माहेरपण

 कावेरी आज खूप दिवसांनी माहेरी आली होती. लग्न झाल्यापासून जवळपास एक वर्षांनंतर. सासर अगदी दूर होतं. 3 दिवस लागायचे पोहोचायला. यावेळी चांगलं महिनाभर राहायचं म्हणून ती परवानगी काढून आली होती.

पूर्ण प्रवासात तिच्या मनात आनंदाच्या लहरी उसळत होत्या. लग्नानंतर नव्याची नवलाई संपून जबाबदारी अंगावर पडली होती. कोवळ्या मुलीचं रूपांतर अचानक जबाबदार स्त्री मध्ये झालं होतं. पण तिच्यातली ती अल्लड मुलगी आज पुन्हा जागी झालेली.

घरी परतायचा रस्तासुद्धा तिला माहेरासमान वाटत होता, जणू माहेरवाशिणीचे स्वागत तो करतोय. रस्त्याने दिसणारी झाडं, घरं, इमारती…तब्बल एक वर्षांनी पुन्हा दिसत होतं. सगळं अगदी तसच होतं..

अखेर आपल्या वाड्यापाशी ती पोचली अन आई, बाबा, आजी, काकू सर्वांनी तिला घेराव घातला. एकाने हातातली पिशवी घेतली, एकाने पाणी दिलं..हे पाहून तिला भरून आलं…सासरी असा मान तिला अजूनतरी मिळाला नव्हता.

सुरवातीचे 8 दिवस मजेत गेले, शेजारी येऊन भेटून गेले..नातेवाईक भेटायला आले..भरपूर कोडकौतुक झालं..सकाळी ती फुलं वेचायला अंगणात यायची तेव्हा शेजारची माणसं काहीना काही गप्पा जरूर मारत.

नवव्या दिवशी तिला पुन्हा अंगणात पाहून शेजारच्यांची नजर जरा शंकीत दिसू लागली..नातेवाईक पण आता विचारू लागले..

“कावेरीचं बरं चाललंय ना??”

“सासरी सर्व ठीक आहे ना??”

“कावेरी सासरी कधी जाणार??”

कावेरीला वाटे सासरी जाणारच आहे, पण इथे जरा जास्त दिवस राहिले तर सहन का होत नाही लोकांना??

शेजारची काकू एकदा घरी आली,

“कावेरी, इतके दिवस माहेरी राहणं चांगलं नाही..”

कावेरीच्या मस्तकात एकच कळ गेली, माहेरपणाची जी स्वप्न ती घेऊन आलेली त्यांना आता नजर लागू लागली..नातेवाईक, शेजारी, मित्र मंडळी कावेरी च्या आई वडिलांना भंडावून सोडू लागले..

“इतके दिवस माहेरी का??”

17 दिवस झाले कावेरीला येऊन.…अठराव्या दिवशी कावेरीला घरच्यांच्या चेऱ्यावरचा ताण दिसू लागला.. त्यांच्या वागण्यात बदल झालेला..विसाव्या दिवशी कावेरीची आई हळूच म्हणते..

“बाळा, तिकडे तुझ्या सासरी तू नसताना सर्वांचे हाल होत असतील ना?”

“नाही गं.. असं काही नाही..”

“आणि तुझे बाबा म्हणत होते की ते परवा स्टेशन वर जाणार आहे..तुझं काही प्लॅंनिंग झालं लवकर तर..”

कावेरीला सगळं समजत होतं… संध्याकाळी ती घरात जाहीर करते, की मी उद्या माझ्या घरी परतणार आहे..

हे ऐकताच घरच्यांमध्ये एकच उल्हास…आई शेजारी जाते…कढीपत्ता आणायला..

“अहो कढीपत्ता घेते हो..कावेरी जातेय उद्या..”

“मी काय म्हणतो, लग्नाला आपण लवकर निघुया..कावेरी जातेय उद्या..”

घरातला जो तो बाहेर कळवत होता..कावेरी उद्या जातेय…मनात दुःख भरपूर होतं, पण तिला थांबवायची हिम्मत कुणात नव्हती..समाजाच्या शब्दप्रहारांनी आपल्याच मुलीवर प्रेमवर्षाव करायला ते कचरत होते..अखेर समाजापुढे वैयक्तिक नातं हरलं..
कावेरी निघाली, जाताना ते रस्ते, ती झाडं तिला नको नकोशी झालेली..

सासरी तिच्या घरासमोर उभी राहिली..आणि घराकडे मनभरून एकदा पाहिलं..

“हेच माझं घर, जिथे कितीही दिवस राहिलं तरी कुणाला हरकत नसेल.कितीही अन्याय का होईना…..कुणाला म्हणजे..या समाजालाच..”

2 thoughts on “माहेरपण”

Leave a Comment