सुईण आत गेली अन इकडे दादारावांची धडधड वाढली, मुलीचं दुसरं बाळंतपण होतं. रात्रीपासून रमा कळा काढत होती, आईने धीर देत कळ काढायला लावली, दादासाहेब बाहेर येरझारा घालत स्वतःशीच बोलत होते..
“सुखरूप होऊ दे रे देवा…आजकाल शहरातून काय काय ऐकायला येतं.. आधीसारखं कुठे राहिलं आता..माझी लेक अन नातू सुखरूप ठेव..”
रमेची लगबगीने आई बाहेर पाणी घ्यायला बाहेर आली, दादासाहेबांनी विचारलं..
“कशी आहे रमा? केव्हा होईल मोकळी??”
“होईल लवकरच, थोडी कळ काढावी लागेल..धीर धरवत नाही वाटतं नातवाला भेटायला..”
“आजी..पण मला बहीण झाली तर?”
रमेची मुलगी शकू विचारू लागली….
“ए बाई..नको नाट लावू..मुलगाच होईल बघ तू..”
एवढं म्हणत ती लगबगीने आत गेली अन कवाड लावून घेतलं.
रमेचा ओरडा, गयावया करणं दादासाहेबांना ऐकू येत होतं आणि ते अजून कासावीस होत होते. तेवढ्यात त्यांचा गडी रामू धावत आला..
“दादासाहेब..मळ्यात चला..लवकर..”
“अरे इथे पोर मोकळी होत नाहीये, परिस्थिती काय..असं सोडून कसं येऊ??”
“दादासाहेब तुम्ही आला नाहीत तर गणू अन शामु जीव घेतील एकमेकांचा..”
“परत जुंपली का दोघांत??”
“होय दादा..आता तर कुऱ्हाडी हातात घेऊन आलेत ते..”
आवाज ऐकून रमेची आई धावतच आली.
“अहो जावा तुम्ही, इथे मी हाये…नातवापायी स्वतःची पोरं गमावून बसाल..जा..”
जड मनाने दादासाहेब लगबगीने मळ्यात जायला निघाले.
रामू अन शामु, दादासाहेबांचे दोन्ही मुलं. दोघेही शिकले तर नाहीच, शेतीतही मन रमलं नाही. घराबद्दल, आई बापाबद्दल त्यांना काहीही पडलेली नव्हती. उलट लग्न झाल्यावर दोघांनी वाटा मागून आपापला संसार मळ्यात थाटला. त्यातही जमिनीवरून, पिकवरून दोघांत कायम वाद चालायचे. ज्या वयात आई बापाला सांभाळायचं त्या वयात बापालाच मुलांना सांभाळावं लागे. कितीदा त्यांच्या भांडणात पडून दादासाहेबांनी प्रकरण मिटवलं होतं..”
“रामू तू घरला जा..गडी माणूस पाहिजे तिथे..इतलं मी बघतो..”
रामू घरी गेला. दादासाहेब पोचले तेव्हा अक्षरशः हाणामारी सुरू होती. दादासाहेबांनी गणुला पकडलं अन बाजूला केलं..शामु ला दम दिला..गणू शिवीगाळ करायला लागला तर त्यालाही गप केलं..शब्दाला शब्द लागतच होता, कुणीही माघार घेत नव्हतं..
“अरे तिकडं तुमची बहीण जिवाच्या आकांताने कळ काढतेय अन इथे तुमचं हे सुरू..जरा तरी बहिणीबद्दल काही वाटू द्या..”
“आम्हाला ते काय सांगू नको..जमीन दिली तर उपकार केले का..विहीर स्वतःकडच ठेवली..आता पाणी कुठून आणायचं आम्ही..”
दोघेही बापावरच उलटत होते.
तिकडे सुईनीच्या लक्षात आलं, प्रकरण गुंतागुंतीचं आहे ते..तिने रामुला पाठवून डॉक्टरला आणायला लावलं तसा रामुने बैलगाडी काढत दवाखाना गाठला. डॉक्टर तडक घरी आले..
“रक्त कमी झालं आहे, तातडीने रक्ताची बाटली लागेल..”
“अरे देवा..आता कुठून आणायची..”
“नाहीतर तुमच्यात कुणाचा रक्तगट A positive असेल तर चटकन दान करा..”
“रक्तगट? काय असतं ते?”
“माझा आहे डॉक्टर.. घ्या पटकन माझं रक्त..”
आपली बॅग खाली ठेवत आक्काने चटकन दंड पुढे केला..
आक्का म्हणजे रमेची धाकटी बहीण, सासरच्या लोकांना न जुमानता धिटाईने माहेरी आलेली. मोठ्या तालुक्यात राहत असल्याने तिला बऱ्यापैकी ज्ञान होतं. तिने आपलं रक्त दिलं.. डॉक्टरने मोठ्या प्रयत्नांनी रमेला अन बाळाला वाचवलं, रमा मोकळी झाली..सुईणीने बाकीचं आवरलं..डॉक्टरने काही गोळ्या लिहून दिल्या, रामुने डॉक्टरच्या हातात पैसे टेकवले अन त्याला सोडून आला.
