मिस परफेक्ट (भाग 3)

 “I love you…एवढंच सांगायचं होतं तुला??”

“हे एवढंच आहे?”

“नाहीतर काय, आपली पसंती झाली… लग्न झालं…मग I love you ची काय गरज? ते सिनेमात असतं फक्त..अन समज आत्ता नकार दिला तुला…तर????..”

“बरं बाई…सॉरी…”

“काही थ्रिलच नाही…”

“कसलं?”

“मला वाटलं होतं काहीतरी थ्रिलिंग होईल लाईफ मध्ये…तू मला आत्ता सांगशील, की तुझं already लग्न झालंय…तुला 2 मुलं आहेत…किंवा तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे वगैरे… पण झालं काय? I love you…छ्या…”

“अरे देवा… आता दुसरी बायको अन दोन मुलं कुठून आणू मी?”

“आता जाऊदे…आधीच करायला हवं होतं..”

“तू फारच विचित्र विचार करतेस असं नाही वाटत तुला?”

“नाही…आयुष्य खूप सोपं आणि सरळ आहे…आपण त्याला किचकट बनवतो…आजवर आयुष्य इतक्या सहजतेने हाताळलं की डोक्याला ताप करून घेणं मला माहीतच नाही…म्हणून म्हटलं जरा काहीतरी थ्रील्लिंग हवं…”

“ठीक आहे…मी करतो सोय आता दुसऱ्या बायको अन मुलांची..”

“जशी तुझी मर्जी…पण मला मात्र पूर्ण विश्वास आहे..”

“माझ्यावर??”

“नाही..इतर स्त्रियांवर… तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाही कुणी…”

तुषार आणि माधवी मध्ये गमतीदार चर्चा होते…

एकमेकांना ते खऱ्या अर्थाने समजून घेतात..एकमेकांना स्वीकारतात….

ते एका हॉटेल वर थांबलेले असतात, तिथे काउंटर वर एका जोडप्याचं आणि हॉटेल च्या मालकाचं भांडण चालू असतं. हे दोघे त्यांच्या जवळ जातात…

“काय झालं?”

“अहो काय सांगू, प्रवासात माझं पाकीट कुणीतरी मारलं..पैसे आणि atm कार्ड त्यातच होतं. आता हॉटेल चे अर्धे पैसे भरायचे बाकी आहेत…यांना म्हटलं मी की करतो काहीतरी सोय, पण म्हणताय की आत्ताच्या आत्ता द्या…”

“हो, मला आत्ताच्या आत्ता हवेत…तुम्ही कोण कुठले…कसं शोधू मी तुम्हाला नंतर?”

“एक मिनिट, किती बिल झालंय?”

“4000”

माधवी त्या जोडप्यातील स्त्री च्या गळ्यातील सोन्याची चेन काढते, अन त्या मालकाला देते…

“ही चेन आहे 6000 ची…उरलेले 2000 परत द्या..”

“अहो ताई ती यांनी मला गिफ्ट केली आहे..”

“तुला सोन्याची चैन हवीय की नवऱ्याचा आत्मसन्मान??”

ती स्त्री खजील होते…

मालक उरलेले 2000 जोडप्याचा हातात देतो..

“आता ही कॅश असू द्या जवळ…पुढे लागतील तुम्हाला…आणि हो, आयुष्य खूप सोपं आहे, सरळ आहे…त्याचा सरळ सरळच विचार करायचा…नको त्या गोष्टींना थारा देऊन त्याला किचकट बनवू नका..”

असा मोलाचा सल्ला माधवी त्यांना देते..

“बोला…माधवी जी की…जय…”

तुषार असं म्हणतो अन सर्वजण हसायला लागतात…गंभीर वातावरण निवळून एकदम हलकं फ़ुलकं वातावरण तयार होतं.

महाबळेश्वर ला 6 दिवस फिरून दोघेही घरी परततात.. आता खरी कसोटी सुरू होते.

दुर्गा बाई माधवी ला सांगत असतात, 

“हे बघ…माझा स्वभाव फार कडक आहे…मला खूप शिस्त लागते घरात. शाळेत शिक्षिका आहे ना, त्यामुळे स्वभावच बनलाय तसा…आता तुझ्यावर जबाबदारी असणार आहे…सकाळी लवकर उठावं लागेल…उठशील ना?”

“सवय नाही..पण करेन मी सवय..त्यात काय इतकं?”

“आणि हो…स्वयंपाक शिक…सध्या मला मदत कर फक्त…”

“चालेल..”

“चल आज खजुराची चटणी बनवायची आहे…हे घे खजूर आणि बिया काढून मला आणून दे..”

“Okk…”

माधवी ते घेऊन हॉल मध्ये जाते, बऱ्याच वेळाने दुर्गा बाईंकडे येते..

“इतका वेळ? आण बघू…”

माधवी खजुराच्या बिया पुढे करते..

“खजूर कुठेय?”

“खजूर कशाला लागताय? तुम्ही बिया मागितल्या होत्या ना? खजूर मी खाऊन टाकले..”

दुर्गा बाई कपाळावर हात मारून घेतात..

“अगं बाई शब्दशः अर्थ घ्यायचा असतो का..”

“जे सांगितलं ते केलं..बरं जाऊद्या, यावर चर्चा करून उपयोग नाही…सोल्युशन काय आहे ते सांगा..”

“एकच सोल्युशन, तू तासभर बाहेर थांब…मी आजचा स्वयंपाक आटोपते..”

“ठीक आहे…”

इकडे दुर्गा बाई बडबड सुरू करतात…

“आईने शिकवायला हवं होतं मुलीला…इतकाही वेंधळेपणा चांगला नाही…”

माधवी च्या कानावर ते पडतं… काय करायला हवं तिने? भांडायला हवं होतं? उलट उत्तर द्यायला हवं होतं की गपचुप ऐकून घ्यायला हवं होतं?

माधवी आईला फोन लावते…

“आई तू मला काही शिकवलं का नाहीस??”

दुर्गा बाई घाबरत बाहेर येतात…माधवी कडून फोन हिसकावून बोलतात…

“काही नाही ताई…गम्मत…” असं म्हणत फोन ठेऊन देतात..

“अगं ए…आमच्यात भांडण लावतेस का आता..”

“तुम्हाला म्हणालात ना, आईने शिकवायला हवं होतं… मग मी तेच आईला विचारलं, की शिकवलं का नाहीस?? सिम्पल…”

1 thought on “मिस परफेक्ट (भाग 3)”

Leave a Comment