#विवस्त्र
निद्रानाश अन मधुमेहाच्या दुखण्याने पछाडलेले गोपाळराव आज फार चिंतेत दिसत होते. बायको 8 दिवस माहेरी गेलेली, एरवी बायको माहेरी जाणं म्हणजे गोपाळरावांसाठी एक सोहळाच असायचा, पण यावेळी व्हाट्सएप वर आलेल्या एका मेसेजने त्यांच्या डोक्यात खळबळ माजवली होती.
गोपाळराव रोगांवरच्या औषधांना कंटाळले तर होतेच, पण आता त्यांना जीवाची जास्त काळजी वाटत होती. बायको नुसती जवळ असते तरी कसा आधार असतो याची जाणीव त्यांना आज झालेली. त्या मेसेजचा विचार डोक्यातून काही जात नव्हता. त्यात “रात्री विवस्त्र झोपण्याचे फायदे” असं लिहून आलेलं आणि निद्रानाश, मधुमेहींना यावर चांगलाच गुण येतो असं दिलेलं. आता या वयात हे असे गुण उधळायचे म्हणजे..
एकीकडे मन नको म्हणत होतं, पण दुसरीकडे वाटायचं की याने फरक पडला तर? गोळ्यांपासून सुटका तरी होईल, दवापाण्याचा खर्च वाचेल, जास्त वर्ष जगता येईल.फायदे अनेक असले तरी उपाय मात्र अघोरी होता.
दिवसभर विचार करून अखेर गोपाळराव या उपायाला तयार झाले, रात्री स्वतःच्याच खोलीत दबक्या पावलाने आले, दरवाजा लोटून घेतला, पडदे लावून घेतले, लाईट बंद केलं, अंधारातही डोळे गच्च मिटून पटापट सगळे कपडे मोकळे केले अन झटकन आपल्या गादीवर उडी घेत अंगभर चादर ओढून घेतली.
भर थंडीतही कपाळावरचा घाम त्यांनी पुसला, एक मोठं युद्ध जिंकल्याचा भास त्यांना झाला अन चेहऱ्यावर एक हलकं हसू फुटलं.
“किती मोकळं मोकळं वाटतंय आज..या उपायाने माझे आजार बरे होऊ देत रे देवा..”
असं म्हणत गोपाळराव डोळे लावणार तोच त्यांच्या दरवाजाचं दार मुलाने ताडकन उघडलं अन दुसऱ्या क्षणी लाईट चालू केलं..
घाईघाईत गोपाळराव दाराची कडी लावायचाच विसरलेले..
“बाबा..आईचा व्हिडीओ कॉल आहे..धरा..”
गोपाळराव थरथर कापू लागले, काय सांगणार मुलाला? अंगावर एकपण कपडा नाहीये असं? काय म्हणेल तो?? काय काय नको ते विचार त्याच्या मनात येतील? बापाबद्दल काय आदर राहील त्याला? तरी नशीब, हा मिनिटभर आधी आला असता तर….
गोपाळरावांनी अंगावरची चादर अजून वर ओढली तसे त्यांचे पाय उघडे पडले..परत पायांनी चादर खाली खेचत चादरीच्या मधोमध स्वतःला ऍडजस्ट केलं…
“अहो बाबा उठा ना, उठून बसा..आई काय म्हणतेय बघा. “
गोपाळराव हालचाल करायलाही तयार नाही,
“अरेच्या, नेटवर्क गेलं वाटतं.. कट झाला कॉल..”
गोपाळरावांनी हुश्श केलं..दीर्घ श्वास घेतला अन मुलाला म्हणाले..
“अरेरे..झाला का कट..बोलायचं होतं की मला..”
“आता नेटवर्क गेलं त्याला मी काय करणार..थांबा..मी सुनीताचा फोन आणतो, तिच्या सिम ला चांगली रेंज मिळते..”
“नको नको नको..”
“इतके काय ओरडताय??”
“हा..अरे..म्हणजे..उद्या बोलतो तिच्याशी.. आता मला फार झोप येतेय..”
“काय बाबा..आई औषध सांगेन म्हणून टाळताय ना तिला??”
“आता कसं सांगू..”
“का??”
“काही नाही, झोप जा..जाताना लाईट बंद कर. “
“Ok.. good night..”
