मिशन इंडिया (भाग 2) ©संजना इंगळे

मेघना चा अहंकार एका क्षणात गाळून सारिका तिच्या जागेवर जाऊन बसली, पत्रकार नीरज ने हीच संधी साधली आणि तो तिच्या जवळ गेला…

“नमस्कार मॅडम, मी…”

“नीरज…पत्रकार नीरज…right??”

नीरज अवाक होऊन पाहतच राहिला…

“माफ करा पण मी मुलाखत देऊ शकत नाही….”

“मॅडम प्लिज, फक्त पाच मिनिटं…”

“Sorry..”

“मॅडम तुमची यशोगाथा ऐकून कित्येक तरुणांना प्रेरणा मिळेल…कित्येक तरुण उभे राहतील…”

“भारतात हीच तर उणीव आहे, डोळ्यासमोर कुणीतरी आदर्श ठेवल्याशिवाय कुणी पुढे सरकतच नाही…अरे कशाला हवाय आयडॉल यांना? एक unique व्यक्तिमत्त्व म्हणून तरुणांना घडायला काय अडचण येते? कुणीतरी एखादं चांगलं काम करावं, आणि यांनी वाट पाहावी….मग त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायचा..मग त्यांनी जे जे केलं ते अगदी घोकंपट्टी करून अनुकूल नसताना तसंच करत जायचं..अरे काय चाललंय? प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो, प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात…तुम्हाला तरुणांना प्रेरणा द्यायची आहे ना? मग लिहा एक लेख, आणि सांगा की आदर्श शोधत बसण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ घालावा…”

सारिका मॅडम शब्दन शब्द खरं बोलत होत्या…त्यांची देशातील तरुणाईबद्दल तळमळ साफ दिसत होती…काहीतरी वेगळं होतं त्यांच्यात…नीरज तसाच माघारी फिरला…

दुसऱ्या दिवशी नीरज च्या ऑफिस मध्ये…

“झालं…पहिलंच काम म्हसणात घालवलं…म्हटलं होतं ना मी? तुम्हाला काहीएक जमणार नाहीये…”

“सॉरी सर पण मी खूप प्रयत्न केला…”

“बरं… आता एक कागद पेन घ्या, आणि मी जे सांगतो ते लिहा…”

नीरज पटकन कागद पेन घेतो आणि सर काय सांगतात त्याकडे लक्ष देतो..

“मी…नीरज श्रीवास्तव… आजपासून प्रभात दैनिकाच्या पत्रकारितेचा राजीनामा देत आहे..”.

“सर???”

“काय?? का म्हणून आम्ही फुकट कामावर ठेवायचं तुम्हाला??”

“सर एक लास्ट चान्स…”

“सारिका मॅडम चा interview आणाल??”

“हो सर….”

नीरज कडे आता हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता…

नीरज पुन्हा निराश होऊन सारिका च्या ऑफिस मध्ये फोन करतो आणि आपला अपमान होणार याची तयारी ठेऊन विचारतो…

“सारिका मॅडम आहेत का?”

“रिसेप्शन ला सारिका मॅडम असतील असं वाटलं तुम्हाला?”

“नाही…म्हणजे, त्यांच्याशी बोलता येईल का?”

“Appoitment घेतली तरी नाही भेटता येणार…”

“खूप महत्त्वाचं आहे हो…”

“आज तर शक्यच नाही, मॅडम ब्लु हिल वर गेल्या आहेत सिक्रेट मिटिंग साठी..”

नीरज ला त्या रिसेप्शनिस्ट च्या मुर्खपणावर हसू आलं…सिक्रेट मिटिंग असून असं जगजाहीर केलं तिने..

नीरज ला एवढी तर माहिती मिळालेली की मॅडम कुठे असतील ते….

नीरज तडक ब्लू हिल वर जातो…ब्लु हिल म्हणजे एक शांत आणि निर्मनुष्य जागा..मॅडम ची तिथे कसली मिटिंग असेल याचा निरज ला प्रश्न पडला….

त्या ठिकाणी गेल्यानंतर नीरज बराच वेळ सारिका ला शोधतो, पण त्या कुठेही सापडत नाही…अखेर एका ठिकाणी तो चहा प्यायला थांबतो..तिथे चहा पीत असताना त्याला एक फोन येतो…

“मला माहित होतं तुम्ही माझा पाठपुरावा करणार, म्हणून माझ्या रिसेप्शनिस्ट ला मी खोटं सांगितलं…”

“सारिका मॅडम?”

