भार कुणीही पेलो…

ती ऑफिसहून आली आणि रोजच्याप्रमाणे तिचं डोकच फिरलं.. किती वेळा माधव ला सांगितलं की घरातली कामं करायची नाहीत मी असताना…पण तो ऐकेल तेव्हा खरं… एक तर आधीच लोकांच्या टोमण्यांनी तिच्या डोक्याचा पार भुगा झाला होता.

“माधव…ठेव ती भांडी, मी घासून घेईन..”

“थकून आली असशील गं… आल्या आल्या काय कामाला लागतेस..”

“काही होत नाही मला, सरका तिकडे..”

तिने बॅग ठेवली आणि सिंक मधला नळ चालू केला…माधव तिच्या शेजारीच उभा होता…तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं…घरातली कामं केल्याचे निशाण त्याच्या ओल्या कापड्यांकडे आणि विस्कटलेल्या केसांकडे पाहून दिसत होते…तिला घृणा वाटायला लागली, आणि स्वतःवरच राग येऊ लागला..

माधव केविलवाणा होऊन विचारू लागला..

“साधना, तुला आठवतं आपली पहिली भेट कुठे झालेली?”

साधना ने मौन पाळलं… भांड्यांचा आवाज अजून जोराने ती करू लागली…

“सांग ना…जाऊदे, मीच सांगतो…जेव्हा तू नोकरीसाठी मुलाखत द्यायला आलेली, तेव्हा मीही होतो तिथे…तुला पाहिलं आणि मुलाखतीत मला काही बोलायला सुचलच नाही बघ..”

“तरी तुझीच निवड झालेली…”

“ते महत्वाचं नाही गं… तू इतकी सुंदर..”

साधना ने नळ बंद केला, आणि माधव कडे पाहून ती म्हणाली..

“माधव, तेव्हाचे दिवस आणि आत्ताचे दिवस यात फार फरक आहे…मी खूप अभिमानाने माझा नवरा मोठा पदावर म्हणून मिरवायची… आणि आज? लोकं मला म्हणताय, ही बघा…बिचारी राब राब राबतेय…आणि नवरा खुशाल आयतं बसून खातोय…”

“साधना? तुला लोकांचं इतकं वाईट वाटतंय? तुला खरी परिस्थिती माहितेय ना?”

“मी स्पष्टच बोलते…नवऱ्याला पोसणारी म्हणून मला नको ते ऐकावं लागतंय…”

हे ऐकून माधव सुन्न झाला…तो त्याच्या खोलीत गेला..आणि दार बंद करून एकटाच बसला..

साधना ने कामं आटोपली, माधव ला आपण हे काय बोलून गेलो याचं वाईट वाटलं…इतक्यात मोहित शाळेतून आला…साधना ने त्याला खाऊ पिऊ घालून खेळायला पाठवलं…आल्यावर तो गृहपाठ घेऊन बसला…

“आई…टीचर ने हे मूल्यशिक्षण चा व्यवसाय भरायला लावला आहे..”

“बरं… उघड बघू व्यवसाय..”

“हे बघ…स्त्री…पुरुष समानता..म्हणजे काय गं आई?”

“म्हणजे स्त्री आणि पुरुष हे समान आहेत..”

“म्हणजे?”

“म्हणजे बघ, तुझी एखादी मैत्रीण…तिला जर कोणी म्हटलं की तुला हे जमणार नाही, मुलांचं काम आहे हे…तर ते योग्य आहे का? आजकाल मुली सर्व क्षेत्रात पुढे आहेत..पण लोकं आजही मुलींना कमी समजतात, मुलींना हे जमणार नाही, ते जमणार नाही असं म्हणतात..घरातली कामं फक्त बायकांनी करायची आणि माणसांनी घरातल्या कामांना हात लावायचा नाही, ही स्त्री पुरुष समानता नाही…दोघांनी मिळून सर्व कामं करायची…”

“आई आपले पप्पा नाही बघ तसे, घरातले सगळे कामं तेच करतात..”

साधना ला ते शब्द एकदम चटका लावून गेले…खरंच, माधवची कंपनी अचानक बंद पडली आणि त्यातच हे lockdown, नवीन नोकरी मिळायला अजून काही महिने तरी लागतील..नशीब माझी नोकरी शाबूत होती…काय चूक होती त्याची??? उलट मला मदत व्हावी म्हणून घरातली कामं करताना त्याला कधीच लाज वाटली नाही…स्त्री पुरुष असा भेदभाव नाही की पुरुषी अहंकार नाही..नशीब लागतं असा नवरा मिळायला…अश्या उच्च विचारांच्या नवऱ्याऐवजी बुरसटलेल्या विचारांच्या समाजाचं मी ऐकत बसले….त्यांच्यावरून माधव ला नको ते ऐकवलं…

हीच परिस्थिती उलटी असती तर? माझी नोकरी गेली असती तर? माधव मला कधी म्हटला असता? की आयतं बसून खातेय… किंवा मी तुला पोसतोय म्हणून?

एक माणूस म्हणून विचार केला तर एकाने आर्थिक भार सांभाळला तरी खूप आहे…मग तो भार स्त्री ने सांभाळला तर पाप, आणि पुरुषाने सांभाळला तर साधारण बाब….ही कुठली स्त्री पुरुष समानता???

मोहित च्या त्या मूल्यशिक्षण व्यवसायाने साधना चे मात्र डोळे उघडले…आणि तडक उठून ती माधव ची माफी मागायला गेली…

2 thoughts on “भार कुणीही पेलो…”

Leave a Comment