राधेच्या हातात बासरी #valentines_special

 “ताई मी येतेय तुमच्याकडे, केक बनवलाय तुम्ही सांगितला तसा..पण वरची डिजाईन काही जमत नाहीये..येऊ का खाली 2 मिनिट??”

शीतल खालच्या मजल्यावर राहणाऱ्या नलूताईला फोन लावत होती, तिने हो बोलताच पटकन अंगावर ओढणी चढवत केक आणि क्रिम घेऊन ती एक जिना खाली उतरली.

“ये..आण इकडे..छान डिजाईन करून देते मी..”

नलूताईने डिजाईन केली तशी शीतल खुश झाली, 

“अगं आज वलेन्टाईन्स डे.. हे घरी येतील तेव्हा त्यांना सरप्राईज देईन म्हणते..”

“अय्या हो आज असतं का ते?”

“काय ताई, तुही करत जा की काहीतरी सेलिब्रेशन..”

“आता लग्नानंतर इतक्या वर्षांनी कसलं आलंय सेलिब्रेशन..तुझं कसं, लग्नाचा वाढदिवस आणि वलेन्टाईन्स डे एकाच दिवशी.. मज्जा करता येते तुला..”

“कसली मज्जा, दोन्ही दिवस एकाच गिफ्ट मध्ये खपवतात हे..उगाच तो मुहूर्त सांगितला असं झालं.”

गप्पा चालू असताना नलूताईचे मिस्टर आले,

“काय हो इतका उशीर? मी जेवायला वाट बघत होते..”

“अगं सतीशचं काम होतं जरा..तिकडे गेलेलो..”

“सतीश पण ना..तुम्हाला घेऊन फिरतो नुसता, त्याला म्हणा स्वतःची कामं स्वतः करायची..”

“अगं तुझा लहान भाऊ आहे तो, कितीही म्हटलं तरी सरकारी कामात मदत लागतेच..बरं ते जाऊदे, उद्या आपल्याला जायचं आहे त्याच्या घरी, जेवायला बोलावलं आहे त्याने..”

“उद्या? नाही जमणार..विसरला काय? उद्या आई बाबा येणारेत..त्यांना खास बेत बनवायचा आहे..खूप दिवसांनी येताय..आई म्हणत होत्या सुनबाई तुझ्या जेवणाची सर कुठेच नाही..”

“अगं त्याने दुपारी बोलावलं आहे..आई बाबा संध्याकाळी येतील..”

“नको तरी..सतीश ला सांगेन मी..आणि हो, मला हजार रुपये द्या तर जरा..बँकेतून काढून आणायला लावले होते मी..”

अहो जीभ चावतात..नलू रागीट हावभाव करत म्हणते..

“विसरलात ना..”

“विसरलो नाही, पण ते सतीश कडे सुट्टे नव्हते मग ..”

“झालं..दानधर्माची फार हौस तुम्हाला..त्याला म्हणा मोबाईल वर पाठव लगेच मला हवे आहेत..”

“इतके अर्जंट कशाला लागताय?”

“साडी घ्यायची आहे नणंद बाईंना..आई पुढच्या आठवड्यात जाणारेत त्यांच्याकडे, मग त्यांच्याच हातात देते..”

“मागच्या वेळी घेतली होतीस की साडी..”

“बाईच्या जातीला कितीही साड्या असल्या तरी कमीच पडतात..ऐका हो माझं..”

“बरं बाई…मी ATM मध्ये जाऊन आणतो..”

मिस्टर बाहेर जातात, शीतल दोघांचं बोलणं ऐकून नलूला म्हणते..

“अजबच आहे बाई तुमचं..जोडपी आपापल्या माणसांसाठी फक्त भांडतात..बाई आपल्या माहेरच्या लोकांसाठी जीव काढते अन नवरा त्याच्या माणसांसाठी..इथे तू सासू सासरे अन नंदेसाठी भांडतेय आणि जीजू तुझ्या भावासाठी.. पहिल्यांदा बघितलं हे..”

“अगं यालाच तर एकमेकांशी एकरूप होणं म्हणतात..आम्ही जोडपं म्हणून वेगवेगळे जीव असलो तरी एकमेकात इतके समरस झालोय की त्यांचं आणि माझं असं वेगळं काही उरलंच नाही. माझा तो भाऊ आणि त्यांचे ते आई वडील..यात तुझं माझं करण्याइतपत वेगळे नाहीच आम्ही..सर्वांना एकाच नजरेतून बघतो…”

शीतलला गलबलून आलं..

“ताई खरं सांगू का..खरा वलेन्टाईन्स तर तुम्ही साजरा करताय, तेही अगदी दररोज.. हे बाकीचं सगळं फक्त दिखावा आहे..जोडप्यांना राधा कृष्णाच्या प्रेमाचं उदाहरण देतात, पण प्रत्यक्षात इतकं निःस्वार्थ प्रेम कुणी करत असेल का? प्रेम म्हणजे एकमेकांशी एकरूप होणं, शरीर वेगळे असले तरी मन एकच, मतं वेगवेगळी असली तरी कृती एकच, नजर वेगवेगळी असली तरी दृष्टी एकच..खरं सांगू ताई? तुम्हाला बोलताना पाहून मला अर्धनारीनटेश्वर ची मूर्ती डोळ्यासमोर आली…एकमेकांशी अगदी एकरूप झालेली..”

नलू हे सगळं ऐकून चक्क लाजली, शीतल निरोप घ्यायला निघताच तिला परत हाक दिली….

“अगं विसरलेच बघ, यावेळी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी..घे, घरी जाऊन उघड..”

शीतल घरी जाते, मिस्टर आल्यावर वलेन्टाईन्स डे साजरा करून झाल्यावर गिफ्ट उघडून बघते, त्यात राधा कृष्णाची छानशी मूर्ती होती.. मिस्टर म्हणाले..

“किती सुंदर आहे ना..पण काहीतरी वेगळं आहे यात..राधेच्या हातात बासरी, ती बासरी वाजवतेय अन कृष्ण कौतुकाने तिच्याकडे बघतोय…स्ट्रेंज ना??”

“स्ट्रेंज नाही…यालाच एकमेकांशी एकरूप होणं म्हणतात..ही दोघे एकमेकात इतकी समरस झालीये की राधा आणि कृष्ण वेगवेगळी राहिलीच नाही…आणि त्याचं जिवंत उदाहरण मी पाहिलं.. खरंच, नलू ताईने अगदी परफेक्ट गिफ्ट दिलंय आपल्याला…”

सुंदर कथामालिका वाचा खालील app वर, आजच download करा

https://play.google.com/store/apps/details?id=neuro.monk.irablogging

1 thought on “राधेच्या हातात बासरी #valentines_special”

Leave a Comment