शेजारधर्म

 पहाटे पाच वाजता रघुकाकांची त्यांच्याच बागेत संशयास्पद हालचाल सुरू होती. एरवी सकाळी 9 पर्यंत लोळत असणारा केतन आज पहाटे पाच चा गजर लावून काकांवर पाळत ठेवायला उठला होता. त्याला कारणही तसंच होतं, काकांचा एकुलता एक मुलगा मुंबईत मोठा ऑफिसर. त्याची बायको, मुलं सर्व त्याच्यासोबत. रघूकाकांना तो दरमहा भरघोस रक्कम पाठवत असे. काकांचं आयुष्य अगदी सुखासमाधानाने चालू असताना मधेच हे असं वागणं केतनला खटकत होतं. 

केतन पूर्ण एरियात वात्रट मुलगा म्हणून प्रसिद्ध..रघूकाकांच्या तर नाकी नऊ आणून सोडले होते. रघुकाका आणि त्यांच्या बायकोला बागकामाची भारी हौस, मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांच्या शेजारच्या बागेत आंबा, चिकू, पेरू अशी फळझाडं लावली होती. लहानपणी केतन गपचूप त्यांच्या बागेत शिरून पेरू, चिकू चोरून आणे आणि गपचूप खात असे. त्याला अनेकदा पकडण्यात यायचं पण त्याची खोड काही जायची नाही. केतन आता बारावीत शिकत होता, पण तरीही अधूनमधून लहर आली की आंबे, चिकू चोराण्यात त्याला भारी हौस वाटे.

“केतन, रघूकाकांना ही बासुंदी देऊन ये जा बरं..”

केतनच्या आईने फर्मान सोडलं,

“आई आधीच एक तर एवढीशी बासुंदी केलीय त्यात आणखी वाटून देतेय तू..”

“अरे त्यांची वाटी राहिली होती आपल्याकडे, आणि शेजारधर्म वगैरे काही कळतो का तुला…”

केतन वाटी घेऊन राघूकाकांकडे गेला. वाटी देऊन झाली आणि रघुकाका कामात आहे बघताच हळूच त्यांच्या बागेत शिरला. पण झाडावरची बरीच फळं गायब होती, त्याच्या हाती 2 चिकू आणि एक पेरू लागला आणि तो माघारी परतला पण त्याला मोठं आश्चर्य वाटलं..काका काकू फळ पूर्ण पिकून खाली पडल्याशिवाय उचलत नसत, मग सगळी फळं गेली कुठे? 

केतनला बागेतल्या झाडांशी आणि फळांशी चांगलीच ओळख झालेली होती. त्याला वाटलं यावेळी लवकर काढली असतील फळं..

काही महिन्यांनी पुन्हा तेच, काका काकू झाडावर फळं ठेवतच नव्हती, केतन गेला की 2-4 फळं फक्त हातात यायची. मग इतक्या साऱ्या फळांचे करतात काय? केतनला काहीतरी गडबड वाटू लागली, त्याने काकांच्या बागेवर पाळत ठेवली. पण दिवसभर काहिही हालचाल दिसली नाही. पण त्याच्या लक्षात आलं की झाडावरची फळं रात्री झोपायच्या वेळी तिथेच असायची पण पहाटे पहाटे गायब व्हायची. मग त्याने पाच चा गजर लावला आणि खिडकीतून पुन्हा पाळत ठेवली. त्याने जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना..

रघुकाका त्यांच्याच बागेत चोरासारखे चेहरा लपवून फळं तोडत होते आणि एका टोपलीत भरून रस्त्याने चालायला लागलेले. केतन घरात सर्वांची नजर चुकवत त्यांच्या मागे जायला लागला, तेवढ्यात आईने पाहिलं…

“अगं जॉगिंग ला चाललोय..”

आईसाठी तर हा धक्काच होता..

केतन हळूहळू त्यांच्या मागे गेला. काका दूरच्या एका भागात रस्त्याच्या कडेला बसले आणि फळांची टोपली त्यांनी पुढ्यात ठेवली. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे गिर्हाईक म्हणून आशेने बघू लागले.

केतन सुन्न झाला, रघुकाका म्हणजे कॉलनीतील प्रतिष्ठित व्यक्ती, मुलाला ऑफिसर केलं म्हणून लोकं त्यांच्याकडे आदराने बघत होती. अश्या रघूकाकांवर फळं विकायची वेळ यावी?

