समर्पण

 “पाच मिनिटापूर्वी टोपलंभर भांडी घासली, तरी सिंक मध्ये चार ग्लास आलेच..तिथेच खुर्ची टाकून बसावं आता..”

गिरिजाची ही चिडचिड रोहनला नवीन नव्हती. तिचे सर्व डायलॉग एव्हाना त्याचे पाठही झाले होते. तो अजून अंघोळीला बसला नव्हता, त्यामुळे पुढील पाच मिनिटात हा डायलॉग ऐकू येणार..

“पटापट अंघोळीच करत नाहीत ही लोकं, 4 वाजेपर्यंत मशीनच चालू द्यायचं..”

रोहन हा डायलॉग ऐकू येईपर्यंत अंघोळीला काही जात नसे. आजही तो डायलॉग कानावर पडला अन मगच त्याच्या अंघोळीची वेळ झाली. 

“संध्याकाळी काय करू जेवायला?”

“काहीही कर..”

“असं म्हणायचं अन समोर आलेलं ताट बघून नाक मुरडायचं.. त्यापेक्षा आत्ताच सांगून द्या..”

रोहन मोठ्या जोशात सांगतो..

“सांबर, वडा आणि डोसा..”

गिरीजाचा राग अजून वाढतो, 

“मुद्दाम सांगा असलं..डोश्याचं पीठ असं ऐनवेळी बनतं का? एक दिवस आधी बनवावं लागतं.. जाऊदे, बघते मी काय करायचं ते..हा डबा न्या आठवणीने..”

रोहन तयारी करून डबा घेऊन ऑफीसला निघतो, गाडीची चावी घरातच राहिली असं लक्षात येतं. आधीच उशीर झालेला असतो..रोहन शूज न काढता झपझप पावलं टाकत आत येतो आणि पटकन चावी घेऊन पसार होतो..

“अहो खुशाल बुट घालून झाडून पुसलेल्या फरशीवर येतात…तुम्हाला काही..”

या डायलॉग पासून सुटका म्हणून रोहन पटकन पसार होतो. ऑफिसला पोचताच त्याला समजतं की आज केशव सर आले आहेत. केशव सर म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर मधील एक, म्हणजे  बॉसच. तो कधी काय करायला सांगेन याचा भरवसा नसायचा. तो आला म्हणजे सर्वांची धांदल उडे. 

आज त्याने नेमकं राहुल च्या डिपार्टमेंट मध्ये पाय ठेवला. केशव सर आले आणि सर्वजण उठून उभे राहिले. 

“Thanks बडीज.. प्लिज सीट..”

आता पुढ्यात काय वाढून ठेवलंय म्हणून सर्वांना घाबरायला होतं. केशव सर नजर सर्व स्टाफवर फिरवतात. आणि रोहन कडे बघून म्हणतात..

“Hey you.. come here..”

झालं कल्याण..

रोहन त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो. 

“तर..आपल्या कंपनीत आपण मेहनत करताय, काम करताय हे सगळं तर आहेच..पण आपण डेडिकेशन किती देतोय कामात हे कसं कळणार??”

नेहमीप्रमाणे न समजणारा प्रश्न त्यांनी विचारला अन स्टाफ गप बसून राहिला. केशव सर म्हणाले. 

“Ok सोप्या शब्दात सांगतो.. मिस्टर रोहन, तुमचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. तुम्ही मन लावून काम केलंत त्यात तुमचं कंपनी साठी असलेलं डेडिकेशन दिसून आलं. आज तुम्ही सर्वांना एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे..विषय आहे- what is dedication..”

झालं, रोहनच्या दुखऱ्या जागेवर बोट ठेवला गेला. समोर येऊन बोलायची हिम्मत त्याला कधीच नव्हती. शाळा कॉलेजमध्ये असलं काही सांगितलं की त्याच्या पोटात गोळा यायचा. पण आज ते करणं भाग होतं.

रोहनला समोर उभं करून केशव सर खुर्चीवर जाऊन बसतात आणि म्हणतात..

“करा सुरू..”

रोहनला समजेना काय बोलावं. पण त्याने मेंदूला ताण दिला..काय असतं dedication? कुठे दिसलं आपल्याला ते? आपल्या आसपास?? की..आपल्याच घरात??”

रोहनच्या मनात घरातले प्रसंग उभे राहू लागले आणि तो आपोआप बोलू लागतो..

“डेडिकेशन..लख्ख भांडी घडून अन पुसून स्वच्छ केलेल्या सिंक मध्ये चार खरकटी भांडी येउन पडतात तेव्हा घशातच काहीतरी अडकल्यासारखं वाटणं म्हणजे डेडिकेशन…”

“सूर्याची हजेरी असेस्तोवर त्याच्याकडून कपडे कडक वाळवून घेण्याचं काम म्हणजे डेडिकेशन..”