दादासाहेब घरी आले, डोक्यातून रक्ताची धार वाहत होती..त्यांचं सगळं लक्ष घराकडे.. रमेची आई बाहेर बोटं मोडत बसलेली..आक्का रमेची काळजी घेत आतच होती.
“रमा कुठाय..”
“अहो, हे डोक्याला काय झालं??” तिने पटकन डोक्यावर हळद चोळली, कपडा बांधला..
“रमा कुठाय..”
“आहे आत..”
“अगं काय झालं नीट सांग तरी..झाली की ती मोकळी??”
“हो झाली..इतक्या कळा काढल्या, अन झालं काय.. पुन्हा मुलगी..आल्या आल्या संकट आणलं आईवर, रक्त कमी पडलं.. बरी आक्का आली वेळेवर अन तिनं रक्त दिलं..”
“अरेवा…दुसऱ्यांदा लक्ष्मी आली म्हणायची..”
“या तिच्या पहिल्या लेकीनेच नाट लावली, पाठीवर भाऊ जन्माला घालायचं सोडून परत पोरच आणली..”
“रमे…थोबाड बंद कर आता..दोन पोरींच्या पाठीशी तुझ्या हट्टापायी गणू अन शामुला जन्म दिला..काय ऋण फेडलं त्यांनी? आज रमेच्या मदतीला तिची बहीण, आक्का धावून आली..अन तुझी पोरं? पैशापायी भांडत बसली..बहिणीची काळजी तर नाहीच, वर माझ्या डोक्याला ही रक्ताची धार लागलीय ना, हे त्यांचेच प्रताप…अगं दोन पोरींवर थांबलो असतो तर आज जमीनही वाचली असती अन तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरची जखम पण..”
रमेची आई तोंडाला पदर लावते.. शकू जवळ येते..
“आजी तू नको ना रडू, मी बाळाला सांभाळीन..तिला गंध पावडर करीन, अंघोळ घालून देईन..तू नको रडू..”
तिने शकुला जवळ घेतलं, तिचे पटापट मुके घेतले..डोक्यावरून हात फिरवला..
“नाही रडणार पोरी, आता कधीच नाही रडणार. लोकांना अभिमानाने सांगेन, पोरीच्या पाठीशी पोर जन्माला आली..जशी रमेच्या पाठी आक्का धावून आली..राम्या.. जा तालुक्याला जाऊन मलई बर्फी आण चांगली किलोभर..” नाकातली सोन्याची मुरनी रामुच्या हातात ठेवत रमेच्या आईने फर्मान काढलं. .
©संजना इंगळे
****
वाचकांनो, ईरा वरच्या वेगवेगळ्या उपक्रमात आपले लेखक तसेच बाल कलाकार बक्षिसं मिळवतच असतात, आता वाचकांनाही या उपक्रमात सामील करून घेण्याची संधी ईरा देत आहे. आम्ही घोषित करत आहोत वाचकांसाठी एका नव्या पुरस्काराची घोषणा,
“प्रगल्भ वाचक पुरस्कार”
लिखाणाला जसे प्रोत्साहन दिले जाते तितकेच वाचनालाही दिले जावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही घोषित करत आहोत “प्रगल्भ वाचक पुरस्कार”
कशी असेल ही स्पर्धा?
या स्पर्धेसाठी तुम्हाला ईरा दिवाळी अंकावर आधारित उपक्रम करायचे आहेत ते खालीलप्रमाणे
1. दिवाळी अंकातील कुठलीही एक रेसिपी बनवून त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे.
2. दिवाळी अंकातील आपल्याला आवडलेल्या कथांबद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत.
3. दिवाळी अंकातील कुठलीही एक कविता म्हणून अथवा गाऊन आम्हाला ऑडिओ स्वरूपात पाठवायची आहे.
4. दिवाळी अंकातील कुठलाही एक लेख सुंदर हस्ताक्षरात लिहून आम्हाला फोटो पाठवायचा आहे.
वरील चारही उपक्रम पूर्ण करून त्याचे फोटो आणि ऑडिओ आम्हाला खालील नंबरच्या whatsapp वर पाठवावे.
8087201815
विजेत्यांना प्रगल्भ वाचक पुरस्कार म्हणून ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घरपोच देण्यात येईल. आहे ना interesting? चला तर मग, कामाला लागा..आणि हो, दिवाळी अंक मागवला नसेल तर आजच मागवून घ्या खालील फॉर्म भरून, अथवा वर दिलेल्या नंबर वर संपर्क करून..
खूप छान विषय
खूप छान
KHUUUPCH CHAAN
Very nice
छान लेखन शैली , समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी , मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.