योग्य वेळ-3

 “बायकोला धाकात ठेवलं म्हणजे घरच्यांची मर्जी जिंकली हा विचारच चुकीचा आहे भाऊ, तुम्ही ते केलंत पण परिणाम काय? लग्नानंतर 20 वर्षांनी घरात वाद घालून बाहेर पडलातच ना?”

“तेच म्हणतोय, आता झालंय ना तिच्या मनासारखं, मग आता तिने आनंदी राहावं..”

“तसं नसतं भाऊ, आमचंही एकत्र कुटुंब होतं.. पण घरचे त्यांच्या जागी आणि बायको तिच्या जागी..”

“अहो आमच्या घरात बायकांनी साडीच नेसावी असा आग्रह, त्यात ही ड्रेस घालायचा हट्ट धरायची, मग वाद व्हायचे आमचे..”

“आमच्याकडे तर डोक्यावरून पदर पडू द्यायचा नाही असा नियम, पण मी स्पष्ट सांगितलं..योग्य ठिकाणी ती ड्रेस घालेल आणि वेळ आली की डोक्यावरून पदरही घेईल..कधी बायको दुखावली गेली कधी घरचे, पण आपला नवरा किमान आपल्या बाजूने आहे याचं तिला समाधान असायचं..आणि आम्हाला जेव्हा लक्षात आलं की भांड्याला भांडं लागतंय, तेव्हा स्फोट होण्याआधीच आम्ही घराबाहेर पडलो, अगदी गोडीने.. वाद होण्यापर्यंत ताणून धरलं नाही..”

“मान्य, माझ्या काही गोष्टी चुकल्या.. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तिने झालं गेलं विसरून जावं..”

“ते इतकं सोपं नसतं भाऊ, जखमा भरल्या गेल्या तरी खुणा तश्याच राहतात. जेव्हा तारुण्य होतं,तिला ड्रेस मध्ये सुंदर वाटत होतं, शरीर आखीव रेखीव होतं तेव्हा तिला तुम्ही मर्यादा आणल्यात, पण आज तुम्ही तिला कितीही ड्रेस आणून दिले तरी तिची ती इच्छा कायमची विरलेली दिसेल.एकत्र कुटुंबात तिला तुमचा सहवास हवा असेल, नवऱ्यासोबत एकांत हवा असेल..तो तुम्ही त्यावेळी दिला नाही..आता तुम्ही 24 तास एकत्र असाल, निवांत असाल पण तारुण्यातली ती ओढ हरपलेली असेल..”

ललित अंतर्मुख झाला…

मोहन म्हणाला,

“ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी झालेल्याच योग्य असतात..वेळ निघून गेली त्यातला रस निघून जातो, आणि नेमकं हेच घडलं लहान बहिणीबाबत…जुन्या कटू आठवणी मनाच्या कप्प्यात अजूनही तिला त्रास देताय, भलेही ती बोलत नसेल, पण तिच्या स्वभावातून त्या गोष्टी नकळतपणे बाहेर येतात..आज तिचा स्वभाव असा का झालाय, आणि माझी बायको समाधानी का दिसतेय याचं उत्तर मिळालंच असेल तुम्हाला..”

उशिरा का होईना,

ललितला उपरती झाली होती,

पण वेळ निघून गेली,

उपरती सुद्धा योग्य वेळी व्हायला हवी,

वेळ निघून गेल्यावर झाली की,

त्या उपरतीला सुद्धा किंमत रहात नाही..

समाप्त

5 thoughts on “योग्य वेळ-3”

  1. खुपच छान…प्रत्येक घरात थोड्याफार फरकाने हेच घडत असत…..

    Reply

Leave a Comment