मस्ती की पाठशाला – (भाग 8)

  

आणि अशा प्रकारे विद्यार्थी विद्या चं टेन्शन दूर करतात. विद्या ला तर भणक ही नसते…जेव्हा तिला समजतं तेव्हा तिला खूप बरं वाटतं, विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी इतकं करावं? तिला कौतुक वाटलं..पण विद्यार्थ्यांनी जे काही केलं ते एक शिक्षक म्हणून तिला आवडलं नाही. त्यांचा मार्ग वेगळा होता, त्यावरून तिने विद्यार्थ्यांना रागवायचं ठरवलं..

दुसऱ्या दिवशी वर्गात..

विद्या मुद्दाम रागीट चेहरा करून वर्गात येते..

“हे काय ऐकतेय मी? काय प्रकार केलात तुम्ही?”

“मॅम…आम्ही काही नाही केलं..”

“गप बस…कोण कोण होतं या प्लॅन मध्ये, उभं रहा..”

एकेक जण करत पूर्ण वर्ग उभा राहतो..

विद्या ला प्रश्न पडतो, कुणाकुणाला रागवावं..
विद्या छडी घेऊन येते..आता एकेकाला छडी बसणार होती..

विद्या काही बोलणार इतक्यात आकाश ने जण गण मन म्हणायला सुरवात केली…इतरांनीही त्याला साथ दिली..

भलत्या वेळी राष्ट्रगीत सुरू झालं म्हणून वर्गाबाहेर येऊन काही मुलं तोंड वासून पाहत स्तब्ध उभी राहिली…
विद्या ला सुद्धा राष्ट्रगीत सुरू केल्याने शांत बसावं लागलं..राष्ट्रगीत संपलं आणि बेल वाजली, मुलं लगेच बाहेर पडली.

मुलं गेली, अन त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विद्या कौतुकाने बघत होती. हीच तिची खरी कमाई होती.

वर्गात विद्या चं सर्वांकडे लक्ष असायचं, वर्गातलाच एक विद्यार्थी, सोहम..सोहम चं अबोल असणं विद्या च्या नजरेतून सुटलं नाही. एक दोनदा वर्गातल्या मुलांनी सोहम ची टिंगल उडवताना विद्याने पाहिलं होतं..त्यामुळेच कदाचित सोहम एकटा पडला होता. कुणाशीच बोलत नसे आणि कुणात सामायिक होत नसे.

एकदा विद्या वर्गात शिकवत असताना तिचं सोहम कडे लक्ष गेलं, सोहम चं शिकवण्याकडे लक्ष नसतं. विद्या त्याच्याजवळ जाते तरीही त्याचा लक्षात येत नाही…

“सोहम..लक्ष कुठेय?”

सोहम दचकून उभा राहतो आणि मान खाली घालतो. विद्या चं लक्ष त्याच्या बेंच कडे जातं, त्यावर कर्कटक ने एक सुरेख चित्र त्याने काढलं होतं. तो त्यात तल्लीन झाला होता.

“तुझ्या घरी फोन लाव..”

“सॉरी मॅडम..पुन्हा असं करणार नाही..”

“पटकन..सांगितलं तेवढं कर..”

सोहम घरी फोन लावून मॅम कडे देतो, विद्या फोन घेऊन बाहेर घेऊन जाते.

इकडे सोहम काळजीत पडतो. थोड्या वेळात मॅम ओरत येतात, त्याचा मोबाईल परत देऊन पुन्हा शिकवायला सुरवात करतात.

सोहम अभ्यासात मागे होता, पण एक उत्तम चित्रकार होता. त्याच्या या कलेची कदर करणारं मात्र कुणीही नव्हतं.

पुढच्या आठवड्यात वर्गातली सर्व मुलं सोहम कडे जातात..

“तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे .”

“माझ्यासाठी??”

“हो. “

शंतनू सोहम चे डोळे बंद करून कॉलेज च्या सेमिनार हॉल मध्ये नेतो. सोहम डोळे उघडतो तर काय, त्याने काढलेल्या सर्व चित्रांचं त्या हॉल मध्ये प्रदर्शन मांडलं होतं. बरीच गर्दी जमा झालेली, शिक्षक आणि विद्यार्थी एकेक चित्र पाहून कौतुक करत होते. सोहम येताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याचं तोंडभरून कौतुक केलं. सोहम ला असा सन्मान आजवर कधीही मिळाला नव्हता..त्याला भरून आलं. त्याच्यातला न्यूनगंड निघून गेला. मीही कुणीतरी खास आहे याची जाणीव त्याला झाली.

“हे सगळं कुणी केलं??”

“अरे त्या दिवशी विद्या मॅम ने तुझ्या घरी फोन केला अन त्यांना समजलं की तू घरी उत्तम अशी चित्र काढली आहेत… त्यांनी ती सर्व मागवून घेतली अन कॉलेज ची परवानगी घेऊन ते इथे मांडले…”

हे ऐकताच सोहम विद्या मॅम कडे जातो, डोळे पाणावलेले असतात…मॅम ला पाहताच तो त्यांच्या पायाला स्पर्श करतो.

क्रमशः

1 thought on “मस्ती की पाठशाला – (भाग 8)”

Leave a Comment