सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 2

 

कॉलेज सोडल्यानंतर श्रद्धा ची ओळख नोकरीच्या ठिकाणी असलेल्या केतन सोबत होते…केतन अत्यंत सच्चा माणूस…आणि श्रद्धा ला अशीच खरी माणसं आवडायची…खोट्याचा तिला प्रचंड राग असायचा…

घरी परत येत असताना वाटेत एक मंदिर लागायचं.. तिथे एक ढोंगी बाबा आपले चमत्कार दाखवून लोकांना लुबाडायचा… एकदा श्रद्धा ने त्याला तिथून पिटाळून लावलं होतं… पुन्हा तो दिसला नाही…पण काही दिवसांनी पुन्हा आला…श्रद्धा आता गाडीवर ये जा करत असल्याने तिचं लक्ष जात नसायचं, याचाच फायदा घेऊन त्याने पुन्हा एकदा ठाण मांडलं…

“हे बघा…या लिंबू वर कुणीतरी करणी केलीये..आता मी हा पिवळा धागा या लिंबावर टाकेन आणि धाग्याचं रक्त निघेल…”

तो ढोंगी खरोखर तसं करून दाखवतो…

“करणी आहे..इथल्या प्रत्येकावर करणी आहे….पण मी सोडवणार सर्वांना… या पेटीत देवाला 100 रुपये टाका…”

असं म्हणत बाबा पेटी पुढे करतो…मंगला काकू सर्वात पुढे…


त्या पैसे टाकणार इतक्यात श्रद्धा त्यांचा हात पकडते…

“अजिबात द्यायचे नाही..”

तो ढोंगी बाबा तिथून ताडकन उठून पळू लागतो…मागच्या वेळी असंच बाबाला चांगलाच मार पडला होता…

“ए बाबा… थांब की….हळद लावलेला दोरा सोडा टाकलेल्या लिंबावर ठेवला की लालच होतो रे राजा…”

गर्दी श्रद्धा कडे बघते, त्यांना कळत नाही काय झालं ते…

मंगला काकू चिडतात…

“कोप होईल पोरी… शिव शिव शिव…”

मंगला काकू कमालीच्या अंधश्रद्धाळू… मागे वळताना एक मांजर आडवी जाते…काकू 5 पावलं मागे जातात…

“अगं ए माऊ…तू दहा पावलं मागे जा..माणूस आडवा गेलाय तुला…”

मंगला काकूंना टोमणा मारत श्रद्धा पुढे जाते. काकू रागाने तिच्याकडे पाहत निघून जातात.

श्रद्धा केतन च्या मागे लागतो…लग्न करून घेऊया म्हणून…पण तो टाळाटाळ करत असे..

“तू नेहमी लग्नाचा विषय का टाळतोस?? टाईमपास तर करत नाहीये ना माझ्यासोबत?”

केतन ची गच्ची पकडत श्रद्धा विचारते…

“कॉलर सोड…अगं बाई, तसं काही नाहीये…कारण थोडं वेगळं आहे…”

“काय कारण?”

“तुला माझ्या घरच्यांबद्दल माहीत नाही…माझी आई…ग्रह, तारे, कुंडली, गंडे, दोरे यात अडकून पडलीये…प्रचंड अंधश्रद्धाळू…. मी नाही बदलू शकलो तिला…आणि तुला तर या गोष्टींचा प्रचंड राग…”

“एवढंच ना…”


“एवढंच??”

“मी बदलेन की त्यांना…”

“इतकं सोपं नाहीये…”

“सोपी कामं आवडतच नाही आपल्याला…”

“आई लग्न जमवताना दहा गोष्टी बघेल, एकही जुळली नाही तरी सगळं खल्लास..”

श्रद्धा घरी जाते अन विचार करते….

दुसऱ्या दिवशी केतन ऑफिस साठी तयार होत असतो..

“बाळा हा घे डबा…आणि आज पूर्व दिशेला तोंड करून जेव…”

“बरं…”

इतक्यात त्या मंदिरा समोर बसत असणारा ढोंगी बाबा दाराशी येतो…

“बम बम बोले…”

“बाबा?? या या….तुमचे पाय माझ्या घराला लागले…सार्थक झालं माझं…”

“मुलाचं लग्न करायचंय??”

“हो..”

“माझ्या माहितीत एक मुलगी आहे….मुलाचं कल्याण होईल तुमच्या…”


“काय सांगता? बाबा तुम्ही सांगितलं म्हणजे चिंताच नाही..”

“बाळा आत ये…”

श्रद्धा लाजत मुरकत आत येते…

दोघी एकमेकींना पाहुन दचकतात…

“तू??”

“तुम्ही??”

बाबा गोंधळतो…

“तुम्ही ओळखता?”

“ही सटवी….माझी टिंगल उडवत होती…तुम्हाला पिटाळून लावत होती…हिला सून करू??”

“बम बम बोले….ती ही मुलगी नव्हती… तिच्यातली देवी होती….”

“म्हणजे??”

“तिच्यात देवी येते…अंगात येतं तिच्या…हो की नाही?”

श्रद्धा केस सोडून घुमायला लागते…

“बघा बघा…”

मंगला काकू हात जोडून उभ्या राहतात..

“आई येतो गं… ” असं म्हणत केतन बाहेर येतो अन पाहतो तर काय…

श्रद्धा घुमतेय आणि आई तिच्यासमोर उभी राहून नमस्कार करतेय???


सासूबाईंनी अंधश्रद्धा घालवायची म्हणजे त्यांच्याच मार्गाने घालवावी लागेल असा श्रद्धा चा विचार होता…

बाहेर निघाल्यावर..

“ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बोललो सगळं…आता मारू नका मला..”

“तुला का मारू मी…तुझी गरज लागेलच की रे पुढे..आणि बरं झालं सांभाळून घेतलंस…डोकं आहे…फक्त नको तिथे चालवतो…..”

क्रमशः

Leave a Comment