मिस परफेक्ट (भाग 9 अंतिम)

आयुष्य साधं सरळ आणि सोपं असतं हे माधवी चं तत्व होतं. कुठल्याही गोष्टींचं टेन्शन न घेता त्यावर सरळ मार्ग काढून मोकळं व्हायचं…शुभरा म्हणजेच तिच्या नंदेच लग्न होऊन 2 वर्ष होऊन गेलेली असतात. ती बाहेरगावी राहत असते.

एक दिवशी हे सर्वजण तिच्या घरी जाण्याचं निश्चित करतात. शुभरा ला तसं फोनवर आधी कळवायला दुर्गा बाईंनी फोन हातात घेतला…

“शुभरा..बाळ बरी आहेस ना? ऐक की..आम्ही येतोय बरं का..उद्या. “

“उद्या?”

“हो..आहात ना घरी?”

“हो…”

शुभरा ला ते ऐकून आनंद व्हायला हवा पण ती जरा चिंतेत वाटली..

“काय गं?काही अडचण नाही ना?”

“नाही नाही. या तुम्ही, स्टॉप वर आल्यावर फोन करा…मी घ्यायला येईन..”

असं म्हणून ती फोन ठेवते.
दुसऱ्या दिवशी दुर्गा बाई, माधवी अन तुषार त्या शहराच्या स्टॉप वर पोचतात आणि शुभराला फोन करतात..

शुभरा फोन उचलत नाही, खुप वेळ होऊनही ती फोन उचलत नाही हे पाहून दुर्गाबाई काळजीत पडतात..

“आई, कामात असेल नाहीतर झोपली असेल दुपारची..आपण एक काम करू, रिक्षा पकडून जाऊया तिच्या घरी..”

सर्वजण रिक्षा करून तिच्या घरी पोचतात…तिच्या दाराबाहेर येईन बेल वाजवणार इतक्यात आतून आवाज येतो…

“कुणाशी बोलत होतीस फोनवर? तुझा फोन आता मी जप्त केलाय…यापुढे कुणालाही फोन करायचा नाही..”

“अहो ऐकून तर घ्या, मला स्टॉप वर जायचंय आईला घ्यायला…”

“काहीही कारणं काढून बाहेर जायचं म्हणते…लाज वाटत नाही का तुला?”

दुर्गाबाई ते ऐकून गार पडतात.. लेकीला हे सगळं ऐकावं लागतंय आणि आपल्याला खबरही नाही?

दुर्गाबाई तावातावाने आत शिरतात, त्यांना पाहून शुभरा..

“आई?”

“काय हो जावई बापू? माझी मुलगी काय अशी तशी वाटली का तुम्हाला? कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? तिने फोन सुद्धा वापरू नये? इतका संशय?”

जावई शुभरा कडे एकदा बघतो, ती खरं बोलत असते…तो खजील होऊन आत निघून जातो…
इकडे शुभरा आईच्या गळ्यात पडून रडते..
“पोरी, इतकं सगळं सहन करत होतीस आणि मला सांगितलं ही नाहीस?”
“काय सांगू मी आई, तू तिकडे काळजी करत बसली असती…”
“कधीपासून चालू आहे हे सगळं?”
“लग्न झालं तेव्हापासून..”
“शुभरा. मी तुझी मैत्रीण.. आणि वहिनी…मला तर सांगू शकली असतीस..”
“तुमचा संसार सुखाचा चालू होता…माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता मला..”

माधवी तडक शुभरा च्या नवऱ्याच्या खोलीत जाते…दुर्गाबाई म्हणतात,

“माधवी अगं कुठे चाललीस?”

माधवी कसलाही विचार न करता सुशांत च्या खोलीत जाते..

“जरा बाहेर येता का?”

सुशांत घाबरतो…हळूच बाहेर येतो, माधवी बोलायला सुरुवात करते..

“तर…तुम्हाला शुभरा वर संशय आहे ना? की ती बाहेर कोणाशी बोलते, भेटते…बरोबर?”

सुशांत गप असतो…

“खरं म्हणजे तुमचं बरोबर आहे…तिचं बाहेर चालू आहे..”

“माधवी काय बोलतेय?”
“वहिनी??”

“मला बोलू द्या…तर…शुभराची 2 लग्न झाली आहेत..एक फॅमिली पुण्याला असते…तिचा दुसरा नवरा तिच्या 2 मुलांना सांभाळतो..”

सुशांत जवळजवळ उडतोच…

“काय? कसं शक्य आहे? कधी झालं हे?”

“तुमचं लग्न झालं तेव्हाच…”

“कसं शक्य आहे? शुभरा दिवसभर घरी असायची, आणि तुम्ही म्हणताय फॅमिली…ह्ये…काहीही..”

“अहो हो…तुम्हाला चकवून ती बरोबर तिकडे जायची..”

“शक्यच नाही..शुभरा तशी नाही, आणि असलं काही करायचा विचारही करू शकत नाही ती…मी ओळखतो तिला…तिच्याइतकी सुशील मुलगी नाही..माझा विश्वास आहे तिच्यावर…”

हे ऐकून शुभरा चाट पडते…पहिल्यांदा सुशांत तिच्याबद्दल इतका विश्वास दाखवत होता.

“आहे ना विश्वास? स्वतःच्या तोंडून हे सगळं बोललात… मग कशाला उगाच असली थेरं करताय?”

सुशांत ला आपली चूक कळते, माधवी पुन्हा त्याला म्हणते..

“हे सगळं तुम्ही का करताय माहितीये? तुमचं शुभरा वर खूप जास्त प्रेम आहे, आणि तिला गमवायची भीती तुम्हाला त्रास देते….म्हणून हे सगळं..”

शुभरा ला सुद्धा सुशांत च्या या वागण्याचं पहिल्यांदा कौतुक वाटतं.

अश्या प्रकारे काही मिनिटात माधवी शुभरा ची अडचण दूर करते…

माधवी च्या अश्या जगण्याने कित्येकांना मार्ग सापडला होता..तिच्या सरळ आणि साध्या पद्धतीने मार्ग काढण्याच्या आणि कसलंही टेन्शन न घेता, कसलाही नियम न पाळता आयुष्य बिनधास्त जगण्याने ती “मिस परफेक्ट” म्हणून ओळखू जाऊ लागली…

काही वर्षांनी…

अनुष्का दुर्गाबाईजवळ खेळत असते…खेळता खेळता तिची खेळणी पाण्याच्या जग मध्ये पडते…पाणी अर्ध भरलेलं असतं..

“आजी..माझी खेळणी..”

“काय गं तू…कुठेही टाकून देतेस खेळणी…थांब काढून देते..”

दुर्गाबाई हात घालून काढणार इतक्यात..

“ए आजी..हात नको घालू, पाणी खराब होईल..”

“मग खेळणी कशी काढणार?”

अनुष्का पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि जग मध्ये ओतते… पाणी वर येतं आणि खेळणी वर तरंगते..

“काय आजी तुपण… इतकं सोपं तर होतं…”

दुर्गाबाई कौतुकाने तिच्याकडे पाहतात…

“अगदी हिच्या आईवर गेलीये…”

समाप्त

bindhast girl, daughter in law india, funny lady, must read marathi story,

2 thoughts on “मिस परफेक्ट (भाग 9 अंतिम)”

Leave a Comment