“माझ्या आईचा फोटो dp ठेव..”
अविनाशने त्याच्या बायकोला जणू फर्मानच सोडलं. महिला दिन असो, मातृदिन असो वा अविनाशच्या आईचा वाढदिवस.. अविनाशचा नेहमी आग्रह असे की अश्या प्रसंगी जर मंजिरीच्या आईचा फोटो असेल तर सोबत माझ्या आईचाही फोटो यायला हवा. मंजिरी अविनाशच्या आग्रहाखातर ते करत असे..
मंजिरीच्या आईचा वाढदिवस आला. तिने आईचा डीपी ठेवला. तिच्या मनात आलं की जसा मी सासुबाईंचा फोटो ठेवते तसंच अविनाशनेही ठेवायला हवा? काय हरकत आहे? मी सासुबाईंचा फोटो तर नेहमीच ठेवत असते..
“अहो, माझ्या आईचा वाढदिवस आहे आज, स्टेटस टाका की तुम्हीही..”
“वेडी बिडी झालीस का, आईला काय वाटेल?”
“काय वाटेल?”
“मला तुझ्या माहेरच्या लोकांचा फार पुळका असंच वाटेल, आईला आवडणार नाही..”
मंजिरीच्या डोक्यात एकच सनक गेली. तिने ठरवलं की यापुढे अविनाशचं ऐकायचं नाही.
मातृदिन आला, सर्वांनी आईवर छान छान स्टेटस टाकले, आईचे फोटो टाकले..अविनाशने मोबाईल हातात घेतला, मंजिरीने तिच्या आईचा फोटो टाकून छानपैकी संदेश टाकला होता. पण माझ्या आईचा फोटो नाही म्हणून त्याने मंजिरीला लगेच गाठलं..
“माझ्या आईचाही टाक की फोटो, आता माझी आई ही तुझीही आईच..”
“अविनाश, मान्य आहे की सासूबाई आईच्या जागी आहेत..पण आई नाहीत..आईची जागा दुसरी कुणीही घेऊ शकत नाही.मला सासूबाईंबद्दल आदर आहे, पण म्हणून माझ्या आईच्या ठिकाणी मी त्यांना नाही पाहू शकत. आई ती आईच..आणि तुला जर माझ्या आईचा फोटो टाकायला लाज वाटत असेल तर मी का म्हणून तुझं ऐकायचं? दोन्ही कुटुंबाकडून समान आदर अपेक्षित आहे. तुझ्या आईचा फोटो टाकला तर माझ्या घरी आनंद होतो, त्यांना बरं वाटतं की आपल्या मुलीने सासूला आईचा दर्जा दिलाय..पण तुझ्या घरी याच्या उलट का आहे? तू माझ्या आईचा फोटो टाकला तर तुझ्या घरी वादळ उठतं, बरोबर ना?”
अविनाश निरुत्तर झाला, मंजिरीचं म्हणणं त्याला पटलं आणि यापुढे कधीही अश्या दिखाऊ नात्याचं प्रदर्शन करायला त्याने आग्रह धरला नाही.
नात्यांना दिलेला सन्मान हा दोन्ही बाजूंनी अपेक्षित आहे, तो फक्त मुलीनेच करावा, सासरच्यांना जन्मदात्या आई वडिलांचा दर्जा द्यावा असं वाटत असेल तर हीच गोष्ट मुलानेही केली तर खऱ्या अर्थाने लग्नसंस्था टिकेल.