“मनोरमा.. मी आलोय परत..”
“खूप उशीर केलास…परत जा..”
“का? असं का म्हणतेय?”
मनोरमा पदराच्या आड लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढते…देवेंद्र दोन पावलं मागे सरकतो..
“नाही…हे शक्य नाही…हे शक्यच नाही..”
“कुठे होतास तू इतके दिवस? मला म्हणाला होतास की कॅनडा वरून लवकरच येईल अन तुला मागणी घालेन…पण तुझा फोन लागला नाही, मेल केले, मेसेजेस केले, फेसबुकवर संपर्क करायचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ…मी समजले काय समजायचं ते..”
“काय समजलीस तू..”
“हेच की तू मला फसवतोय..”
“मनोरमा…मी गेले 3 महिने काय दिव्यातून गेलोय तुला माहीत नाही…मी कॅनडा ला अडकून पडलो होतो, आमच्या एका मित्राच्या बॅग मध्ये अमली पदार्थ सापडले होते, माझा काहीएक संबंध नसताना मी lockup मध्ये होतो…माझा फोन जप्त झालेला..कुणाला सम्पर्क करायची संधी नव्हती, तिथून आत्ता सुटलो आणि तडक इथे आलो..”
मनोरमा आपल्या नशिबाला कोसत बसते….
“कदाचित आपलं एकत्र येणं नियतीला मान्य नव्हतं..”
“मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मनोरमे… तू चल, माझ्यासोबत आपण पळून चल..आपण दूर जाऊ…प्लिज…मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत..”
“देवेंद्र… काहीही बोलू नकोस, माझं लग्न झालंय आता, सासरी मान आहे आमच्या कुटुंबाला…आणि मी त्यांची इभ्रत अशी चव्हाट्यावर आणू?? नाही..”
मनोरमा तेवढं बोलून निघून जाते..जाताना तिचं मन जड झालेलं असतं..3 महिने फक्त, आणि नशीबच सगळं पलटून गेलं होतं…
मनोरमा घरी जाते…घरी गेल्या गेल्या आजेसासु तिला हाक मारतात..
“मनोरमे, जरा पाणी दे गं..”
ती त्यांना पाणी देते, मग घरातल्या कामांना सुरवात करते..कामांची सवय नसल्याने सासूबाईंचं खूप ऐकावं लागत होतं.. तीच काय करेल, शिकायला ती शहरात होती. आई वडील गावाकडे राहत, त्यांनी जवळच्याच एका गावातील श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी मनोरमेचं लग्न ठरवून टाकलं…मनोरमेने विरोध केला, पण कारण काहीही सांगता येईना, कारण देवेंद्र फोन उचलत नव्हता…अखेर परिस्थिती पुढे हात टेकत तिने लग्न केलं..
देवेंद्र सोबत लग्न करून कॅनडा ला जाणार असं सरळ गणित होतं तिचं.. पण आता कॅनडा नाही तर तडक खेडेगावात तिची रवानगी झाली…दिवसभर साडी नेसून, घरातली कामं करून ती थकून जाई.. तिचा नवरा पांडुरंग मात्र तिला फुलासारखं जपे… पण त्याच्यासमोर अजूनही मनोरमा व्यक्त झाली नव्हती… घरात 2 मोठे आणि एक लहान दिर… मोठया दोन्ही दिरांची लग्न झालेली….त्यांच्या बायका आणि मनोरमा यांत काही मैत्री होईना..कारण त्या खेड्यात वाढलेल्या, आणि मनोरमा शहरात शिक्षण घेतलेली बोल्ड मुलगी…त्यांच्याशी चर्चा करायला विषयही समान नसायचे.. त्यामुळे मनोरमा तटस्थ राही..
एके दिवशी मोठी जाऊ तिला बोलवायला आली..
“मनोरमा, चल शेतात जायचं आहे..”
“का??”
“शेतात काम आहे..”
मनोरमेला शेतातील काम करायला बोलवण्यात आलं, दोन्ही जावा पदर खोचून शेतातील तण जमा करत होत्या…मनोरमा धास्तावली…
“बाबा तर म्हणाले होते की हे बागायतदार शेतकरी… सगळ्या कामांना माणसं आहेत इथे…आणि मी हे काम करू??”
“मनोरमे, कर की सुरू..”
