मुलांसाठी शाळा निवडताय? त्याआधी ही सत्य जाणून घ्या

 मध्यंतरी एक वारं उठलं होतं, एक पोस्ट खूप व्हायरल होत होती की मुलांना खरा खर्च बारावी नंतर येतो, मग शाळेसाठी भरमसाठ फी भरून पैसे वाया का घालवता? ते पैसे शेयर मार्केट मध्ये टाका आणि आरामात आयुष्य जगा. पुढील शिक्षण महागडं करा आणि मुलांसाठी भरपूर सेविंग्स करून ठेवा. खरोखर ते वाचल्यानंतर त्या विचारांमध्ये दूरदृष्टी नव्हे तर पोरकटपणा दिसून आला आणि त्याहूनही जास्त स्वार्थीपणा.

आर्थिक परिस्थिती असतांनाही इतर ठिकाणी पैसे खर्च करणारे पण शाळेच्या बाबतीत कंजूसपणा दाखवणारे बरेच पालक मी पाहिले आहेत.

“मुलगा हुशार असेल तर कुठेही चमकेन, त्यासाठी लाखोंच्या फिज कशाला भरायच्या?”

म्हणजे सर्व जबाबदारी मुलांवर सोपवून हे पालक मोकळे. त्यांच्या मते हुशार मुलांना शाळा कुठली, शाळेची गुणवत्ता कशी, मार्गदर्शन कसं याने काहीही फरक पडत नाही. पण वस्तुस्थिती याहून खूप वेगळी आहे. 

शाळेत असताना सहावी पर्यंत गणित हा माझा नावडता विषय, त्यातले प्रमेय, सूत्र काही केल्या समजेना. मी गणितात ‘ढ’ असा शिक्का स्वतःवरच मारून घेतलेला. पण सातवीला महाजन मॅडम म्हणून नवीन शिक्षिका लाभल्या, त्यांनी गणित इतकं उत्तम प्रकारे घेतलं की त्यानंतर गणितात मी कायम अव्वल येत गेले. मग माझ्यासारख्या ‘ढ’ मुलीने हा चमत्कार केला कसा? सांगायचा मुद्दा असा की कुणीही जन्मजात हुशार किंवा ढ नसतो. त्याला जसं मार्गदर्शन मिळत जातं तशी त्याची बुद्धी खुलत जाते. त्यावेळी जर महाजन मॅडम नसत्या तर आज मी इंजिनियरिंग च्या maths चे क्लासेस घेऊ शकले नसते. 

म्हणूनच मुलांवर संपूर्ण जबाबदारी न टाकता त्याला गुणवत्तापूर्ण शाळेत टाकणं हे पालकांची जबाबदारी. भलेही त्या शाळेची फी जुजबी असो वा महागडी, प्रत्येक पालकाने आपापल्या परिने उत्तम द्यायचा प्रयत्न करायला हवा, उगाच शाळेच्या बाबतीत हलगर्जीपणा करून मुलांचं नुकसान करून घ्यायला नको. 

इंजिनिअरिंग चे क्लासेस घेत असताना माझ्याकडे वेगवेगळ्या शाळेतून शिकून आलेली मुलं क्लासला येत होती. त्यातील काहीजण अगदी स्वस्त्यातल्या शाळेतून 90 टक्के गुण घेऊन आलेले तर काहीजण एका प्रयोगशील शाळेतून 70 टक्के घेऊन उत्तीर्ण झालेले. पण जेव्हा इंजिनीअरिंग maths शिकवायला सुरवात केली तेव्हा या 70 टक्के वाल्या मुलांना जास्त उत्तरं देता यायची.कारण त्यांच्या शाळेत केवळ गुणांवर भर न देता गणितातील सूत्र, प्रमेय या पायाभूत मूल्यांवर भर दिलेला. गणितात हे येणं खूप महत्त्वाचं. Trigonometry चे गणितं सुरू होते, या 70 टक्क्यावाल्या मुलांना धडाधड उत्तरं यायची कारण त्यांच्या शाळेने दूरदृष्टी ठेऊन ही सूत्र तोंडीपाठ करून घेतलेली. याउलट 90 टक्के असलेल्या मुलांना तात्पुरते गुण मिळवण्यासाठी तयारी करून घेतली होती. (x^m)^n आणि x^m×x^n या दोघांतील फरक त्या मुलांना लवकर समजेना. इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शाळेतील आणि 11वी 12वी चे बेसिक माहीत असणार हे गृहीतच धरले जाते. एकदा इंजिनीअरिंग ला गेले की हे पुन्हा कुणीही परत घेत नाही. पण मला मात्र बेसिक पक्कं करणं महत्वाचं वाटायचं, म्हणूनच मी त्यांचे शाळेतील बेसिक गणित पुन्हा घ्यायचे आणि मग पुढचं शिकवायचे. 

मुलांना शाळेत टाकताना गुणवत्तापूर्ण, प्रयोगशील आणि केवळ गुणांना महत्व न देता अभ्यासक्रमाला महत्व देणाऱ्या शाळा निवडा, माझ्या इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्यांकडून एवढा अनुभव तर मी नक्कीच घेतलाय. पाया कच्चा असेल तर पुढची स्वप्न बघण्यात काहीही अर्थ नाही. मग शाळेत कंजूसपणा दाखवायचा आणि ते पैसे भविष्यातील महागड्या शिक्षणासाठी वापरायचे असा पोरकट विचार सोडून द्या, शाळेत जर हलगर्जीपणा झाला तर तो बारावी नंतर पुढे सरकूही शकणार नाही..मग त्याच्या महागड्या शिक्षणासाठी तर सोडाच , त्याला हुशार बनवण्यासाठी कितीही पैसा ओतलात तरी ते निष्फळ ठरेल. 

1 thought on “मुलांसाठी शाळा निवडताय? त्याआधी ही सत्य जाणून घ्या”

Leave a Comment