल…आणि नाही झालेलं चांगलं राहील..”

“असं का म्हणतोय?? “


“कारण आईच्या अपेक्षा खूप अवास्तव आणि भलत्यासलत्या आहेत…नोकरी करणारी सून नको, बाहेर फिरणारी सून नको, घरात राहणारी, उपास तापास यांची आवड असणारी मुलगी त्यांना सून हवीय..”

“एवढंच ना??”

“एवढंच??”

“केतन, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?”

“हो..”

“मग आता मी काय करते ते बघ..तुझ्या आईला दुखवायचा किंवा अपमानित करण्याचा माझा काही हेतू नाही…पण त्यांच्यातली अंधश्रद्धा दूर करायची म्हणजे मला थोडं चाकोरीबाहेर जाऊन वागावं लागेल….”

“माझा विश्वास आहे तुझ्यावर..मला वाईट वाटणार नाही…कर तुला काय करायचं ते..”

घरी जातांना केतन ला किरकोळ लागतं… आई पाहते आणि म्हणते…

“नजर लागली माझ्या लेकराला..ये मी नजर काढते तुझी…”

असं म्हणत आई अजब प्रकार करून शिवी देत देत हातातून झाडूच्या शेपट्या, कागद, कपड्याच्या चिंध्या ओवाळून बाहेर फेकते..

केतन श्रद्धा ला मेसेज करतो…

“मला खूप लागलंय..” असं सांगतो… या निमित्ताने तरी श्रद्धा आपली काळजी घेऊन प्रेमाचे गोड शब्द बोलेल असं त्याला वाटलं….नाहीतर “कुणाला कसं गुंडाळलं.. कुणाची कशी जिरवली…” याशिवाय तिच्याकडे दुसरे विषयच नसत…काहीही असो, पण केतनला तिच्या याच स्वभावामुळे ती आवडायची…


“बम बम बोले..”

मंदिराबाहेरचा बाबा दारात हजर…

“या बाबा..”

“मुलावर संकट आलंय… पण काल त्या मुलीचे पाय तुमच्या दाराला लागले आणि संकट टळलं…”

“बाबा…तुम्ही अंतर्यामी आहात…”

“मग सांगतो ते ऐक… श्रद्धा ला सून बनव…कल्याण होईल तुझं..”

आईला पटतं… केतन ला सांगून श्रध्दा ला आई घरी बोलावते..

“ये पोरी…तुला पोहे बनवते मस्त..”

“नको आज माझा उपास आहे..”

“आज कसला उपास?”

“आठवड्यातून 4 वेळा उपास असतो माझा…आज दत्ताचा उपास..तांदळावर कुंकू शिंपडून सुपारीने त्यावर स्वस्तिक काढलं की मग उपास सोडते मी…”

आई चमकतेच…ही पूजा मला कशी नाही माहीत??
काहीही म्हणा, मुलगी संस्कारी, उपास तापास करणारी आणि धार्मिक दिसतेय….बाबा बरोबर म्हणत होते…हीच सून व्हायला हवी..

केतन गालातल्या गालात हसून श्रद्धाचं एकेक खोटं ऐकत असतो..

“चला मी येते…आणि हो..तुमच्या देव्हाऱ्यात गणपती डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला ठेवा…आणि रोज घरात तुळशीचं पान आणून नारळावर ठेवत जा…घरात भुतं खेतं येत नाहीत. “

“होका??? नक्की करेल मी..केतन बाळ, जा श्रद्धा ला सोडून ये…आणि येताना नारळ घेऊन ये..”

“आणि हो…हा घ्या देवाचा धागा…रोज मंत्र म्हणुन मी तो गुंडाळून ठेवते…तुम्हीही सुरवात करा…चांगलं असतं..”

“गुंडाळायच्या बाबतीत तर हिचा कुणी हात धरूच शकत नाही…” केतन पुटपुटतो…

केतन श्रद्धा ला सोडायला जातो…

“श्रद्धा ते सगळं ठिके गं… पण लग्नानंतर नोकरी केलेली आईला आवडणार नाही…आलेल्या सुनेनेच घरातलं सगळं करावं अशी तिची अपेक्षा….ती फक्त गंडे दोरे यातच अडकून राहील सून आल्यावर…कसं होईल तुझं..”

“काळजी नको…असा काही डाव टाकेल की सासुबाई स्वतः मला नोकरीवर पिटाळतील आणि गंडयादोऱ्यात अडकून न राहता घरातल्या कामात अडकून राहतील..”

“Are you sure?”

“चिते की चाल, बाज की नजर और श्रद्धा की चाल पे कभी संदेह नही करते….”

केतन तिथेच तिला नमस्कार करून निघून जातो…

मग दोघांच्या घरी बोलणं होतं… लग्न ठरतं…

सासूबाईंना आता अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं आणि स्वतःचं स्वातंत्र्य ही जपायचं श्रद्धा पुढे मोठं आव्हान होतं… ते ती कसं पूर्ण करते बघा पुढील भागात..

क्रमशः

Leave a Comment