मुलगा गेल्याची चाहूल लागताच गोपाळरावांनी चादर अंगाभोवती गुंडाळली, पळत पळत दरवाजापाशी जाऊन कडी लावली अन पटकन गादीवर येऊन झोपले.. दोन पडद्याच्या फटीतून आतलं काही दिसत नसेल ना?? रात्री अचानक पडदा पडला तर? झोपेतच मला काही झालं अन सकाळी दरवाजा तोडून सर्वांनी मला अश्या अवस्थेत पाहिलं तर?? नाना प्रकारचे विचार मनात येत होते..निद्रानाशावर उपाय म्हणून विवस्त्र काय झोपले, स्वतःच्या इज्जतीच्या चिंतेने त्यांच्या निद्रेचा असंही नाशच झाला..विचार करत करत रात्रीचे 2 कधी वाजले कळलंच नाही.जरा कुठे डोळा लागायला लागला तोच त्यांना पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला.. त्यांची झोप खाडकन उडाली..छातीची धडधड वाढली. त्यांच्या ग्रील नसलेल्या खिडकीची काच लॉक करायचं गोपाळराव विसरूनच गेलेले. शंका खरी ठरली, चोर खिडकीतून आत शिरलेला.
गोपाळराव तसे धडधाकट, या वयातही एखाद्या माणसाला लोळवू शकत होते, पण आज मात्र ते हतबल होते, ईच्छा असूनही अंगावरची चादर काढू शकत नव्हते. डोळे मिटून झोपायचं नाटक करायचं त्यांनी ठरवलं. कारण आरडाओरडा केला तर चोर जेल खाऊन सुटेलही, पण माझं काय? माझ्या इज्जतीवर पडलेले डाग कधीच पुसले जाणार नाहीत..
चोर आपल्या आवाजाने गोपाळराव उठणार नाही याची काळजी घेत होता, आणि गोपाळराव आपण जागे आहोत हे चोराला कळू नये म्हणून काळजी घेत होते. कारण जर समजा चोरच आपल्याला जागं पाहून घाबरला अन आवाज करत पळायला लागला तरी सगळे उठून खोलीत जमा होतील. देवा, काय करून बसलो मी हे..चोर हळूहळू वस्तू चाचपडत होता, रस्त्यावरच्या लाईटचा प्रकाश खोलीत थोडाफार पसरला होता. वस्तूंना हात लावता येईल इतपत दिसत होतं.
गोपाळराव मनातल्या मनात..
“अरे ए.. ते वरच्या ड्रॉवर मध्ये पाकीट आहे माझं..2000 रुपये आहेत, घे पटकन अन निघ..किती रे वेंधळा तू..समोर वस्तू तरी दिसत नाही याला..”
चोराचा पाय टेबलला लागला अन टेबलवरची फुलदाणी खळकन खाली आपटून फुटली. मोठा आवाज झाला..चोर घाबरला..पण गोपाळराव एकदम तटस्थ.. डोळे बंद..हालचाल नाही..त्यांना लहानपणी शाळेत शिकवलेला सुविचार आठवला..
“माणसाचं चारित्र्य हाच त्यांचा अलंकार..”
आज त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली होती.
“काय माणूस आहे..इतका आवाज येऊनही उठला नाही?? जिवंत आहे की…कुणी याला मारलं तर नसेल ना?? खुनाच्या आरोपात फसलो तर फाशी होईल..किती महागात पडेल ही चोरी..” चोराने विचार केला..
अचानक त्या चोराच्या मनात काय आलं, तो गोपाळरावांजवळ गेला..त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून बघू लागला..चोराचा आवाज नाही म्हणून गोपाळरावांनी हलकेच डोळे उघडून पाहिले तर दहा सेंटीमीटर च्या अंतरावर चोराचा चेहरा..गोपाळराव घाबरले. आता हा आपला खून करतो की काय म्हणून अंगावरची चादर झटकन बाजूला केली अन चोरापासून दूर झाले..
गोपाळरावनां असं बघून चोराने गच्च डोळे मिटून चेहऱ्यावर हात ठेवला. वाट मिळेल तिथे पळू लागला.. खिडकीपाशी येताच चटकन बाहेर उडी मारून पसार झाला..
तो जाताच गोपाळरावांनी पटापट अंगावर कपडे चढवले, खिडक्या बंद केल्या, निद्रानाश तर झालाच होता..पण थोडीफार इज्जत वाचवण्यात यश मिळालेलं.. अन पुन्हा असले अघोरी उपाय करायचा विचारही त्यांनी मनात आणला नाही.
😄😄😄
☺️☺️☺️👍👌
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.info/join?ref=B4EPR6J0
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.info/sv/join?ref=V3MG69RO