संध्या…

दुसऱ्या दिवशी महत्वाची कामं असल्याने मोबाईल वर सकाळचा 6 चा अलार्म लावला आणि झोपी गेले. पण एखादा दिवसच वाईट असतो, सकाळी जाग आली तेव्हा 8 वाजले होते. अलार्म वाजला कसा नाही हे पहायला मोबाईल घेतला अन पाहिलं की am च्या ऐवजी pm केलं होतं. उठल्या उठल्या चिडचिड झाली.

तशीच उठून फ्रेश झाले आणि कामाला लागले. आधी स्वयंपाक करून ठेऊन देऊ म्हणजे बाकीचे उठल्यावर खायला दे खायला दे करणार नाही असं ठरवलं. अशातच लाईट गेली आणि मिक्सरमुळे तेही काम अडून राहिलं. आज काही काम होणार नाही असं म्हणत नलिनी ला कळवलं आणि आजची कामं postpone केली. चिडचिड प्रचंड होत होती त्यात मोबाईल वर संध्या चे 68 मेसेज. उघडून पाहिलं तर 68 फोटो तिने पाठवले होते. साड्या, पर्स, ज्वेलरी असं नाना प्रकारचं साहित्य ती विकत होती. तिने पाठवलेल्या फोटोज मुळे गॅलरी फुल झालेली आणि low disc space चा मेसेज मोबाईल वर सतत यायचा. चिडचिडेपणा आज जास्तच वाढल्याने तात्काळ मी तिला कसलाही विचार न करता ब्लॉक केलं.

संध्याकाळी कुठे जरा मन शांत झालं, दारावरची बेल वाजली आणि दारात संध्या उभी. तिला मी रागरागात ब्लॉक केलं याचं मला वाईट वाटलं, तिला आत बोलावलं.

संध्या, तिचा नवरा आणि तिचा मुलगा आमच्या बंगल्यात काही दिवस भाड्याने राहत होते. काही दिवसांनी त्यांनी स्वतःचं घर घेतलं पण आमच्याकडे येणं जाणं चालू असायचं. त्यातच तिने ऑनलाइन वस्तू विकायची कामं सुरू केली, मोबाईल वर ग्रुप तयार करून, मैत्रिणींना तिच्या प्रॉडक्ट्स चे फोटो पाठवून ऑर्डर्स घेत होती. एक दोन वेळा मीही तिच्या समाधानासाठी वस्तू विकत घेतल्या होत्या.

“ताई तुमचा मोबाईल बंद आहे का? माझे मेसेज जात नाहीये तुम्हाला..”

मला काय उत्तर द्यावे कळत नव्हतं, अखेर हो म्हणत मी वेळ मारून नेली.

“काय म्हणतेस, कसं चाललंय सगळं..”

“माझं मजेत…बरं ताई हे बघ, हा नवीन स्टॉक आला आहे…खूप सुंदर ड्रेस आहेत, तुम्हाला खूप उठून दिसतील..” असं म्हणत तिने तिच्या मोबाईल मधले काही फोटो दाखवले.

“अगं माझ्याकडे भरपूर ड्रेस पडले आहेत…आता नवीन नको घ्यायला..”

“अहो बाईच्या जातील कपडे पुरतात का कधी, घ्या की एखादा..”

तिला मी नको नको म्हणत असतानाही ती फारच आग्रह करत होती, अखेर मी विचारलं..

“संध्या, अगं इतका खटाटोप कशासाठी?? तुझं घर झालंय, महिन्याला पुरतील इतके पैसे तुझा नवरा कमावतोय…मग हे सगळं कशासाठी??”

“तेच ना ताई, आमचे हे महिन्याला पूरतील इतकंच कमावताय, पण मोहित साठी काही करायला हवं ना??”

“म्हणजे??”

“मोहित च्या शाळेतून फोन आलेला, त्याच्या टीचर सांगत होत्या की मोहित खूप हुशार आहे, त्याला स्कॉलरशिप ला बसवा…शाळेतच extra क्लास घेणार आहेत ते लावून घ्या..”

“अरेवा, चांगलं आहे की मग..”

“आमचे हे…सतत अभ्यास कर अभ्यास कर म्हणून मोहित ला सांगत असतात, इतके चांगले गुण पाहून त्यांना आनंदच होतो म्हणा पण हे स्कॉलरशिप आणि extra फी द्यायची म्हटली की म्हणतात…काय गरज आहे त्याला इतकं बर्डन देण्याची? त्याच्याकडून होईल तेवढा अभ्यास करेल घरीच…कशाला हवाय क्लास…”

“अगं पण त्याला ईच्छा असेल आणि तो हुशार असेल तर काय हरकत आहे क्लास लावायला..”

“त्याला आहे इच्छा, पण सगळं हे पैशांवर अडून पडलं, घराचे हफ्ते फेडतोय..हे तरी किती करणार गं, त्यांच्यावरही लोड येतो…पण मी मात्र काहीही झालं तरी मुलाला स्कॉलरशिप चा क्लास लावणार म्हणजे लावणार, त्याची 15000 फी आहे…6 हजार जमवले आहेत कसेबसे…बाकीचे हे विकून विकून करेन जमा..”

मुलाला चांगलं शिक्षण मिळावं, त्याचं भविष्य उज्ज्वल असावं अशी धडपड त्या माऊलीच्या डोळ्यात मला दिसत होती..

अश्या कित्येक स्त्रिया आहेत ज्या मुलाच्या शिक्षणासाठी, त्याला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी धडपडत आहेत…घरातलं बघून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून या रणरागिणी मुलांसाठी चाकोरीबाहेर जाऊनही काम करायची हिम्मत दाखवत आहेत.

संध्या सगळं सांगत सांगत जायला निघाली तसं तिला थांबवलं..

“संध्या…मला ते 3 ड्रेस खूप आवडलेत… ऑर्डर करशील माझ्यासाठी??”

Leave a Comment