सासरे ओरडले…दिर हसायला लागले…
मनोरमा आवंढा गिळत काम करायला लागली…सगळे घरी आले तेव्हा मनोरमा पार गळून गेली होती…ती खोलीत पडणार इतक्यात आवाज आला..
“मनोरमे, आज पोळ्या तू कर बाई..”
मनोरमा आता रडायला लागली…कुठे फसलो आपण… तिने ठरवलं….देवेंद्र ला फोन करायचा आणि पळून जायचं त्याच्यासोबत…. इथून आपली सुटका करायची….
ती देवेंद्र ला फोन लावते…
“देवेंद्र… उद्या संध्याकाळी त्याच मंदिरात भेटायला ये..”
देवेंद्र ला आनंद होतो…
दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गावातील मोठी राजकीय हस्ती त्याच्या कार्यकर्त्यांसोबत आलेली असते..मनोरमे च्या सासरच्यांचं पंचक्रोशीत नाव असतं, त्यांना भेटल्याशिवाय कुणी पूढे जात नसे..
मनोरमा त्यांना पाणी घेऊन जाते…दोन्ही जावा चहा नेऊन देतात…मग नाश्त्याला बनवलेले पोहे घेऊन मनोरमा जात असते… बोलता बोलता एक कार्यकर्ता त्याच्या हातातला झेंडा खाली वाटेतच ठेवतो..त्याची काठी मनोरमे च्या पायात येते आणि ती धाडकन पडते. हातातले पोहे खोलीभर उधळले जातात, काही त्या पाहुण्यांचा कपड्यांवर पडतात..
“ए पोरी, आंधळी आहेस का….रावसाहेब ही काय सून केलीत तुम्ही, धड हातात वस्तू पकडता येत नाही हिला..”
तिचे सासरे शांत असतात…आवाज ऐकून दिर, सासूबाईं, जावा आणि पांडुरंग बाहेर येतात…
“काय झालं?”
“तुमच्या या सुनेने सगळे पोहे आमच्या अंगावर सांडले…4000 चे कपडे आहेत हे, हिचा बाप भरून देणार का ते..”
मनोरमाने तर केव्हाच रडायला सुरवात केलेली..दुसऱ्या मिनिटाला कानाखाली फटकन असा आवाज आला अन सगळे बघायला लागले…
“हिचा बाप नाही तुझाच बाप घेईल कपडे, आणि तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वहिनीला असं बोलायची…लक्ष्मी आहे ती या घरची..”
“सूनबाईला बोलायच्या आधी तुझ्या तोंडात किडे कसे नाही पडले…अरे अशी सोन्यासारखी मुलगी आमची शान आहे..”
“आमच्या देरानी म्हणजे हिरा आहेत हिरा, एवढ्या शिकून सवरून आलेल्या असताना शेतात काम करायला लाज वाटली नाही त्यांना कधी, अन तुम्ही तिला बोलताय?? निघा इथून..”
“माझी बायको या घरची इज्जत आहे…आणि या इज्जतीचा धक्का लागलेला आम्हाला चालणार नाही…”
रावसाहेबांनी खिशातून 10000 रुपये काढून त्यांच्या अंगावर फेकले,
“हे घ्या, कपडे धुवून घ्या नाहीतर नवे घ्या…निघा..”
पाहुणे लालबुंद होऊन निघून गेले…
मनोरमा हे सगळं पाहून अवाक झाली…माझ्यासारख्या साधारण मुलीसाठी इतक्या मोठ्या राजकीय नेत्याचा अपमान??? म्हणजे माझी जागा इतकी मोठी आहे?? माझा मान इतका आहे??
संध्याकाळी मंदिरात देवेंद्र हजर झाला..
“मला माहित होतं, तू माझ्याशिवाय नाही जगू शकत…सांग कधी जायचं आपण..”
“नाही देवेंद्र… मी तुला हे सांगायला आली आहे की आता तेच माझं घर आहे, तेच माझं कुटुंब आहे…वडिलांनी जी श्रीमंती पाहून मला तिथे दिलं ती आज मला दिसली…मला माफ कर, ज्या दिरांना, जावांना, सासऱ्यांना, सासूला माझ्या मानापुढे दुसरं काहीही मोठं वाटत नाही त्यांचा मी अवमान करू?? मी त्यांची इज्जत आहे, त्यांची पवित्रता आहे….मला माफ कर…मी नाही येऊ शकत..”
खरेच अप्रतिम कथा
Nice