संस्कार




“मम्मा आजीसाठी कशाला घेतेय एवढं सगळं? पप्पाचा भाऊ आहे ना पोसायला?…पैसे झाडाला लागतात का?”
10 वर्षाचा अनिकेत मोठ्या माणसासारखं बोलून गेला आणि अनिता व केतन च्या अंगावर काटाच उभा राहिला..कुठून शिकला असेल तो हे? कोणी शिकवलं त्याला?
केतन अनिता ला बोलू लागला…
“तूच शिकवलंय ना याला हे सगळं? माझ्या आई वडिलांचं आणि भावाचं तुला आधीच एकतर वावडं.. पण मुलालाही तू हेच संस्कार केलेस?? लाज वाटते मला…”
“एक मिनिट… हे असलं काही मी शिकवलेलं नाही त्याला…मला चांगलं माहितीये मुलावर कसे संस्कार करायचे ते…”
केतन, अनिता आणि अनिकेत त्यांच्या गावी जायला निघालेले, केतन अनिता ला एकेक वस्तू सोबत घ्यायला सांगत होता…तेव्हाच हा अनिकेत हे बोलला होता.
दोघांना कळेना हे असं अचानक कसं बोलून गेला तो?
अनिता ने खूप विचार केला…आणि शेवटी अनिकेत ला विचारायचं ठरवलं…
“बाळा, कुठून ऐकलंस हे तू?”
“काय?”
“हे आजीसाठी कशाला घेतलं वगैरे बोलायला..”
“पप्पाच तर म्हणायचा…”
“काय?? मी?? मी कधी बोललो?”
“मागच्या वेळी नाही का…आपण मामाकडे जाणार होतो…आईने आजी साठी काही वस्तू आणि द्यायला काही पैसे घेतले तर तू कसा ओरडला होतास…की काय गरज आहे आजीला वस्तू न्यायची..तुझा भाऊ करेल तुझ्या आईचं वगैरे….यावेळी परत आईला तू बोलायला नको म्हणून आधीच आईला बोललो मी…”
“अरे बाळ…तेव्हा तुझ्या मामाकडे जायचं होतं…”
“मग आताही काका कडेच जातोय की?”
“तो माझा भाऊ आहे…”
“मग मामा सुद्धा आईचा भाऊ आहे…भावाने करावं असं तू म्हटलास मग काकाने केलं असं म्हटलं तर काय वेगळं?”
“अरे बाळ…हे आईचं सासर आहे…ते माहेर होतं…”
“म्हणजे आईचा जन्म जिथे झाला तेच ना? मग तर आईला त्यांचंबद्दल जास्त उपकार हवेत…”
“तसं नसतं बाळ…माहेर सोडावं लागतं लग्नानंतर…सासरी करावं लागतं सगळं…”
“सोडायचं म्हणजे? उद्या मी बाहेरगावी गेलो तर कायमचं सोडणार तुम्हाला? काहीही संबंध नसेल आपला??”
आता मात्र केतन अनुत्तरित झाला…अनिता ने केतन ला हळूच बाजूला ओढलं आणि सांगितलं..
“पाया पडते तुमच्या, हे असले बुरसटलेले विचार आपल्या मुलावर तरी लादू नका…स्त्री च्या माहेराला खालचं लेखायचं…स्त्री ने माहेरची काहीही जबाबदारी उचलू नये…स्त्री ला आई वडीलांबद्दल जास्त ओढ नको हे असलं काही त्याचा मनावर बिंबवू नका…उद्या आपल्या छकुली माहेरी आली तर अनिकेतने तिला हेच सांगून सासरी पिटाळलं तर? तेव्हा आपण नसू, आपल्या मागे अनिकेतच छकुलिचं माहेर असणार आहे…”
छकुलीचं नाव काढताच केतन ला गलबलून आलं…त्याला त्याची चूक समजली…तो पटकन अनिकेत कडे वळला…
“बाळा, आईच्या माहेरी सुद्धा तितकंच करायचं हा आपण… जसे माझे आई वडील तसेच आईचे…त्यांनाही तितकंच प्रेम मिळण्याचा अधिकार आहे…”

असं म्हणत केतन ने पिशवीतून काढून ठेवलेल्या वस्तू पुन्हा बॅगेत ठेवल्या, कपाटातून ज्यादा पैसे घेतले आणि अनिता च्या माहेरी जायला ते निघाले…

Leave a Comment