वैभव

 मॉल मध्ये सुमतीला अचानक विशाखा दिसली अन दिसताक्षणी दोघींनी एकमेकींना मिठी मारली. दोघीही बालपणीच्या मैत्रिणी, शाळेनंतर पहिल्यांदाच दोघी भेटल्या होत्या. दोघीही आपापल्या नवऱ्यासोबत आलेल्या, दोघींना किती बोलावं अन किती नाही असं झालं. सुमतीच्या नवऱ्याला हे बघून समजलं की आता या दोघी लवकर इथून हलणार नाहीत, दोघींच्या नवऱ्याने ठरवलं की तुम्ही दोघी कॅन्टीन मध्ये जाऊन नाष्टा करा, गप्पा मारा तोवर आम्ही आपापली कामं करून येतो. 

दोघीही कँटीनमध्ये गेल्या, सुमती ऑर्डर देताना पदार्थाकडे कमी अन किमतीकडे जास्त बघत होती.. विशाखा तिला म्हणाली,

“अगं बिल मी भरेन, तू काळजी करू नको..”

मैत्रीत अखेर श्रीमंत गरीब हा भेद तिने वर काढलाच..

“अगं नाही, अर्धे अर्धे भरू..”

“नको गं.. मला काही कमी नाही, एवढंसं बिल भरून मला नाही काही फरक पडणार..”

म्हणजेच हे बिल सुमतीसाठी जास्त असेल असा तिचा रोख होता. 

सुमती शाळेत नेहमी सर्वांच्या पुढे असायची, विशाखा तिची मैत्रीण असली तरी तिला सुमती बद्दल ईर्षा वाटायची, पण तिने ती कधी दाखवली नाही. पण आज आयुष्यात मात्र मीच जिंकलीय हे दाखवण्याचा विशाखाचा प्रयत्न होता. सुमतीने गरीब पण कर्तबगार आणि प्रेमळ मुलगा बघून होकार दिलेला, याउलट विशाखाने एका श्रीमंत मुलाशी सलगी करून त्याच्याशीच संसार थाटला होता. 

वागण्या आणि बोलण्यातून विशाखा तिच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत होती, सुमतीला आता नको नको झालेलं, कधी एकदा हिच्यापासून सुटका होते असं तिला झालं. 

दोघींचं बोलून झाल्यावर त्यांनी आपापल्या नवऱ्याला फोन करून बोलावून घेतलं. सुमती निरोप घेणार तोच विशाखा ने तिला शॉपिंग साठी मदत करायला परत थांबवलं, यावेळी दोघींचे नवरे सोबत होते. विशाखा महागडे कपडे एकेक करून सहजपणे बास्केटमध्ये टाकत होती, सुमतीला तर नवलच वाटलं..इतके महागडे कपडे आणि इतक्या महागड्या वस्तू? ज्या वस्तू सुमतीने फक्त स्वप्नात पाहिल्या असतील त्या विशाखा सहजपणे घेत होती आणि नवराही तिच्या प्रत्येक वस्तूला हो म्हणत होता. कुठे ना कुठे सुमतीला वाटू लागलं, जगात सुखी राहण्यासाठी पैसा हवाच..प्रेमळपणा आणि कर्तबगारीने सुख मिळत नाही. 

विशाखाने तिच्या हातात मावणार नाहीत इतकी शॉपिंग करून काउंटर वर आली

आणि मिस्टरांना इशारा केला. तिच्या नवऱ्याने येऊन कार्ड स्वाईप केलं आणि 23 हजाराचं बिल भरलं. दोघांनीही आपापल्या गाड्या मॉल च्या समोर पार्क केलेल्या. रस्ता ओलांडून सर्वजण आपापल्या गाड्यांजवळ जाणार होते. विशाखा आपल्या हातात बॅग घेऊन उभी होती अन गाड्या थांबायची वाट बघत होती, तिचा नवरा फोनवर बोलतच इकडे तिकडे बघत होता. सुमती रस्ता ओलांडायला निघाली अन तेवढ्यात हाताला एक उबदार स्पर्श जाणवला.. या रहदारीच्या गर्दीत अचानक कुणीतरी आपल्याला सुरक्षित करतंय असा एक अदृश्य आधार तिला भासू लागला..इतका वेळ सैरभैर होत असलेल्या तिला आता एकदम सुरक्षित वाटू लागलेलं. तिच्या नवऱ्याने तिचा हात गच्च पकडून गाड्यांना हात करत रस्ता ओलांडला.. सुमतीने मागे पाहिलं..विशाखाच्या हातातल्या बॅग्स मध्ये सुख साधनं मिळाली असली तरी ती त्यांना आणि तिला स्वतःला तोलून धरायला कुणीही नव्हतं, तिचा नवरा केव्हाच रस्ता ओलांडून बायको लवकर येत नाही म्हणून वैतागलेला दिसत होता. त्या वेळी दोन दृश्य बघण्यासारखी होती.. एकीकडे पैशाची दुबळी श्रीमंती आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय प्रेमाचं वैभव. 



Leave a Comment