मस्ती की पाठशाला – भाग 5

 

आकाश आणि क्रांती कॉलेज सुटल्यावर विद्या मॅडम ला भेटतात..दोघेही घाबरलेली असतात, मॅडम काय करतील? आपल्याला बोलतील का? की आपल्या घरी सांगतील? दोघेही दबक्या पावलांनी कँटीन मध्ये विद्या ला भेटले…

“या या..बसा इथे..”

दोघेही विद्या समोर बसतात..

“मग…आकाश…तुला क्रांती आवडते?”

“अं??”

या अनपेक्षित प्रश्नाने दोघे गोंधळून जातात..

“क्रांती, तुला आकाश आवडतो? हे बघा लाजू नका…वर्गात तुम्हाला एकमेकांशी खाणाखुणा करताना अनेकवेळा पाहिलंय मी..”

“हो…” आकाश लाजून उत्तर देतो..

“मग प्रपोज केलं का तिला?”

“अजून नाही..”

“बरं.. क्रांती तुला आवडतो का आकाश?”

क्रांती होकारार्थी मान हलवून लाजते…

“झालं तर मग…बघा, तुम्ही पुढची 3 वर्ष हीच गोष्ट लांबवत बसला असता…गोष्टी कश्या झटपट निस्तरल्या पाहिजे…आणि जर क्रांती ने नाही म्हटलं असतं तर??”

“मग…वेळच्या वेळी समजलं तेच बरं झालं…नाही म्हटली असती तर मला खूप मनस्ताप झाला असता…”

विद्या हसते, चला तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीकडे नेते…

“आत्ता?”

“हो..घरी फोन करून सांगून द्या..”

जास्त प्रश्न न विचारता दोघेही विद्या मागोमाग जातात…विद्या एका घरासमोर गाडी थांबवते..दोघेही गाडी लावून विद्या च्या जवळ जाऊन घराबाहेर उभे राहतात. आतून भांडणाचा मोठमोठ्याने आवाज येत असतो..


“दरवेळी घरभाडे उसन्या पैशांनी नाही भरणार मी…कमवायची अक्कल नाही मग लग्न कशाला केलं?”

“जास्त बडबड करू नकोस…आहे तेवढ्यात भागव..नाहीतर माहेरून आन पैसे… माझ्याकडून काही अपेक्षा ठेऊ नकोस..आधीच मला खूप व्याप आहे..”

“व्याप म्हणे…तुमची कमाई तरी किती? नुसतं प्रेमाने पोट भरत नाही म्हटलं…उद्या आपल्याला मूल झालं तर कसं पोसाल त्याला?”

आकाश आणि क्रांती ते भांडण ऐकतात..

“घरात भांडण चालू आहे मॅडम..”

“हो…दोघेही नवरा बायको आहेत..आणि विशेष म्हणजे दोघांनीही तुमच्या वयात असताना प्रेम केलं आणि काही वर्षांनी लग्न केलं…”

“यांचं लव मॅरेज असून हे असं भांडताय?”

“बघ ना..खरं तर ही दोघे कॉलेज मध्ये असताना एकमेकांवर इतकी प्रेम करायची की एकमेकांशिवाय यांचं पान हलत नसे…पण यांनी या सगळ्यात शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं…त्यामुळे चांगली नोकरी मिळाली नाही…शिक्षणाचा काळ यांनी हिंडण्या फिरण्यात घालवला.. आणि त्याचे परिणाम…पाहताय तुम्ही…”

आकाश आणि क्रांती चे डोळे खाडकन उघडले.. त्यांना जे समजायचं ते समजलं..आणि यापुढे शिक्षणाचा महत्वाचा काळ त्यांनी वाया न घालवायचं ठरवलं…

वर्गात विद्या ने एक दिवस सरप्राईज टेस्ट ठेवली, त्यात मुलांना जास्त काही उत्तरं लिहिता आली नाही..तेव्हा तिला समजलं की math मध्ये फॉर्म्युला पाठ करायला ही मुलं आळशीपणा करताय…math मध्ये फॉर्म्युला हे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र…ते पाठ असले की math अगदी सोपं बनतं .

दुसऱ्या दिवशी..

“सर्वांनी वहि चा एक कागद फाडा, त्यावर प्रत्येकाने ट्रीगोनोमेट्री चा एक फॉर्म्युला लिहा आणि तुमच्या बेंच वर तो चिटकवा…”

मुलांनी विद्या ने सांगितल्याप्रमाणे केलं…प्रत्येकाच्या बेंच वर एक फॉर्म्युला होता, असे 60 फॉर्मुले बेंच वर लिहिले गेले..

“आता रोज सर्वांनी आपली जागा रोटेट करायची….अशाने प्रत्येकाला प्रत्येक बेंच वर बसायला मिळेल..आणि तो पूर्ण दिवस त्या बेंचवर जो फॉर्म्युला लिहिला आहे तो पाठ करायचा…”

मुलांना एक फॉर्म्युला पाठ करायला एक पूर्ण दिवस मिळाला…त्यामुळे पाठ करणं अगदी सोपं गेलं..दिवसातून कित्येकदा डेस्क वर लक्ष जायचं आणि नकळत तो फॉर्म्युला आपोआप तोंडपाठ होऊ लागला…

विद्या च्या अश्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीने शिक्षण मिळत होतं… आणि त्यांना ते आवडू लागलेलं… math ज्यांना किचकट वाटायचा तेही आता math मध्ये रुची घेऊ लागले होते…

वर्गात असताना विद्या ला अचानक एक फोन आला…ती बाहेर गेली…परत वर्गात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठी निराशा दिसत होती… मॅडम चे बदललेले हावभाव मुलांच्याही लक्षात आलेले..

“मॅडमना काय झालं??”

“मॅम काहीतरी अडचणीत आहेत…”

“आपल्याला काहीतरी केलं पाहिजे…”

“हो…आपण करू काहीतरी… पण नक्की काय झालं कसं कळणार??”


त्या दिवशी वर्ग संपल्यानंतर मुलांची चर्चा होते…सर्वजण एक प्लॅन करतात..मॅम कुठल्या काळजीत आहेत हे शोधून काढण्याचा…

क्रमशः

Leave a Comment