“तुमच्याकडे फक्त 6 महिने बाकी आहेत..”
डॉक्टरांनी असं सांगताच काशीच्या पायाखालची जमीन सरकली. वयाच्या 56व्या वर्षी पोटाचा त्रास जो सुरू झाला त्याचे रिपोर्ट्स आज मिळाले अन मरणाची वाट त्यांना दिसू लागली. 6 महिने, फक्त 6 महिने? नातवाला खेळवायचं आहे, पोरीची बोळवण करायचीय, मुलाला मार्गी लावायचं आहे..सहा महिन्यात होईल?
हेकेखोर अन भांडकुडळ काशीचा स्वभाव गेल्या काही मिनिटात अगदी पालटून गेलेला.
काशीचं जीवन तसं साधं सरळ, पण स्वतःच्या हेकेखोर स्वभावाने तिने सगळीच नाती गढूळ बनवलेली. सुनेला त्रास देऊन तिचा रोष ओढवून घेतलेला..मुलाला सतत टोमणे मारून मुलाला मनाने दूर केलं, नवऱ्याला दूषणं लावत त्याचंही आयुष्य तिने नरक केलंच होतं पण नातेवाईकही तिच्या विचित्र स्वभावामुळे लांब गेलेले. तिला वठणीवर आणायची कुणाला सोय नव्हती.. कारण सांगणारा स्वतःच दोषी ठरवून ती मोकळी होई. या सगळ्यांचीच शिक्षा म्हणून आज हा दिवस आला हे तिच्या आता लक्षात आलं. माणसाला उपरती झाल्यावर पाश्चातापालाही वेळ मिळू नये याहून मोठं दुर्दैव ते काय. सकाळीच काशी तावतावात डॉक्टर कडे निघाली होती. मुलाने शंभर वेळा सांगितलेलं, आई तुझं वय झालं आहे, वयाच्या मानाने अशी चिडचिड करत जाऊ नकोस, तुलाच त्रास होईल..डॉक्टर कडे चल.. पण ऐकते ती काशी कसली..त्या दिवशी तिच्या पोटात दुखू लागलं अन कुणाचे उपकार नकोत म्हणून एकटीच दवाखान्यात गेली, एकटीनेच सर्व टेस्ट केल्या अन नंतर रिपोर्ट्स घ्यायलाही एकटीच गेली.
“काही धाड भरली नाहीये मला..डॉक्टर कडे न्यायचं अन काहीतरी डोक्यात घालून हॉस्पिटलच्या वाऱ्या करायच्या, अन मग तुम्ही म्हणायला मोकळे..की आम्ही आईचं आजारपण काढतोय..”
काशीला नक्की कसं वागवावं जेणेकरून ती खुश होईल हा प्रश्न सर्वांनाच पडलेला.
काशी रिपोर्ट्स घेऊन घरी आली, तिच्या मोठ्या मुलाचा वाढदिवस होता अन घरातले सर्वजण मिळून केक कापत होते..काशी स्वतःचे हावभाव लपवत हसून त्यात सामील झाली..एरवी प्रत्येकाच्या वाढदिवसाला काहीतरी कुरापत काढून रुसून बसणारी आज कशीकाय आपल्यात सामील झाली हा प्रश्न सर्वांनाच पडलेला. आपण ही बातमी देऊन वातावरण बिघडवयला नको म्हणून काशी काहीही बोलली नाही. वाढदिवस झाल्यावर सुनबाई किचन मध्ये सगळी भांडी आवरत होती..काशी म्हणाली,
“दमलीस बाई तू..आज मी आवरते स्वयंपाकघर.. जा तू आराम कर..”
हे ऐकून सूनबाईला मोठा धक्का बसला..ती जागीच स्तब्ध झाली.काशीने हात धरून तिला बाहेर काढलं अन आवरायला घेतलं. नंतर ती मुलाजवळ बसली..त्याला म्हणाली,
“आमच्यानंतर तूच या घराला सावरलं..घर केलं, सर्वांची शिक्षणं केली, आमचं केलं..कुणालाही हेवा वाटेल अशी जबाबदारी तू पार पाडलीस…”
मुलाला हा धक्का सहन होईना, तो न राहवून म्हणाला..
“आई आज काय झालंय तुला??”
“उपरती..”
काशीने आज रात्री सर्वांना शांत झोप लागावी म्हणून उद्या सकाळी कॅन्सर चं जाहीर करण्याचं ठरवलं..रात्री नवऱ्याजवळ बसून त्याचे पाय चेपून दिले..त्याच्या डोळ्यात फक्त पाणी आलं, काही बोलायच्या आत त्याला झोप लागली..
दुसऱ्या दिवशी सुनबाई उठायच्या आत काशीने स्वयंपाक करून ठेवला, मुलाच्या आवडीचा शिरा बनवला, नवऱ्यासाठी स्वतः चहा नेऊन दिला.. घरात सर्वजण धक्क्यातून अजून सावरले नव्हते..
पण हा सुखद धक्का होता. सूनबाईने आज काशीला छान गजरा माळून दिला, इतक्या वर्षात त्रास दिला तो विसरून केवळ एक दिवस चांगल्या वागण्याने काशीला सुख मिळत गेलं. मुलगा खूप दिवसांनी कुशीत येऊन पडला..नवऱ्याने कधी नव्हत प्रेमाने हाक दिली..
सर्वजण हॉल मध्ये बसले असता काशीने त्यांना सांगायचं ठरवलं..
“पोरांनो…मी आज तुम्हाला जे सांगणार आहे, त्यानंतर स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही…”
“आई तुझा मोबाईल वाजतोय..”
“आत्ता कुणाचा फोन??”
“घे तरी..”
फोनवर डॉक्टर चा नंबर दिसताच आजी खोलीत गेली..इकडे सर्वजण विचारात पडले, आई काय सांगणार आहे नक्की??
“हो डॉक्टर, आज तपासणीला येणारे मी..”
“अहो फार मोठा घोळ झालाय…”
“कसला??”
“दुसऱ्या एका पेशन्ट चं नाव सारखं असल्याने घाईत डॉक्टरांनी दुसरीचा रिपोर्ट तुम्हाला दाखवला..तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत…तुम्ही अगदी ठणठणीत आहात..”
काशीबाई एकदम गप्प झाली. डोळ्यासमोर सर्व चित्र फिरू लागलं.. इतके दिवस मुलांना त्रास दिला..एक दिवस चांगली काय वागले, घराचं गोकुळ होऊन बसलं…
“हॅलो…हॅलो…काशीबाई..”
“डॉक्टर… ही चूक काही वर्षांपूर्वी झाली असती तर आयुष्य मार्गी लागलं असतं माझं..”
एवढं म्हणत तिने डोळे पुसत फोन ठेऊन दिला..
Veey nice story