भाकित (भाग 4) ©संजना इंगळे

सारंगचे मित्र अवाक होतात, “भविष्याचं भाकित??”

“होय..”

“अरे कसं शक्य आहे हे??”

“का शक्य नाही??”

“भविष्यात काय घडू शकतं हे कुणालाही माहीत नाही रे..”

“भविष्य हे आपला भूतकाळ अन वर्तमानकाळावर अवलंबून असतं..”

“कालच आमच्या शेजारचे काका अचानक अटॅक ने गेले..काहीही आजार नाही ना दुखणं नाही..आता याचं भाकित कसं केलं असतं??”

“अचानक काहीही होत नाही, त्यांच्या सवयी नीट आठव.. अन तूच विचार कर..”

मंगेश विचारात पडतो, त्यांच्या घरातून कायम सिगारेटचा धूर येई..काकाचं रुटीनही अस्ताव्यस्त असायचं..मंगेशला ही कल्पना काहीशी पटू लागते..सारंग पुन्हा सांगायला लागतो..

“आपल्या समोर एखादी जाहिरात केव्हा येते? आणि नेमकी आपल्याला हवी असलेलीच वस्तू आपल्याला कशी दिसते? व्हिडीओ चॅनल वर आपल्या आवडीचेच व्हिडीओ टॉप ला कसे दिसतात? सोशल मीडियावर आपल्या छंदांचे आर्टिकल्स, व्हिडीओजच आपल्याला कसे दिसतात? यामागे artificial इंटेलिजन्स आहे..आणि तेच आपल्याला करायचं आहे??”

“ते कसं??”

“हे बघ..सगळ्या ऑनलाइन साईट्स आपल्या माहितीचा वापर करतात, म्हणजे गुगल सारखी कंपनी आपण गुगल वर काय सर्च करतो? किती वेळा करतो? आपलं वय काय? आपण कुठे राहतो यावरून आपल्याला काय हवं असेल याचा अंदाज घेतो अन बरोबर अश्या जाहिराती आपल्या समोर ठेवतो..”

“एकंदरीत आपल्याला सर्व माहिती आधी जमा करावी लागेल..”

“माहितीचा आधार घेऊन पुढची कन्सेप्ट येते ती मशीन लर्निंग ची..म्हणजे आधी असं होतं की आपण प्रोग्राम मध्ये जो कोड लिहू  तशीच सिस्टीम चालेल. पण आता स्वतः शिकणारा कोडही अस्तित्वात आहे..”

“स्वतः शिकणारा म्हणजे??”

“म्हणजे..हे बघ, एक लहान मूल असतं, त्याला जगाची काहीही माहिती नसताना, साध्या साध्या गोष्टी तो कश्या शिकतो?? जेवण कसं केलं पाहिजे..कुठे बसलं पाहिजे..वस्तू कश्या वापरल्या गेल्या पाहिजे हे त्याला कुणीही शिकवत नाही, मोठ्यांचं बघून तो अंदाज लावत असतो आणि तसंच वागत असतो..”

“म्हणजे हा जो कोड असेल तो आपण दिलेल्या माहिती वरून अंदाज लावेल..”

“Exactly..”

“असा एक algorithm जो predict करेल..याला predictive machine learning म्हणतात.. म्हणजे दिलेल्या माहितीवरून तो अंदाज लावेल..”

“पण यावरून माणसाचं भविष्य कसं ओळखणार??”

“आपण भरपूर लोकांची माहिती या सॉफ्टवेअर ला पुरवायची, म्हणजे एखाद्याचा जन्मापासून ते त्याने आयुष्यात काय काय केलं, काय खाल्लं, आयुष्यातल्या सर्व लहान मोठ्या घटना या डेटाबेस मध्ये स्टोर करायच्या..आपला algorithm ते सगळं analysis करेल, अमुक एका माणसाने तमुक असं केलं अन त्याच्या आयुष्यात असं झालं..मग तसंच वागणाऱ्या दुसऱ्या एखाद्या माणसाचं भाकितही तेच असू शकतं..”

सर्व मित्र एकदम शांत होतात, सारंग इतकी वेगाने त्यांची बुद्धी चालत नव्हती, पण जे काही होतं त्याला त्यांच्या मेंदूत पक्कं व्हायला काही सेकंद तरी गेले.”

“मी तयार आहे..”मंगेश म्हणाला…

सर्व मित्र त्याच्याकडे पाहू लागले. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सर्वजण तयार झाले…

“ठीक आहे, उद्या ठीक 11  वाजता माझ्या घरी..आपापला लॅपटॉप घेऊन..”