“स्वच्छ फरशीवर कुणी बाहेरचे शूज घालून चालत गेला तर अगदी  हृदयातच खड्डा पडल्यासारखं वाटणं म्हणजे डेडिकेशन..”

“संपूर्ण घर नीट आवरलं जात नाही तोवर मन थाऱ्यावर नसणं म्हणजे डेडिकेशन..”

“एक प्रहरीचं जेवण करत असताना दुसऱ्या प्रहरी ताटात काय असावं याची चिंता म्हणजे डेडिकेशन… डेडिकेशन म्हणजे एखाद्या स्त्री चं घराबद्दल असलेलं समर्पण… ती घराशी इतकी एकरूप होऊन जाते की घरातील एखादं काम अपूर्ण असणं तिला स्वतःचीच अपूर्णता वाटते..आणि ते पूर्ण केल्याशिवाय स्वतःला पूर्णत्वाचा अनुभव येऊ देत नाही…हे खरं डेडिकेशन… ही कंपनी आपलं घरच आहे, त्याच्या प्रगतीसाठी आपण हेच करायला हवं. कंपनीची अडचण आपण आपली अडचण समजून काम करायला हवं..”

रोहनचं बोलून झालं अन टाळ्यांचा गडगडाट झाला. इतके दिवस  गिरीजाची चिडचिड दिसत होती..पण आज समर्पण दिसलं..घरी गेल्यावर कधी एकदा हे गिरीजाला सांगतो असं झालं..

“शुज बाहेर काढा..हात पाय धुवा…मी गरम गरम डोसा करून आणते..”

रोहन हात पाय धुतो, टेबलापाशी खुर्ची घेऊन बसतो. समोर ताट येतं..  तो गिरीजाला म्हणतो..

“तुला माहितीये.. आज..” त्याचं लक्ष ताटाकडे जातं..सांबार, डोसा बघून तो हसतो..

“फक्त डेडिकेशन नाही…मॅनेजमेंट काय असते तेही सांगायला हवं होतं..”

©संजना इंगळे

_____________

ईरा पुन्हा एकदा आयोजित करत आहे एक नवीन स्पर्धा…
“कादंबरी लेखन स्पर्धा..”
 आपल्यातील अनेक लेखक उत्तमोत्तम कथामालिका लिहितात, पण त्याला कादंबरी चे स्वरूप आपण ईरा व्यासपीठावर देऊ शकतो. लिखाणात सातत्य आणि नवनवीन कल्पनाशक्तीला वाव या स्पर्धेतून नक्कीच साध्य होईल. स्पर्धेनंतर तुम्ही हीच कादंबरी छापील स्वरूपात प्रकाशित करू शकतात. त्यामुळे ही एक संधी आहे, आपल्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याची. स्पर्धेसाठी नियम आणि अटी खालीलप्रमाणे.
1. स्पर्धा 1 एप्रिल ते 31 जुलै पर्यंत असेल 
2. कादंबरी  किमान 30 भागांची असावी, एका भागात किमान 1500 शब्द असावेत.
3. पुढील भाग पब्लिश करण्यात 2 दिवसाहुन जास्त अंतर नको. 
3. कादंबरी साठी तुम्ही तुम्हाला हवा तो विषय निवडू शकता.
4. निकालाच्या वेळी भाषा, व्याकरण, विषयानुरूप लेखन या सर्वांचा विचार करून क्रमांक दिले जातील. 
5. सहभागी प्रत्येक लेखकाला एक सन्मानचिन्ह दिले जाईल 
6. कादंबरी साठी मिळालेल्या views नुसार दरमहा मानधनही दिले जाईल.
7. शीर्षकात #मराठी_कादंबरी असा उल्लेख असावा.
8. कथामालिका अर्धवट सोडून जाता येणार नाही. 
9. गरज भासली तर अंतिम तारीख काही दिवस वाढवून देण्याचे अधिकार ईरा टीम कडे असतील. 
10. ईरा च्या नियमानुसार सदर कथामालिका फक्त ईरा वेबसाईटवर असावी. अपवाद तुमचे फेसबुक पेज आणि वेबसाईट. तिथे टाकत असाल तरी आधी ईरा वेबसाईटवर पब्लिश करून इतरत्र शेयर करावी. 
11. कथामालिका पोस्ट केल्यानंतर ती लिंक फेसबुकवर शेयर करून बघावी, इमेज दिसत असल्यास राहू द्यावे अथवा मोठी इमेज टाकावी.
12. ब्लॉग पोस्ट केल्यानंतर एडिट करू नये, गरज भासलीच तर आम्हाला संपर्क करावा. आम्ही हरप्रकारे मदत करण्यास तत्पर आहोत.
13. काहीही शंका असल्यास 8087201815 या क्रमांकावर whatsapp करून विचारावे

6 thoughts on “समर्पण”

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

    Reply

Leave a Comment