लग्नानंतरचा काळ

“हे काय सासू, सासरे, नणंद, दिर पुराण लावलंय.. नवीनच लग्न झालंय तुझं, जरा नवऱ्याबद्दल पण सांग की…”
मोहिनी, माझी जवळची मैत्रीण. अरेंज मॅरेज, पण लग्न ठरलं आणि दोघांचं खूप छान जुळलं, एकमेकांना भेटायचे, बोलायचे, भविष्याची स्वप्न रंगवायचे…मोहिनी लाजत सगळं मला सांगत असे, आणि सांगायची पद्धतही तिची अशी होती की आपण एखादा रोमँटिक सिनेमा बघतोय की काय असं वाटू लागायचं, मलाही मजा वाटायची ऐकायला.
तिचं लग्न झालं आणि पहिल्यांदाच ती माहेरी आली. म्हटलं चला आता छान रोमँटिक किस्से ऐकायला मिळतील…
“मग…जिजूंनी गाणं बिणं म्हटलं की नाही… काय गिफ्ट दिलं तुला? कुठे कुठे फिरले सांग ना…”

“नाही गं… म्हणजे बोलतो आम्ही पण…आता जबाबदारी आलीये ना..दिराची परीक्षा आहे, हे म्हटले नंतर जाऊ फिरायला..आणि सासरे पण यात्रेला गेलेत ना..यांना सगळं पहावं लागतं घरी…”
तिचं हे पुराण ऐकून बोर व्हायला लागलं..
“अगं ते कशाला सांगतेस…जीजू कविता करतात ना…कोणती कविता केली इतक्यात ऐकव ना…”
तिच्याकडून समाधानकारक उत्तर मिळतच नव्हतं…
नंतर पुन्हा एकदा ती माहेरी आली, 6 महिन्यांनी. पुन्हा माझं कुतूहल वाढलं, पण यावेळी जरा सुकलेली दिसत होती..चेहरा निस्तेज आणि निराश….
“मोहिनी…काय मग…गेले की नाही फिरायला…”
मोहिनी च्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. या सहा महिन्यात तिच्याकडून केल्या गेलेल्या अवास्तव अपेक्षा, अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून मानसिक छळ, दिवसभर घरातलं करून करून जीव नकोसा झालेली आणि या सगळ्यात नवऱ्याची साथ न मिळालेली ती पार कोसळली होती.

मला विश्वासच बसेना, हाच का तो? ज्याला आपण समजूतदार, रसिक समजत होतो? असा काय अचानक बदलला हा? एकेमकांना साथ द्यायचं वाचन दिलं होतं आणि आता घरच्यांच्या बाजूने मोहिनी विरुध्द लढायला तोच तयार झाला होता.
ही कथा बहुतांश घरात दिसून येईल, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा नवीन लग्न होते, एकमेकांना समजून घ्यायचा, प्रेम फुलवण्याचा आणि प्रेमाचे विविध पैलू उलगडण्याचा काळ असतो नेमक्या त्याच काळात या जोडप्यांना जबाबदारीच्या खोल गर्तेत ढकललं जातं. जबाबदारी हवीच, पण काही वेळ काळ पाहायला नको? लग्न करून आली, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात घुसवली..घरातली माणसं तिच्याकडून आपला काय फायदा आहे, आपली काय सेवा होईल या दृष्टिकोनातून बघतात…पण आपल्या मुलाच्या संसारासाठी दोघांना हा वेळ एकमेकांना देण्यासाठी घरातली इतर मंडळी अथवा नातेवाईक किती तत्पर असतात? लग्नानंतरचा सुरवातीचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो, कारण त्या काळात फुललेलं प्रेम हे पुढील संसाराचा पाया भक्कम करत असतो. पण आपल्याकडे या काळात आशा, अपेक्षा, खच्चीकरण, आरोप, प्रत्यारोप असे उद्योग जर चालत राहिले तर प्रेम फुलणार कसं? योग्य गोष्टी योग्य वेळीच व्हायला हव्या.. धरती पावसाळ्यातच हिरवा शालू नेसते, आंब्यांना विशिष्ट काळीच मोहर येतो, फुलंही विशिष्ट काळीच उमलतात…मग प्रेमही या लग्नानंतरच्या काळातच फुललं पाहिजे..हा काळ जर द्वेषारोपात निघून गेला तर पुढचं आयुष्य कठीण बनतं. आपल्याकडे याबाबत उदासीनता दिसून येते…

लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस, जेव्हा एकमेकाला जास्त समजून घेतांना प्रेमाचा पाया रचला जातो, हे दिवस कधीच कोणाकडून हिरावून घेतले जाऊ नये हीच सदिच्छा…!!!

2 thoughts on “लग्नानंतरचा काळ”

  1. Mulga hatabaher gela tar?? Asaa satat insecurity aste mhnun ase vagtat…pan chuk mulachich tyane donhikde. Balance theveva anyatha lagn karu naye

    Reply

Leave a Comment