सारंगला पहिल्यांदा त्याचं घर उल्हसित वाटू लागलं, उद्यापासून इथे काम सुरू होणार म्हणून त्याने घर आवरायला घेतलं. 7-8 पिशव्या भरून केर कचरा काढला. किचन साफ केलं, हॉल मधील फर्निचर वरची धूळ पुसली, फॅन वरील धूळ साफ केली..

“याच फॅन ला लटकून आपण स्वतःचा अंत करणार होतो..काळ किती कमाल आहे ना, क्षणात माणसाचा निर्णय बदलू शकतो..काल जे घर भकास वाटत होतं, तेच आज उल्हसित वाटतंय, कारण माझ्या नव्या कामाची सुरुवात इथे होणार आहे..”

इतका प्रवास करून सुद्धा सारंगला थकवा जाणवत नव्हता, राहून राहून त्याला केशवची आठवण यायची. केशव असता तर किती बडबड केली असती त्याने. त्याची अर्धी भाषा समजत तर नव्हतीच, पण जे बोलायचा त्यात तथ्य असायचं.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व मित्र जमतात. त्यांच्या सोडलेल्या ऑफिसमध्ये सारंगने राजीनामा दिला म्हणून खळबळ उडालेली असते. अमन वर्माचा तर सारंग हातातून गेला म्हणून संताप संताप झालेला.

“आपल्या कामाची सुरुवात आजपासून करूया..”

“आपण सर्वात आधी गणपतीचं स्तोत्र म्हणूया…चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या प्रार्थनेने..”

सर्वजण प्रार्थना म्हणतात, मंगेश आश्चर्याने सारंगकडे बघत असतो..

“तू कधीपासून देवाला मानायला लागलास??”

“चांगुलपणा, दुसऱ्याकडे बघण्याची भावदृष्टी, तत्व, मूल्य हाच देव. कुणी तो मूर्तीत बघतो कुणी माणसात बघतो..”

सारंगच्या तोंडून अशी भाषा ऐकून सर्वजण गार पडतात, केशवचं वाक्य तंतोतंत सारंगने बोलून दाखवलं होतं..

“ते सोडा, आता कामाला लागुया..”

सारंगने सर्वांना बसायला छान वेगवेगळे टेबल अन खुर्च्या मांडल्या होत्या, एका बाजूला प्रिंटर, वाय फाय आणि चहाचं मशीन सुसज्ज ठेवलं होतं. कामाला सुरुवात झाली. बेसिक सॉफ्टवेअर सर्वांनी इन्स्टॉल केले, या टूल्स वरच सर्वजण कोडिंग करणार होते. कामं वाटून देण्यात आली. मंगेशकडे माहिती जमा करण्याचं काम, नरेंद्र कडे प्रोग्राम डेव्हलपमेंट, तुषार कडे टेस्टिंग आणि चेतनकडे डिप्लोयमेंट चं काम दिलं गेलं. सारंग टीम लीड होता. सध्या सर्वात महत्वाचं काम मंगेश चं होतं. सॉफ्टवेअर साठी लागणारी सर्व माहिती जमा करण्याचं काम त्याच्याकडे होतं. आज सारंग सर्वांना प्रोजेक्ट समजावून सांगणार होता. त्यानंतर मंगेश प्रेझेंटेशन देणार होता. एकीकडे सॉफ्टवेअर इन्स्टॉल ला लावले अन सारंगने प्रोजेक्ट बद्दल पूर्ण माहिती दिली. मंगेश प्रेझेंटेशन द्यायला आला..

“आपल्या सॉफ्टवेअर साठी सर्वात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे डेटा. आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्याची माहिती जमा करायला हवी. आपण जास्तीत जास्त किती दिवसांची माहिती जमा करू शकतो? 2 महिने? 3 महिने?? शेती करण्याचं तंत्र समजायला आदिमानवाला किती वर्षे गेली? अनुभव, संकटं, कल्पना, बुद्धी आणि काळ..या सर्वांचा परिपाक म्हणून तो शेती शिकला. आपल्याला निदान आयुष्य पूर्ण जगून झालेल्या माणसांचं आयुष्य अन त्यांचा अनुभव याचा डेटा लागेल..”

सारंग निराश होतो, मंगेश जे म्हणत होता त्याचा विचार त्याने केलाच नव्हता. आता हा डेटा आणणार कुठून?

मंगेश हसू लागतो..

“काळजी करू नका, माझे आजोबा शिक्षक होते, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत असल्यापासून डायरी लिहायची सवय लावलेली..अगदी आज काय खाल्लं इथपासून ते आज कुठली महत्वाची घटना घडली ही सगळी माहिती त्या डायऱ्यात आहे आणि त्या माझ्या जुन्या लायब्ररीत जपून ठेवल्या आहेत..”

क्रमशः

भाकित (भाग 5) ©संजना इंगळे

1 thought on “भाकित (भाग 4) ©संजना इंगळे”

Leave a Comment