घरी आल्यावर केतनने अंघोळ केली, अभ्यासाला बसला तरी त्याचं मन काही रमेना. अश्यातच रघूकाकांची बायको घरी आली, 

“केतन बाळा हे व्हिडीओ कॉल कसा करतात सांग रे बाळा..अजितचा फोन येतोय..”

केतनने त्यांना त्यांच्या मुलाला व्हिडीओ कॉल लावून दिला. काकू तिथेच बोलत बसल्या, त्यांचं बोलून झाल्यावर त्यांनी केतनकडे दिला..

“एवढा कट कर रे बाळा..”

केतनने फोन घेतला, पण कट करण्याऐवजी अजित दादाशी तो बोलायला लागला..

“काय दादा, बरा आहेस ना?”

“हो रे केतन, मी मजेत…तू कसा आहेस?”

“मी मजेत, काय मग..मुंबईला मोठा ऑफिसर म्हणून कामाला आहेस, मज्जा आहे तुझी..”

“अरे कसली मजा, आत्ताच नवीन घर घेतलंय.. आता पूर्ण आयुष्य हफ्ते फेडण्यात जाणार..बाबांना पेन्शन आहे म्हणून ठीक, नाहीतर घरी पैसे द्यावे लागले असते..”

केतनने फोन ठेवला आणि आत्ता त्याला सगळा उलगडा झाला. रघुकाकांना त्यांचा मुलगा अजित नवीन घर घेतल्याने पैसे पाठवत नव्हता. काकांना पेन्शन होतं पण अगदीच 2-3 हजार महिना. त्यात घरखर्च थोडीच भागणार होता? काका प्रचंड स्वाभिमानी, मुलाकडे अडचण न मांडता स्वतः त्यांच्या बागेतील फळं काढून ती विकायला नेऊ लागली आणि घरखर्चासाठी थोडीफार कमाई करू लागलेले. 

केतनला खूप वाईट वाटलं, पण त्याने काकांना मदत करायची ठरवली. 

“रघुकाका…तुमची इतकी छान फळं येतात, तुम्ही ऑनलाइन विकत का नाहीत?”

काका केतनचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले. त्यांनाही शेवटी फळं विकून पैसे हवेच होते. 

“मी तुम्हाला एक छान वेबसाईट तयार करून देतो, त्यात फळांची लिस्ट आणि किंमत कशी टाकायची हेही शिकवतो.. चालेल?”

काकांनी आनंदाने होकार दिला..

“खरं तर गरज नाहीये, पण वेळ जाता जात नाही, असं काहीतरी काम असलं की बरं पडेन..”

केतन फक्त हसला. त्याने 4 दिवसात वेबसाईट तयार करून दिली आणि काकांना सगळं शिकवून दिलं. हळूहळू ऑनलाइन मागणी सुरू झाली, लोकांना फळं आवडू लागली..काकांचं सकाळी सकाळी रस्त्याच्या कडेला जाऊन फळं विकणं बंद झालं. 

घरखर्च निघेल इतके पैसे आता येऊ लागलेले. पॅकिंग आणि कुरियर करण्यात काका काकूंचा दिवस जाऊ लागला. काकू अधिक उत्साहाने झाडांची काळजी घेऊ लागल्या..

रघुकाकांना आता कुणापुढेही हात पसरवायची गरज उरली नाही, पुन्हा एकदा स्वाभिमानाने त्यांची मान ताठ झाली होती. 

पुन्हा एकदा आईने बासुंदी बनवली, 

“केतन…काकांना बासुंदी देऊन ये..”

“आई काय गं..”

“जा लवकर, शेजारधर्म वगैरे काही असतो की नाही..”

केतनला हसू आलं, तो बासुंदी द्यायला गेला. काका घरी नव्हते, त्याने काकूंच्या हातात वाटी दिली आणि तो माघारी फिरला..काकूंनी हळूच आवाज दिला..

“आज बागेत नाही घुसणार? काकांनी तुझ्या वाटची फळं ठेवली आहेत झाडावर..”

रघुकाका ही दोन चार फळं झाडावर मुद्दाम का ठेवायची हे आज त्याला समजलं..

1 thought on “शेजारधर्म”

Leave a Comment