“होय…ब्लु हिल ही जागा अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे…तिथे थोडं फिरून या…म्हणजे डोक्यातून बाकीचे विचार निघून जातील…”

“मॅडम प्लिज, माझ्या नोकरीचा सवाल आहे….”

“राजीनामा अर्धवट लिहून आलाय, आता पूर्ण लिहून या..”

“ही सारिका नामक स्त्री काय चीज आहे नक्की? हिला माझ्यासारख्या साधारण पत्रकारा बद्दल इतकं कसं माहीत? कुठून खबरी मिळतात हिला?” नीरज मनातल्या मनात विचार करतो…

“हॅलो…मिस्टर नीरज??”

“येस मॅम….ऐकतोय…मॅडम एकदा भेटा प्लिज…”

“घरी परत जा…तुमच्या घराबाहेर आहे मी…”

नीरज तडक घरी जातो, दार उघडतो, सारिका मॅम ला फोन करून कळवतो…सारिका घरात येते…घरातल्या सर्व वस्तू न्याहाळते…रिकामं शोकेस पाहून म्हणते…

“एक जबाबदार पत्रकार दिसताय…”

“चेष्टा करताय का मॅडम, शोकेस रिकामं तर आहे, कुठलाच पुरस्कार नाही…”

“म्हणूनच म्हटलं, जबाबदार दिसताय…सणसणीत बातमी पेक्षा सामाजिक भान जास्त ठेवता तुम्ही..”

मॅडम ने एवढ्याश्या गोष्टीवरून आपला स्वभाव कसकाय अगदी तंतोतंत ओळखला याचं नीरज ला विशेष वाटतं…
सारिकाच्या प्रत्येक वाक्यातून इतकी तेजस्विता जाणवत होती की आता नीरज ला दडपण आलेलं…

“ठिके तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे तर तुम्हाला माझी मुलाखत देते…”

नीरजच्या मनावरचं ओझं एकदम हलकं झालं…

“मी एका छोट्याश्या खेडेगावातून आलेली एक मुलगी, शाळेत अभ्यासात हुशार…आमच्या गुरुजींनी आम्हाला योग्य दिशा दिली….घरात गरिबी पाचवीला पुजलेली…”

“मग या व्यवसायात आगमन कसं झालं?”

“गावातील सावकार आमची जमीन बळकावू पाहत होता…मी लढले आणि जमीन विकू दिली नाही…तो एका मोठ्या बिल्डर ला जमीन विकू पाहत होता…मग मला समजलं, की जमीन जर डेव्हलप केली तर त्यातच खरा पैसा आहे…गुरुजींनी सांगितलं, की जमीन डेव्हलप करायची असेल तर शास्त्रशुद्ध शिक्षण घे….”

इतक्यात सारिका ला एक फोन आला आणि ती उठून बाहेर गेली…

“येस मास्टरजी…”

एवढेच शब्द नीरज च्या कानी पडले, त्या फोन नंतर सारिका तडक तिथून निघाली…
नीरज ला फारच तोकडी माहिती मिळाली होती, पण तेवढी नोकरी वाचवण्यासाठी पुरेशी होती…

ऑफिस मध्ये ते त्याने सादर केले आणि तात्पुरती त्याची नोकरी वाचली…

“मिस्टर नीरज…पुढच्या मुलाखती..”

नंतर काही मुलाखती त्याने घेतल्या, त्या अगदी सहज त्याला मिळाल्या…सारिका मॅडम इतका त्रास त्याला इतर मुलाखतींना झाला नाही…पण पुन्हा तेच सगळं वाट्याला आलं जेव्हा राशीद ची मुलाखत घेण्याची वेळ आली….

****टीव्ही वर बातमी****

“राशीद ने नेमबाजी मे फिरसे सारे रेकॉर्डस् तोड दिये… आशियाई स्पर्धा मे फिरसे गोल्ड मेडल…”

राशीद एक देशस्तरीय नेमबाज…त्याच्याशी संपर्क करणं महाकठीण… जास्तीत जास्त काळ तो अज्ञातवासात असायचा…आणि बरोबर स्पर्धेच्या वेळी तो उगवायचा…

क्रमशः

मिशन इंडिया (भाग 3) ©संजना इंगळे

2 thoughts on “मिशन इंडिया (भाग 2) ©संजना इंगळे”

Leave a Comment