भिंती नको…माणसं हवी

 “सुधीर..सुनबाई इतका हट्ट करतेय तर कर की काहीतरी खटाटोप..”

“आता तुपण हो तिच्या बाजूने..”

“अरे बाईच्या जातीला असते हौस, तुम्ही माणसं 10-10 तास बाहेर असता…बाईचं विश्व म्हणजे हे घरच असतं..24 तास तिथंच राबत असते, मग ते घर छान असावं, मोठं असावं असं तिला वाटलं तर काय चूक?”

“बरं… बघतो..”

मनात आकडेमोड करत सुधीर निघून गेला…अलका गेल्या 2 वर्षांपासून मागे लागली होती, नवीन घर घेऊ म्हणून…त्यांचं राहतं घर स्वतःचंच होतं, पण खोल्या लहान होत्या.. बांधकाम जुनं होतं… बराच खटाटोप करून सुधीरने हे रो हाऊस विकत घेतलं होतं..

अलका च्या नातेवाईकांचं घरी येणं जाणं असायचं..त्यांच्यासमोर एवढ्याश्या जागेत वावरणं जणू अपमान वाटत होता. तिच्या मैत्रिणी, बहिणींची मोठी घरं होती… काहींचे प्रशस्त बंगले तर काहींचे अगदी पॉश फ्लॅट… तिच्या मनात नव्या घराची कुणकुण कधीची सुरू होती… पण काल भिशी च्या बायका आल्या अन हॉल मध्ये जागा राहिली नव्हती, त्यातच एकजण म्हणाली,

“आमच्या फ्लॅट वर जमू हो पुढच्या वेळी…इथे जरा अडचण होते..”

अलकाला ते चांगलंच झोंबलं… सुधीरशी अबोला धरला, नवीन घर पाहत नाही तोवर बोलणार नाही असा हट्टच केला…

सुधीर ने अखेर मनावर घेतलं, आणि घरं शोधायला सुरवात केली…सासूबाई म्हणाल्या..

“सुधीरने घेतलंय हो मनावर…नवीन घर बघतोय तो, आता तुझ्या मनासारखं होईल सुनबाई..”

“नाहीतर काय, लग्न करून आले अन कसलेच लाड नाही माझे…राबतेच आहे रात्रंदिवस..”

“तुझे कष्ट दिसतात गं सुनबाई…आता तुझ्या त्या मैत्रिणीसारखा मोठा फ्लॅट घेऊन टाकू.”

“इतके पैसे कुठून आणणार देव जाणे..”

“तुझ्या मैत्रिणीने केलाच की…होऊन जातं हळूहळू.”

“तिच्या सासू सासऱ्यांनी जमीन ठेवली होती हो राखून त्यांच्यासाठी… तीच विकून रोख रक्कमेत घर केलं त्यांनी..”

अलकाचा टोमणा सासूबाईंच्या लक्षात आला, त्यांनी डोळे हळूच टिपले आणि तिथून निघून गेल्या… अलकालाही आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला, पण काय करणार, नाही म्हटलं तरी तो राग होताच तिच्या मनात…

“अलका, आज संध्याकाळी एजंट येणार आहे, आपल्याला घर दाखवायला नेणार आहे…लवकर आवरून ठेव..”

अलका खुश झाली, आता आपलं नवीन घर होणार या दिमाखातच ती तयार झाली…एखाद्याचा राज्याभिषेक होणार असताना आधी त्याची जी मनस्थिती असते तसंच काहीसं अलका चं झालेलं…

संध्याकाळी एजंट ने त्यांना काही घरं दाखवायला सुरवात केली..

“हा एक 3 bhk फ्लॅट, नवीन आहे…किंमत जास्त आहे पण पैसा वसूल सुविधा आहेत..”

चकचकीत फारश्या, आधुनिक किचन आणि प्रशस्त खोल्या पाहून अलका भारावून गेली…

“इथे कुणी राहत नव्हतं का?”

“एक कुटुंब होतं…त्या माणसाला आजार होता…हृदयाच्या धक्क्याने तो इथेच गेला…त्याच्या बायकोला या घरातल्या आठवणी त्रास द्यायच्या, तिलाही झटके येऊ लागले…मग त्यांनी विकायचा ठरवला..फ्लॅट विकून ती आता हॉस्पिटलमध्येच भरती होणार आहे”

अलकाला वाईटही वाटलं आणि आश्चर्यही..इतक्या आलिशान फ्लॅट वर तिने पाणी सोडलं म्हणून…

नंतर एजंट ने एक बंगला दाखवला..तो बघताच अलकाने पक्कं केलं…हाच घ्यायचा. एखाद्या चित्रपटात दाखवतात तसा प्रशस्त हॉल, डायनिंग टेबल पासून सर्व फर्निचर.. मोठ्या खिडक्या, आजूबाजूला ऐसपैस जागा…विशेष म्हणजे इतका मोठा बंगला अगदी वाजवी किमतीत…कुतूहल म्हणून अलकाने विचारलं..

