वेळेवर पोहोचण्यासाठी

“मीही माणूस आहे, रोबोट नाही…”

मानसी मुलांवर राग काढत होती.
नोकरी आणि घर दोन्ही सांभाळताना तिच्या नाकी नऊ यायचे, त्यात आज सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावणं आलं आणि त्यात मुलांनी वेगळाच हट्ट धरला.

तिने मुलांना खाऊ पिऊ घालून सासूबाईंकडे सोपवले इतक्यात सासूबाई म्हणाल्या,

“आज फरशी नाही केलीस?”

“तुम्हाला दिसत नाहीये का माझी घाई?”

तिच्या बोलण्यावर तोंड वाकडं करून सासू बडबड करू लागली,

“आमच्या वेळी असं…आमच्या वेळी तसं…”

तिला सासूच्या प्रत्येक बोलण्याला प्रत्युत्तर द्यायचं होतं पण आधीच उशीर झालेला.…. ती रागरागात निघाली..

इतक्यात शेजारच्या बायांचं बोलणं कानावर पडलं..

“काय बाई बायका कामावर जातात, घर नको यांना..फक्त पैसा पाहिजे…”

“तुम्हाला कामं नाहीत का दुसरी? तुम्ही करत नाही मग निदान दुसऱ्याला टोमणा तरी मारू नका..”

त्यांना सरळ करत ती पुढे निघाली, आधीच डोकं फिरलं होतं..

कंपनीत हाताखालच्या लोकांनी गोंधळ करून ठेवलेला, त्यांनाही झापलं…

या चिडचिडेपणामुळे तिच्या एकंदरीत कामावर परिणाम झाला होता, घरात नीट लक्ष नव्हतं ना ऑफिस मध्ये, तिला बोलणाऱ्या प्रत्येकाला ती सरळ करून सोडल्याशिवाय जायची नाही. दुर्लक्ष करणं तिला पटायचंच नाही.

ती तिच्या अयशस्वी जीवनाचं कारण शोधत होती, का नेहमी चिडचिड होते? का ऑफिस मध्ये मी मागे राहते? का मी नवीन काहीतरी करू शकत नाही?

ऑफिस मध्ये एकदा 2 जणी तिच्याबद्दल कुजबुजत होत्या, तिने ऐकलं आणि जोरजोरात भांडण केलं, तिची इतकी चिडचिड झाली की ऑफिस सुटल्यावर घरी न जाता एका बागेत बाकावर बसून राहिली.

मन शांत व्हावं म्हणून तिने पतीला फोन केला, आणि मुलांना घेऊन या बागेत या असं सांगितलं.

“दहा मिनिटात येतो” असं पती ने फोनवर सांगितलं.

अर्धा तास होऊन गेला तरी नवऱ्याचा आणि मुलांचा पत्ता नाही, ती अजून भडकली,

इतक्यात समोरून सगळे येताना दिसले,

मानसी तावातावात जवळ गेली आणि म्हणाली,

“इतका उशीर? केव्हाही वाट पाहतेय मी…”

“अगं हो, रस्त्यात कुत्र्यांचा इतका सुळसुळाट झालाय ना, त्यात हा आपला बंटी, भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसला, त्यांना हाकलून लावत होता…म्हणून उशीर झाला…”

“काय रे बंट्या?? भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसलास तर ठरलेल्या ठिकाणी वेळेवर कसा पोहोचशील??”

मानसी सहजच बोलून गेली,

“काय बोललो आपण हे??”

ती स्थब्ध झाली, तिच्या या बोलण्यातूनच तिला तिचं उत्तर मिळालं होतं…

1 thought on “वेळेवर पोहोचण्यासाठी”

  1. मौनं सर्वार्थ साधनम. हे सगळ माहित असताना सुद्धा प्रत्येकाची चिडचिड होतेच, कारण आपणच एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त महत्व देतो. आणि तिथेच चूक होते मग मात्र वरिल सगळ्या गोष्टी होतात.

    Reply

Leave a Comment