लव्हशिप-3

 अश्याच एका चाळीशीच्या माणसाचं स्थळ तिला आलं, तिला पाहायला ते आले, त्याच्याकडे बघूनच तिला शिसारी आली…पण घरच्यांना आपलं वय बघता मुलीला लवकर मार्गी लावायचं होतं..

तो माणूस विकृत नजरेने तिला बघत होता, त्याचा छळामुळे पहिली बायको त्याला सोडून गेली होती, पण पैसा भरपूर होता त्याच्याकडे…

तो म्हणाला,

“मुलगी झक्कास आहे तुमची, लग्न लवकर उरकून टाकू आपण… आणि हो, आज रात्री ये माझ्या घरी…”

आई वडीलांना राग आला, पण हतबल होते..

“नाही म्हणजे, घर पाहायला… अजून बरंच काही दाखवेन..”

आई वडिलांसमोर तो असं अश्लील बोलत होता, वडिलांना राग आला, वाटलं आत्ता हाकलून द्यावं…पण परिस्थिती इतकी भयानक झालेली की त्यांना आठवडा भरात घर सोडावं लागणार होतं, ते रस्त्यावर येणार होते, मुलीला सांगितलं नव्हतं, तो दिवस यायच्या आधी मुलीला छप्पर मिळावं म्हणून ते धडपडत होते,

पण मुलीच्या आईचा संताप अनावर झाला,

“माझी लेक रस्त्यावर पडलेली नाहीये, रात्री अपरात्री बोलवून घ्यायला..”

तो माणूस चिडला, 

“रस्त्यावरच येणार आहे तुमची मुलगी आता, कोण लग्न करेल हिच्याशी? असले भिकारी तुम्ही आणि त्यात हिचे व्रण बघून कुत्रं विचारणार नाही हिला?”

तेवढ्यात दारातून एक आवाज आला,

“मी विचारेन, मी लग्न करेन हिच्यासोबत”

सुटाबुटात असलेला एक मुलगा, सुंदर, श्रीमंत…

आई वडील चक्रावले,

तिने त्याला पाहिलं, ती पळत जाऊन त्याला बिलगली,

तो म्हणाला,

“जिने माझं आयुष्य कलंक लागण्यापासून वाचवलं, जिच्यामुळे प्रेम काय असतं ते कळलं, जिने आयुष्याचा मार्ग दाखवला..जिच्यामुळे आज चांगल्या मार्गाला लागून स्थिरस्थावर झालो त्या लक्ष्मीला आज न्यायला आलोय”

रॉकीच होता तो,

तिने जेव्हा त्याला आयुष्याचं सत्य दाखवलं होतं तिथपासून त्याने स्वतःला बदललं, आयुष्यकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला, डोळ्यासमोर सतत तिचं आयुष्य दिसायचं, लोकं अशी आयुष्य जगताय, प्रेमाचे भुकेले आहेत, ह्रदय दुःखानी भरलेली आहेत आणि आपण? काय करतोय आपण? 

खूप विचार करायचा तो, हळूहळू हे सगळं सोडायचं त्याने ठरवलं, अवघड होतं पण प्रयत्न केला, संगत सोडायची म्हणून बहिणीकडे राहून शिक्षण पूर्ण केलं, जुनी संगत सोडली आणि आयुष्य मार्गी लागलं…तो सतत विचार करायचा, त्या दिवशी ती भेटली नसती तर? आजही रस्त्याच्या कॉर्नरवर एखाद्या भिरकवलेल्या दगडाप्रमाणे धूळ खात पडलो असतो..

“पण हिच्या मानेवरचे डाग..” तिची आई म्हणाली..

“जिने माझ्या आयुष्याला कलंकित होण्यापासून वाचवलं, त्यापुढे हे डाग नगण्य आहेत..” 

आई वडील भरून पावले, देवाचे हात जोडले, तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं…

त्या दिवशी valentines day होता,

तो म्हणाला,

“आज तरी लव्हशिप देशील?”

ती खळखळून हसली आणि शेवटी लव्हशिप देऊनच टाकली…

समाप्त

2 thoughts on “लव्हशिप-3”

Leave a Comment