“या बंगल्याचा मालक कोण?”

“एक मुलगा आहे, बंगलोर ला राहतो..”

“त्याचे आई वडील?”

“त्याची आई लहानपणीच गेली…आणि वडील याच बंगल्यात जिन्यात पडले आणि जागीच गेले…तेव्हापासून हा बंगला पडून आहे..”

“अलका…बघ हा, या घरात असं झालं आहे..”

“मी नाही घाबरत हो…”

काही दिवसांनी सासरे आजारी पडले, त्यांच्या दवापाण्याला बराच खर्च येणार होता…त्या काळात बंगला विकत घेण्याचं काम रखडलं आणि अलकानेही हट्ट केला नाही..

एक दिवस सासऱ्यांनीच विषय काढला आणि बंगला पहायला मला घेऊन चला असं म्हटलं…बंगल्याचा मालक तो मुलगाही तिथे आला होता…

सासरे बंगला पाहायला आत आले, त्या बंगल्याच्या शेजारी असलेल्या जागेवर एक बिल्डिंग उभी होती….त्यांनी डोळे पुसले आणि ते आत गेले…त्या मालकाला पाहिलं आणि ते म्हणाले..

“सूरज…तू??”

“काका?? किती दिवसांनी..”

दोघांनी एकमेकांना मिठ्या मारल्या…

“तुम्ही ओळखता एकमेकांना??”

“हो…हे माझ्या आजोबांचे मित्र…”

दोघांच्या ओळखी निघाल्या…घरी गेल्यावर अलकाने सासूबाईंना सांगितलं…सासूबाई शांत झाल्या..

“काय झालं आई”

“काही नाही…जुने दिवस आठवले…या सूरज चे आजोबा आणि तुझे सासरे सोबतच नोकरीला…पक्के मित्र होते.. त्यांनी बक्कळ पैसा कमवून घरं गाड्या केल्या…तुझ्या सासऱ्यांनीही बऱ्यापैकी कमवून ठेवलेलं…त्यांनीही त्यांच्याच बंगल्या शेजारी जागा घेतली अन त्यावर आलिशान घर बांधायचं ठरवलं होतं…पण…”

“पण??”

“तुझे आजे सासरे…त्यांना अर्धांगवायूचा झटका आला…अन सगळे पैसे त्यांच्या दवाखान्यात गेले…अगदी जमीनही विकली..सगळा पैसा गेला…पण त्यांच्या मित्राने मात्र भरपूर प्रगती केली…भरपूर प्रॉपर्टी केली…पण, त्यांना बायकोचा सहवास फार कमी मिळाला …आणि तेही बिचारे…”

अलकाच्या डोळ्यापुढे फिरू लागलं… पहिला फ्लॅट पाहिलेला त्यात त्या बाईला नवऱ्याचा सहवास नाही, या बंगल्यात त्या मुलाला आई वडिलांचा सहवास नाही…अमाप पैसा असूनही माणसांच्या कमीमुळे दोन्ही घरं अगदी भिकेला लागली होती..तिने विचार केला…

“इतका पैसा अडका, गाड्या घोड्या असूनही काय अवस्था आहे या माणसांची? आपली माणसंच जवळ नसतील तर काय उपयोग आहे या सर्वाचा? सासऱ्यांनी याच श्रीमंतीला लाथ मारून आपल्या माणसाचा औषधोपचार केला..श्रीमंती नसली तरी माणसं जपली त्यांनी…”

संध्याकाळी सासऱ्यांना दवाखान्यात नेण्यासाठी सुधीरने रिक्षा आणली…

“कशाला रिकामा खर्च करतो रे…गेलो असतो चालत..”

सासरे चिडले, दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर ने बऱ्याच टेस्ट आणि काही शस्त्रक्रिया सांगितल्या…

सासऱ्यांनी सरळ सांगितलं..

“मी कसलेही उपचार करणार नाही, आणि नका माझ्यावर पैसा घालवू…”

अलका रागातच समोर आली…

“उपचार करणार नाही काय…उपचाराशिवाय बरे होणार का तुम्ही? आम्ही असताना असं वाऱ्यावर सोडू तुम्हाला?? हट्टीपणा नका करू म्हातारपणी…”

“सुनबाई… पण ते घराचं…”

“ह्या घराला भोकं पडलीत का? माणसापेक्षा चार भिंती महत्वाच्या नाहीत…तुम्ही सगळे सोबत आहात, हेच माझं घर आणि हीच माझी श्रीमंती..”

सूनबाईने तिच्या स्वभावाप्रमाणेच उत्तर दिलं…

सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, 35 वर्षांपूर्वी हेच…अगदी हेच शब्द आबांसाठी ते बोलून गेले होते…

3 thoughts on “भिंती नको…माणसं हवी”

Leave a Comment